IND vs ZIM: टीम इंडियासमोर झिम्बाब्वेची शरणागती; दणदणीत विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम

Published : February 26, 2026 at 4:58 PM IST
|Updated : February 26, 2026 at 8:52 PM IST
चेन्नई IND vs ZIM Live : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना झिम्बाब्वेशी होत आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. झिम्बाब्वे 2002 नंतर पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतीय भूमीवर खेळत आहे. सुपर-8 फेरीत भारत आणि झिम्बाब्वे दोघांचीही सुरुवात निराशाजनक झाली आहे. दोन्ही संघांचा नेट रन रेट खुप खराब आहे. परिणामी आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा असेल, आजच्या सामन्यात पराभूत झालेल्या संघाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं नाणेफेक जिंकत टीम इंडिया प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. यानंतर सर्वच फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळं टीम इंडियानं 20 षटकांत 4 बाद 260 धावा केल्या आहेत. ही यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा डाव 20 षटकांत 6 बाद 184 धावांवर मर्यादित राहिला. भारतानं 72 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे तर झिम्बाब्वेचं आव्हान संपुष्टात आलंय.
दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यात पराभव : भारताचा मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यानं 180 धावा करत, या विश्वचषकात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यानं 10 बळी घेतले आहेत. दुसरीकडे, झिम्बाब्वेला त्यांच्या मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 107 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. संघाकडून ब्रायन बेनेट 180 धावांसह संघाचा आघाडीचा फलंदाज आहे, तर ब्लेसिंग मुझारबानी 11 बळींसह गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांमधील सामना खूप महत्त्वाचा आणि रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
LIVE FEED
टीम इंडिया विजयी
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सर्वच फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळं टीम इंडियानं 20 षटकांत 4 बाद 260 धावा केल्या. ही यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा डाव 20 षटकांत 6 बाद 184 धावांवर मर्यादित राहिला. भारतानं 72 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे तर झिम्बाब्वेचं आव्हान संपुष्टात आलंय.
टीम इंडियाची विक्रमी धावसंख्या
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 260 धावा केल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाची ही सर्वाधिक धावासंख्या ठरली आहे. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वेला चमत्कार करावा लागणार आहे.
टीम इंडियानं 17 षटकांत 201 धावा
या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 17 षटकांत 4 गडी गमावून 201 धावा केल्या.
कर्णधार सूर्या आउट
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव 13 चेंडूत 33 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याच्या रुपात भारताची चौथी विकेट पडली. टिनोटेंडा मापोसानं त्याचा झेल घेतला.
अभिषेक शर्मा 55 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियानं 13व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 150 धावांवर आपली तिसरी विकेट गमावली. 55 धावांवर अभिषेक शर्मानं टिनोटेंडा मापोसाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. यानंतर हार्दिक पांड्या आता फलंदाजीसाठी आला आहे.
इशान किशन बाद
भारताची दुसरी विकेट इशान किशनच्या रुपात पडली. त्यानं 24 चेंडूत 38 धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली. किशननं चार चौकार आणि एक षटकार मारला.
अभिषेक शर्माचं अर्धशतक
या विश्वचषकात आतापर्यंत फ्लॉप राहिलेल्या अभिषेक शर्मानं या सामन्यात दमदार फलंदाजी करत 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
पावरल्पेमध्ये 80 धावा
या सामन्यात टीम इंडियानं दमदार सुरुवात केली असून, पावरल्पेमध्ये संघाच्या 1 विकेटच्या बदल्यात 80 धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन दोघंही आक्रमक फलंदाजी करत आहेत.
भारताची पहिली विकेट
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या नव्या जोडीनं आज भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना संजू सॅमसनच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. सॅमसन 24 धावा काढुन बाद झाला. ब्लेसिंग मुजराबानीनं त्याची विकेट घेतली.
टीम इंडियाकडून नवी सलामी जोडी
भारताचा डाव सुरू झाला आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन क्रीजवर आहेत. संजूनं पहिल्या चेंडूचा सामना केला. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारुन त्यानं आपलं आणि भारतीय संघाचं खातं उघडलं.
सामन्यासाठी झिम्बाब्वेची प्लेइंग 11
तदिवानाशे मारुमानी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डियोन मायर्स, रियान बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकीवा, ब्रँड इवांस, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुजराबानी, रिचर्ड नगारवा
सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
टीम इंडियात दोन बदल
या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल दिसून आले आहेत, ज्यामध्ये रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे.
झिम्बाब्वेनं जिंकला टॉस
या सामन्यात झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात टीम इंडिया प्रथम फंलदाजी करणार आहे.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा
2010 ते 2024 पर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. भारतानं 10 सामने जिंकले आणि फक्त 3 गमावले, ज्यामुळं त्यांचा विजयाचा टक्का 76.92 इतका राहिला. दुसरीकडे, झिम्बाब्वेनं फक्त 3 जिंकले आणि 10 गमावले, ज्यामुळं त्यांचा विजयाचा टक्का 23.07 इतका राहिला. दोन्ही संघांमधील एकही सामना बरोबरीत सुटलेला नाही किंवा अनिर्णीत राहिला नाही. आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात भारत आणि झिम्बाब्वेनं फक्त एकच सामना खेळला आहे, जो भारतानं जिंकला. हा सामना 6 नोव्हेंबर 2022 रोजी मेलबर्नमध्ये खेळला गेला होता.
चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये, जे पारंपारिकपणे फिरकीपटूंना अनुकूल पृष्ठभागासाठी ओळखलं जातं, अलिकडच्या वर्षांत लक्षणीय बदल झाले आहेत. खेळपट्टी आता फलंदाजांना पूर्वीपेक्षा जास्त पसंती देते. 180-200 च्या श्रेणीतील उच्च-स्कोअरिंग सामने या ठिकाणी सामान्य झाले आहेत. अशा खेळपट्ट्यांवर त्यांचे स्ट्रोक खेळण्यास सोयीस्कर असलेल्या भारतीय फलंदाजांसाठी सातत्यपूर्ण उसळी फायदेशीर ठरु शकते. सामना पुढं सरकत असताना फिरकीपटूंना अजूनही काही पकड मिळू शकते, परंतु खेळपट्टी सामान्यतः स्ट्रोक-अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे.
चेन्नईचं हवामान कसं असेल
गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये हवामान उष्ण आणि किंचित धुकं असण्याची अपेक्षा आहे. सकाळचं तापमान सुमारे 31°C च्या आसपास होतं, जे दुपारी सुमारे 32°C आणि संध्याकाळी सुमारे 27°C पर्यंत होण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश बहुतेक ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे, परंतु सामन्याच्या वेळेपर्यंत ते निरभ्र होईल. उल्लेखनीय म्हणजे, पावसाचा अंदाज नाही, ज्यामुळं भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पूर्ण आणि अखंड होईल.
24 वर्षांनी दोन्ही संघ आमनेसामने
जेव्हा झिम्बाब्वे या सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा 24 वर्षांत ते पहिल्यांदाच भारतात भारताविरुद्ध खेळतील. भारतात हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी 2002 मध्ये एकमेकांसमोर आले होते. तेव्हा दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना दिल्लीच्या मैदानावर खेळला गेला होता आणि त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व सौरव गांगुलीनं केलं होतं. तेव्हापासून, भारतीय आणि झिम्बाब्वे संघ भारतीय भूमीवर कधीही भिडलेले नाहीत. गांगुलीनं त्या सामन्यात शतकही ठोकलं होतं.

