वैभवची शतकी खेळी पाण्यात; अभिषेक-किशनच्या दमदार खेळीच्या 'ऑरेंज आर्मी'चा सलग चौथा विजय
आयपीएल 2026 मध्ये शनिवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात पाहुण्या हैदराबाद संघानं राजस्थानचा 5 गडी राखून पराभव केला.


Published : April 26, 2026 at 12:10 AM IST
जयपूर SRH Beat RR by 5 Wickets : आयपीएल 2026 मध्ये शनिवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिवसाचा दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या हैदराबाद संघानं राजस्थानचा 5 गडी राखून पराभव केला. या हंगामात राजस्थानवर हैदराबादचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी, जेव्हा दोन्ही संघ हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भेटले होते, तेव्हा एसआरएचनं आरआरचा 57 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या बळावर 20 षटकांत 6 बाद 228 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा आणि किशानच्या अर्धशतकांच्या बळावर हैदराबादनं 19 व्या षटकात 5 गडी गमावून 229 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. विशेष म्हणजे आयपीलच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक यशस्वी धावांचा आहे. या विजयामुळं सनरायझर्स हैदराबादचे 10 गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले आहेत. राजस्थान चौथ्या स्थानावर घसरला आहे. या हंगामात आरआरचा हा तिसरा पराभव होता.
वैभवचं शानदार शतक : तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थान रॉयल्सने 6 गडी गमावून 228 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी 103 धावा करत शानदार शतक झळकावले. ध्रुव जुरेलनेही शानदार अर्धशतक झळकावले. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगे आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हैदराबादचा सलग चौथा विजय : राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, सनरायझर्स हैदराबादने शानदार फलंदाजी करत 19 व्या षटकात 5 गडी गमावून 229 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनं 31 चेंडूंमध्ये 74 धावांची वेगवान खेळी केली. अभिषेक शर्माने 29 चेंडूंमध्ये 57 धावांची वादळी खेळी केली. आयपीएल 2026 मधील एसआरएचचा हा 5 वा विजय आहे. अशाप्रकारे, हैदराबाद संघ आता 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. हैदराबाद आणि राजस्थान या दोघांचेही 10 गुण समान आहेत, परंतु एसआरएचचा नेट रन रेट चांगला आहे.

