ETV Bharat / sports

शुभमन गिलवर मोठी कारवाई, IPL नं ठोठावला लाखोंचा दंड; दिल्लीविरुद्ध विजयानंतर गुजरातला झटका

गुजरात टायटन्सनं अखेर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 मध्ये पहिला विजय मिळवला. पण या विजयासोबतच संघाला आणि कर्णधार शुभमन गिलला मोठा धक्का बसला.

Shubman Gill Fined
शुभमन गिल (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 9, 2026 at 12:26 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली Shubman Gill Fined : गुजरात टायटन्सनं अखेर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 मध्ये पहिला विजय मिळवला. पण या विजयासोबतच संघाला आणि कर्णधार शुभमन गिलला मोठा धक्का बसला. 8 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात गुजरातनं 1 धावेनं विजय मिळवला, पण षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल कर्णधार गिलला दंडात्मक शिक्षा भोगावी लागली.

नियमाचं उल्लंघन करण्याची पहिलीच वेळ : या सामन्यात गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करत 210 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सनं जोरदार झुंज देत 19 षटकांत 6 गडी गमावून 198 धावा केल्या होत्या. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती आणि सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूनं झुकलेला दिसत होता. मात्र, गुजरातच्या षटकांच्या कमी वेगाचा फटका बसला. नियमांनुसार, 30-यार्ड सर्कलमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवणं आवश्यक होतं, ज्यामुळं दबाव आणखी वाढला. इतकंच नाही, तर आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत कर्णधार शुभमन गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या हंगामात गुजरातनं षटकांचा वेग कमी ठेवण्याच्या नियमाचं उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ होती.

निवेदनात काय म्हटलं : याबाबत आयपीएलनं एक निवेदन जारी करुन म्हटलं आहे की, "दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या 14व्या सामन्यादरम्यान धीम्या गतीनं षटकं टाकल्याबद्दल गुजरात टायटन्स (GT) चा कर्णधार शुभमन गिल याला दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील हा त्याच्या संघाचा पहिलाच गुन्हा असल्यानं, आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे." विशेष म्हणजे यापूर्वी आयपीएल 2026 मध्ये धीम्या गतीनं षटकं टाकल्याबद्दल पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दोनदा दंड ठोठावण्यात आला होता. त्याला पहिल्यांदा 12 लाख रुपये आणि दुसऱ्यांदा 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

शेवटच्या षटकातील थरार : सामन्याचं शेवटचं षटक नाट्यमय घडामोडींनी भरलेलं होतं. दिल्लीचा फलंदाज विप्रज निगमनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारुन दिल्लीला सामन्यात आघाडी मिळवून दिली, पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव क्रीजवर आला, त्यानं एक धाव घेतली आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड मिलरकडे स्ट्राईक सोपवली. मिलरनं चौथ्या चेंडूवर षटकार मारुन दिल्लीसाठी सामना जवळपास निश्चित केला होता. शेवटच्या दोन चेंडूंवर केवळ दोन धावांची गरज होती, पण पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही आणि शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला. परिणामी, दिल्ली 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 209 धावाच करु शकला आणि एका धावेनं सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील हा पहिला पराभव होता, तर गुजरात टायटन्सनं आपल्या पहिला विजय मिळवला.

हेही वाचा :

  1. IPL मध्ये आज KKR vs LSG मॅच; कोलकाता घरच्या मैदानावर विजय मिळवत आपलं खातं उघडणार?
  2. IPL दरम्यान BCCI नं लागू केले कडक नियम; 'या' खेळाडूंना मैदानावर येण्यास बंदी
  3. कोलकातामध्ये सलग दुसरा सामना होणार रद्द? हवामान अंदाजानं वाढलं टेंशन