ETV Bharat / sports

China Masters: किदाम्बी श्रीकांतचा जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टरविरुद्ध विजय; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अनुभवी भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईचा पराभव करुन चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

China Masters
किदाम्बी श्रीकांत (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : September 3, 2026 at 12:19 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई China Masters : अनुभवी भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईचा पराभव करुन चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीकांतनं कॅनेडियन खेळाडूला 21-18, 21-19 अशा सरळ गेममध्ये पराभूत केलं. यावर्षी यूएस ओपन सुपर 300 च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीकांतनं, गेल्या महिन्यात नवी दिल्लीत आपलं दुसरे विश्व चॅम्पियनशिप कांस्यपदक जिंकलेल्या लाईला पराभूत करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. माजी जागतिक क्रमवारीत अव्वल आणि 2021 विश्व चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता श्रीकांत आता हाँगकाँगच्या ली चेउक यूचा सामना करेल.

श्रीकांतनं व्हिक्टर लाईवर कसा मिळवला विजय : श्रीकांतनं लाईविरुद्ध आपला झुंजारपणा दाखवला. पहिल्या गेमच्या सुरुवातीला तो 3-7 नं मागे होता, परंतु लाईच्या चुकांचा फायदा घेत त्यानं स्कोअर 8-8 असा बरोबरीत आणला. मात्र, कॅनेडियन खेळाडूनं मध्यांतरापर्यंत दोन गुणांची आघाडी घेत स्कोअर 15-11 असा केला. यानंतर श्रीकांतनं जोरदार पुनरागमन करत स्कोअर 15-15 असा बरोबरीत आणला. आणखी एका क्रॉस-कोर्ट स्मॅशनं भारतीय खेळाडूला 18-16 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यानं तीन गेम पॉईंट्स मिळवले आणि दुसऱ्या गेम पॉईंटवर गेम जिंकला.

दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला श्रीकांतकडून चुका झाल्या, ज्यामुळं तो 5-9 नं मागे पडला. मात्र भारतीय खेळाडूनं पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. जेव्हा तो 9-14 नं मागे होता, तेव्हा त्यानं दोन जोरदार फटके आणि लाईच्या चुकांचा फायदा घेत स्कोअर 13-14 असा बरोबर केला. त्यानंतर स्कोअर 18-18 असा बरोबर झाला. त्यानंतर लाईचा फटका बाहेर गेला आणि श्रीकांतने एक जोरदार फटका मारून मॅच पॉईंट मिळवला व सामना पटकन आपल्या नावावर केला.

तन्वी शर्माचा पराभव : नुकतंच महिला एकेरीमध्ये तैपेई ओपन वर्ल्ड टूर सुपर 300 चं विजेतेपद पटकावणाऱ्या तन्वी शर्माला दुसऱ्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या तोमोका मियाझाकीकडून 17-21, 21-18, 16-21 नं पराभव स्विकारावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये चायनीज तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि ह्सू यिन हुई यांच्याकडून 18-21, 18-21 नं पराभूत झाल्यामुळं भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो हे देखील स्पर्धेतून बाहेर पडले.

हेही वाचा :

  1. 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी इंग्रजांनी केली संघाची घोषणा; पोलिसांनी ताब्यात घेतलेला खेळाडू संघाबाहेर
  2. सेमीफायनलचं तिकिट मिळवण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात; पहिल्यांदाच होणारा सामना 'इथं' दिसेल लाईव्ह
  3. पहिल्यांदाच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं भारतात आयोजन; फक्त दोन शहरात होणार सामने