ETV Bharat / sports

आफ्रिकेनं टीम इंडियाचं विजय रथ थांबवलं; प्रोटीज संघानं दणदणीत विजय मिळवत घेतला 2024 च्या पराभवाचा बदला

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आले. यात आफ्रिकन संघानं विजय मिळवला.

IND vs SA Match
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : February 22, 2026 at 10:37 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहमदाबाद IND vs SA Match : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 77 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या दमदार अर्धशकाच्या बळावर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.2 षटकांत 111 धावांवर मर्यादित राहिला. यासह टीम इंडियाची टी-20 विश्वचषकात सलग 12 सामन्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. आता भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने मोठ्या अंतरानं जिंकावे लागतील. या विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

भारताची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी : दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात स्फोटक सलामीवीर ईशान किशन शून्य धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा (15) आणि तिलक वर्मा (1) हेही स्वस्तात बाद झाल्यानं भारताची पावरप्लेमध्ये तीन बाद 31 अशी दयनीय अवस्था झाली. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (18) आणि वॉशिंग्टन सुंदर (11) यांनी काही वेळ प्रतिकार करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. यानंतर शिवम दुबे (42) आणि हार्दिक पांड्या (18) यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर भारतीय संघाचा डाव 18.2 षटकांत 111 धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून मार्को जान्सननं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर केशव महाराजनं तीन विकेट घेतल्या.

पॉवरप्लेमध्ये आफ्रिकेच्या तीन विकेट : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं डी कॉक आणि मार्करामसह डावाची सुरुवात केली. मात्र, जसप्रीत बुमराहनं दुसऱ्याच षटकात डी कॉकला बाद केलं. डी कॉकनं फक्त 6 धावा केल्या. त्यानंतर अर्शदीपनं पुढच्याच षटकात मार्करामला बाद केलं. यानंतर बुमराहनं त्याच्या दुसऱ्या आणि डावाच्या चौथ्या षटकात रायन रिकल्टनला बाद केलं. रिकल्टननं फक्त 7 धावा केल्या होत्या. परिणामी सहा षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 41 अशी झाली होती.

ब्रेव्हिस-मिलरची 97 धावांची भागीदारी : पण त्यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांच्यात 97 धावांची मजबूत भागीदारी झाली. शिवम दुबेनं 13व्या षटकात ब्रेव्हिसला बाद करुन ही भागीदारी मोडली. ब्रेव्हिसनं फक्त 29 चेंडूत 45 धावा केल्या. एका टोकाकडून डेव्हिड मिलरनं फटकेबाजी सुरु ठेवत 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानं त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सनं 24 चेंडूत 44 धावांची उपयुक्त खेळी केली. परिणामी आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 3, अर्शदीप सिंगनं 2 तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हेही वाचा :

  1. साहेबांकडून 'लंकादहन'! इंग्लिश फिरकीच्या जाळ्यात अडकला लंकन संघ; 95 धावांत खेळ खल्लास
  2. टीम इंडिया ठरली आशियाई चॅम्पियन; अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करत दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा
  3. पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये टी-20 विश्वचषकाचा उल्लेख; भारतीय खेळाडूंना उद्देशून केलं मोठं विधान