ETV Bharat / sports

टीम इंडियाला कोलकाताहून मिळालं मुंबईचं 'तिकीट'; वेस्ट इंडिजचा पराभव करत 10 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण!

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील 52वा तसंच सुपर-8 फेरीतील शेवटचा सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात खेळवण्यात आला. यात भारतानं विजय मिळवला.

IND vs WI Match
संजु सॅमसन (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 1, 2026 at 10:47 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोलकाता IND vs WI Match : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील 52वा तसंच सुपर-8 फेरीतील शेवटचा सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात खेळवण्यात आला. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं साघिक कामगिरीच्या बळावर निर्धारित 20 षटकांत 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं संजु सॅमसनच्या शानदार खेळीच्या बळावर 19.2 षटकांत 5 बाद 199 धावा करत विजय मिळवला. यासह भारतीय संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र झाला असून आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे टीम इंडियानं टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे.

वेस्ट इंडिजची दमदार फलंदाजी : सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं नव्या सलामी जोडीसह डावाची सुरुवात केली. संघाकडून रोस्टन चेसनं सर्वाधिक 40 धावा केल्या. तर कर्णधार शाई होपनं 32 आणि रोवमन पॉवेलनं फक्त 19 चेंडूत 34 धावा केल्या. जेसन होल्डरनं शेवटच्या फलंदाजीला येऊन 22 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. रोवमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्यात पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 76 धावांनी अभेद्य भागीदारी झाली. परिणामी संघाला निर्धारित 20 षटकांत 4 बाद 195 धावांची आव्हानात्मक मजल मारता आली. सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं त्याच्या चार षटकांमध्ये 36 धावा देत दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि वरुण यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारताची खराब सुरुवात : प्रत्युत्तरात भारताची सुरुवात खराब झाली. संघानं 5 षटकांत 45 दावांत दोन गडी गमावले. सलामीवीर अभिषेक शर्मा (10) आणि ईशान किशन (10) दोघंही स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (18) आणि संजु सॅमसन यांच्यात 58 धावांची दमदार भागीदारी झाली. या दरम्यान सलामीवीर संजु सॅमसननं 26 चेंडूत आक्रमक अर्धशतक झळकावलं. यानंतर संजु सॅमसननं तिलक वर्मा (27) सह 42 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या समीप पोहोचवलं. एका बाजूनं विकेट पडत असताना सलामीवीर संजु सॅमसननं शानदार खेळी केली. अखेर हार्दिक पांड्याच्या (17) साथीनं संघाला विजय मिळवून दिला. संजु सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या बळावर भारतानं 19.2 षटकात 5 बाद 199 धावा करत विजय मिळवला. संजुनं 50 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या, यात त्यानं 12 चौकार आणि 4 षटकार मारले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरनं 2 विकेट घेतल्या.

सेमीफायनसाठी चारही संघ निश्चित : या सामन्यापूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं होत. आता या सामन्यात विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत आता 4 मार्च रोजी पहिली सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात खेळवला जाणार आहे.

हेही वाचा :

  1. दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सलग सातवा विजय; झिम्बाब्वेची विजयाची पाटी कोरी
  2. ODI मालिकेत विश्वविजेत्या टीम इंडियाचा सुपडासाफ; तिसऱ्या वनडेत कांगारुंचा 185 धावांनी विजय
  3. टी-20 विश्वचषकावर अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम; ICC नं उचललं मोठं पाऊल