ICC क्रमवारीत किशनला फायदा, जेकब बेथललाही बंपर फायदा; सूर्याला मोठं नुकसान
यसीसी क्रमवारी अद्ययावत करण्यात आली आहे. यावेळी फारसे मोठे बदल झाले नसले तरी, भारताच्या इशान किशनच्या क्रमवारीत किंचित वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Published : July 8, 2026 at 3:52 PM IST
दुबई ICC Rankings : आयसीसी क्रमवारी अद्ययावत करण्यात आली आहे. यावेळी फारसे मोठे बदल झाले नसले तरी, भारताच्या इशान किशनच्या क्रमवारीत किंचित वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, इंग्लंडचा शक्तिशाली फलंदाज जेकब बेथेलनं अव्वल 10 मध्ये मोठी झेप घेतली आहे, तर भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव क्रमवारीतून बाहेर पडला आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठे बदल अपेक्षित आहेत.
आयसीसी क्रमवारीत इशान किशन अव्वल स्थानी कायम : भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेपूर्वी आयसीसीनं नवीन टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा स्टार फलंदाज इशान किशन अव्वल स्थानी कायम आहे. त्याचं रेटिंग आता 897 पर्यंत वाढले आहे. 1 जुलै रोजी इशानचं रेटिंग 876 होतं, ज्यात आता वाढ झाली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचं रेटिंग 904 वरुन घसरलं होतं.
England's T20I stars made important gains in the latest ICC Men's Player Rankings 🙌https://t.co/suYR1nWEKz
— ICC (@ICC) July 8, 2026
इशान आणि अभिषेक यांच्या रेटिंगमधील फरक खूपच कमी : दरम्यान, दोन भारतीय फलंदाज पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ईशान किशन पहिल्या क्रमांकावर असून, त्याच्या पाठोपाठ अभिषेक शर्मा आहे. शर्माचं सध्याचं मानांकन 881 आहे, म्हणजेच या दोन अव्वल फलंदाजांमध्ये फारसा फरक नाही. दरम्यान, इंग्लंडचा जेकब बेथेल आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचं रेटिंग आता 708 झालं असून, त्यानं सात स्थानांची झेप घेतली आहे.
सूर्यकुमार यादव अव्वल 10 मधून बाहेर : भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव भारतीय संघातून बाहेर आहे आणि याचा परिणाम त्याच्या रेटिंगवर होत आहे. सूर्या आता अव्वल 10 मधून बाहेर पडून 13 व्या स्थानावर घसरला आहे, म्हणजेच त्यानं पाच स्थानं गमावली आहेत. त्याचं रेटिंग आता 687 झालं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत दोन सामने बाकी : भारत आणि इंग्लंड सध्या टी-20 मालिका खेळत आहेत. आणखी दोन सामने बाकी आहेत. मालिकेतील चौथा सामना 9 जुलै रोजी, तर अंतिम सामना 11 जुलै रोजी खेळला जाईल. याचा अर्थ असा की, पुढच्या आठवड्यात जेव्हा क्रमवारी पुन्हा अद्ययावत केली जाईल, तेव्हा या दोन सामन्यांमधील खेळाडूंच्या कामगिरीचाही विचार केला जाईल. यानंतर आणखी एक बदल होईल. मालिका संपल्यानंतर भारतीय खेळाडूंचं स्थान काय असेल, हे पाहणं बाकी आहे.
हेही वाचा :

