टीजी-20 लीगमध्ये 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स'चा जलवा; सलग तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित TG20 लीगमध्ये 'हैदराबाद ई-चॅम्पियन्स' संघाने आपली विजयाची मालिका कायम ठेवली आहे.

Published : June 27, 2026 at 7:48 PM IST
|Updated : June 27, 2026 at 7:54 PM IST
हैदराबाद : हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) आयोजित टीजी-20 (TG20 League) लीगमध्ये हैदराबाद ई-चॅम्पियन्स संघानं विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. आज शनिवारी (27 जून) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी मेडक फाल्कन्स संघाचा 46 धावांनी पराभव करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला. या विजयासह हैदराबाद ई-चॅम्पियन्सचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
फाल्कन्सची फलंदाजी ढेपाळली : सामन्यात फाल्कन्सनं टॉस जिंकून हैदराबाद ई-चॅम्पियन्स संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. पण हा निर्णय त्यांच्यावर उलटला. हैदराबादनं तुफानी फलंदाजी निर्धारित 20 षटकांत 240 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मेडक फाल्कन्स संघ 20 षटकांत 9 बाद 194 धावाच करू शकला. त्यांच्याकडून विक्रम नायकनं 75 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. कर्णधार रवी तेजा (31) आणि नोमान अहमद (38) यांनी चांगली सुरुवात केली, परंतु त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्यामुळे फाल्कन्सला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
हैदराबाद ई-चॅम्पियन्सच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखलं. अजय देव गौड याने अवघ्या 20 धावांत 4 बळी घेत जबरदस्त कामगिरी केली. प्रणव वर्माने 2 बळी मिळवले, तर श्रीनिकेत आणि नितीन नायक यांनी प्रत्येकी एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

सलामीवीर साई विकास रेड्डीची 93 धावांची दमदार खेळी : तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी मेडक फाल्कन्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. सलामीवीर साई विकास रेड्डी याने 93 धावांची दमदार खेळी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं आकर्षक फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचून दिला. साईविकासनं अवघ्या 48 चेंडूत 93 धावांची तडाखेबंद खेळी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
कर्णधार अभिरथ रेड्डीनंही अवघ्या 27 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी साकारली. त्यानं 7 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. साई विकास रेड्डी आणि अभिरथ रेड्डी यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची शानदार भागीदारी रचत संघाची धावसंख्या वेगानं पुढे नेली. या भक्कम सलामीमुळेच हैदराबाद ई-चॅम्पियन्सला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 240 धावांचा डोंगर उभारता आला.

अभिरथ रेड्डीला गाझी अब्बासच्या गोलंदाजीवर गुगुलोथनं झेलबाद केलं. मात्र, त्यानंतरही साई विकास रेड्डीनं धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. त्याला नितीन नायक (18) आणि पी. अरविंद (17) यांनी चांगली साथ दिली. यानंतर अखेरीस गणेश गडुगूने अवघ्या 7 चेंडूत 22 धावांची स्फोटक खेळी करत संघाची धावसंख्या 240 पर्यंत पोहोचवली.

साई विकास रेड्डीला 'सामनावीर'चा पुरस्कार : फाल्कन्सकडून विक्रम नायक आणि अब्बास चेरो यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर वरुण, कार्तिकेय, रवी तेजा आणि अश्विन राम यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. यानंतर 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फाल्कन्सचा डाव 194 धावांवर आटोपला आणि हैदराबादनं 46 धावांनी दिमाखदार विजय मिळवत स्पर्धेतील आपलं वर्चस्व कायम राखलं.

हैदराबाद ई-चॅम्पियन्सचा पुढील सामना 29 जूनला : 93 धावांच्या शानदार खेळीसाठी साई विकास रेड्डीला 'सामनावीर' (Player of the Match) पुरस्कारानं गौरविण्यात आलं. हैदराबाद ई-चॅम्पियन्सचा पुढील सामना 29 जून रोजी अन्विता खम्मम एसेसविरुद्ध होणार असून, हा सामना सायंकाळी 7:15 वाजता सुरू होईल.

