RCB चा माजी खेळाडू बनला मंत्री; भाजपा सरकारनं दिली मोठी जबाबदारी
पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा सोमवार, 1 जून रोजी संपन्न झाला.

Published : June 1, 2026 at 2:39 PM IST
कोलकाता Ashok Dinda : पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा सोमवार, 1 जून रोजी संपन्न झाला. राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण 35 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते व पक्षाचे अधिकारी उपस्थित होते.
🚨 𝐁𝐈𝐆 𝐔𝐏𝐃𝐀𝐓𝐄 : Joyel Murmu, Ashok Dinda, Anandamoy Burman, Santanu Pramanik, Purnima Chakraborty and Umesh Rai sworn in as ministers in West Bengal.#BreakingNews #WestBengal pic.twitter.com/mVaPiSrcpC
— VARTA ( वार्ता ) (@varta24news) June 1, 2026
दिंडानं राज्यमंत्री पदाची घेतली शपथ : नबन्ना इथं झालेल्या या सोहळ्याची सुरुवात कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीनं झाली. सात आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून, त्यानंतर तिघांनी राज्यमंत्री म्हणून आणि अखेरीस 19 आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा देखील बंगाल सरकारमध्ये मंत्री झाला आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिंडानं भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) तिकिटावर मोयना मतदारसंघातून प्रचंड विजय मिळवला होता. त्यानं प्रतिस्पर्धी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे (AITC) चंदन मंडल यांचा 16,241 मतांनी पराभव केला.
सलग दुसऱ्यांदा मिळवला विजय : अशोक दिंडानं सलग दुसऱ्यांदा मोयना मतदारसंघ जिंकला आहे. यापूर्वी, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत, या 42 वर्षीय खेळाडूनं तृणमूल काँग्रेसचे संग्राम डोलुई यांचा अवघ्या 1,260 मतांनी पराभव केला होता. क्रिकेटनंतर राजकारणातील त्यांचा हा विजय भाजपसाठी एक मोठा संदेश मानला जात होता.
क्रिकेट करिअर कसं : अशोक दिंडा यांची क्रिकेट कारकीर्दही लक्षणीय राहिली आहे. त्यानं डिसेंबर 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या दिंडानं भारतासाठी 13 वनडे आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं वनडे सामन्यांमध्ये 12 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 बळी घेतले.
बंगाल क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान : बंगालच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशोक दिंडाचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. त्यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही स्वतःला सिद्ध केलं. दिंडानं एकूण 78 आयपीएल सामने खेळून 69 बळी घेतले. या काळात तो कोलकाता नाईट रायडर्स (KKR), दिल्ली कॅपिटल्स (DC), पुणे वॉरियर्स इंडिया (PWI), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (RPS) यांसारख्या संघांचा सदस्य होता.
2021 मध्ये भाजपात सामिल : क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, अशोक दिंडा फेब्रुवारी 2021 मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजपा) सामील झाला. तेव्हापासून त्यानं राजकारणात झपाट्यानं आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि आता मंत्री बनून त्यानं हे सिद्ध केलं आहे की तो केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे, तर राजकारणाच्या मैदानातही एक मोठी खेळी खेळण्यास तयार आहे.
हेही वाचा :

