गंभीर-अय्यरचा संघ इंग्रजांना शरण; T20I क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा पराभव
इंग्लंड क्रिकेट संघानं तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा तब्बल 125 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

Published : July 8, 2026 at 9:24 AM IST
नॉटिंगहॅम ENG Beat IND : इंग्लंड क्रिकेट संघानं तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा तब्बल 125 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे या फॉरमॅटमध्ये धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत सात गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 11.4 षटकांत 76 धावांवर सर्वबाद झाला. भारताची फलंदाजी इतकी खराब होती की केवळ चार फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला, पण कोणीही 13 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.
England tick all the boxes in a big win at Trent Bridge 👏
— ICC (@ICC) July 7, 2026
Scorecard 📲 https://t.co/4aDRVnYwd6 pic.twitter.com/m6xjyGw2id
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वात मोठा पराभव : भारतीय संघाचा 100 पेक्षा जास्त धावांच्या फरकानं झालेला हा पहिला टी-20 पराभव आहे. यापूर्वी, या फॉरमॅटमध्ये धावांच्या बाबतीत संघाचा सर्वात मोठा पराभव न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. 2019 मध्ये वेलिंग्टन इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 80 धावांनी पराभव केला होता. शिवाय, 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. आधी त्यांना आयर्लंडकडून 0-2 नं पराभव पत्करावा लागला आणि आता इंग्लंडनं मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेत दोन सामने शिल्लक असताना, भारत येथून मालिका जिंकू शकत नाही. त्यामुळं, त्यांना आता मालिका अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
संघाचा सलग पाच टी-20 सामन्यांत पराभव : भारताचा ब्रिटन दौरा अत्यंत निराशाजनक ठरला आहे. संघानं सलग पाच टी-20 सामने न जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाला चार पराभवांना सामोरं जावं लागलं असून, एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. यापूर्वी, जून ते डिसेंबर 2009 आणि जुलै 2021 ते ऑक्टोबर 2021 या काळात त्यांना सलग चार टी-20 पराभवांना सामोरं जावं लागलं होते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग चार सामने गमावले आहेत. इंग्लंडविरुद्धचा त्यांचा पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता. दोन्ही संघांमधील चौथा सामना गुरुवारी ब्रिस्टल इथं खेळला जाईल.
England win the 3rd T20I by 125 runs to lead the series 2-0.
— BCCI (@BCCI) July 7, 2026
Scorecard ▶️ https://t.co/jan4S8zsaV#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/JKung77cru
सात फलंदाजांच्या 10 पेक्षा कमी धावा : लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण पहिला फटका बसताच भारताची फलंदाजी पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. या सामन्यात भारतासाठी वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन यांनी सर्वाधिक धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. सात फलंदाजांना केवळ एकेरी धावसंख्याच करता आली. इंग्लंडकडून जोश टंगनं उत्कृष्ट गोलंदाजी करत चार बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरनंही तीन बळी घेतले. आदिल रशीदनं दोन आणि विल जॅक्सनं एक बळी घेतला.
सॉल्टचं अर्धशतक : तत्पुर्वी, फिल सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 202 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सॉल्टनं इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 44 चेंडूंमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांसह 70 धावा केल्या. सॅम करन चार चौकारांसह 24 चेंडूंमध्ये 41 धावांवर नाबाद राहिला. जॉस बटलरनं 36, हॅरी ब्रुकनं 16, विल जॅक्सनं 14 आणि जेकब बेथेलनं 13 धावा केल्या. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणानं प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अक्षर पटेलनं एक बळी घेतला.
हेही वाचा :

