FIFA मध्ये आजपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार; पहिल्या सामन्यात फ्रान्ससमोर 'जायंट किलर्स' मोरोक्कोचं आव्हान
फिफा विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज रात्री खेळला जाईल. किलियन एम्बाप्पेच्या फ्रान्सचा सामना 'जायंट किलर्स' मोरोक्कोशी होईल.

Published : July 9, 2026 at 3:11 PM IST
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 चा पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज रात्री खेळला जाईल. किलियन एम्बाप्पेच्या फ्रान्सचा सामना 'जायंट किलर्स' मोरोक्कोशी होईल. हा सामना आज रात्री 1:30 वाजता बोस्टन स्टेडियमवर खेळला जाईल. फ्रेंच स्ट्रायकर एम्बाप्पेनं या स्पर्धेत सात गोल केले आहेत. तर मेस्सी आठ गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. जर एम्बाप्पेनं या सामन्यात गोल केला, तर तो मेस्सीला मागे टाकेल.
Your first Quarter-final fixture 👊 #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 9, 2026
फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात दुसरा विश्वचषक सामना : फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये फ्रान्सचं वर्चस्व राहिलं आहे. फ्रान्सनं चार सामने जिंकले आहेत, तर मोरोक्कोनं केवळ एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील. यापूर्वी, 2022 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत फ्रान्सनं मोरोक्कोला 2-0 नं पराभूत केलं होतं. मोरोक्को या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.
फ्रान्सनं जिंकले सर्व सामने : फ्रेंच संघ या स्पर्धेत आपले सर्व पाचही सामने जिंकून अपराजित राहिला आहे. गट टप्प्यात, फ्रान्सनं नॉर्वेला 4-1, इराकला 3-0 आणि सेनेगलला 3-1 नं पराभूत केलं. 32 संघांच्या फेरीत, संघानं स्वीडनचा सामना केला आणि 3-0 नं विजय मिळवला. त्यानंतर, 16 संघांच्या फेरीत, त्यांनी पॅराग्वेला 1-0 नं पराभूत करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली.
Quarter-final action starts today!#FIFAWorldCup #KickOffTimes @McDonalds pic.twitter.com/OSgSMXkwDA
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 9, 2026
मोरोक्को देखील अपराजित : मोरोक्को या विश्वचषकात अपराजित राहिला आहे. गट टप्प्यात, संघानं हैतीला 4-2 आणि स्कॉटलंडला 1-0 नं पराभूत केलं. त्यांनी दिग्गज ब्राझीलला 1-1 अशा बरोबरीत रोखलं. 32 संघांच्या फेरीत, मोरोक्कोचा सामना नेदरलँड्सशी झाला. पूर्ण वेळेपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. अखेरीस, पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोनं 3-2 नं विजय मिळवला. 16 संघांच्या फेरीत, संघानं कॅनडाला 3-0 नं पराभूत करुन अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला.
एम्बाप्पेचा हल्ला विरुद्ध हाकिमीचा बचाव : फ्रान्स म्बाप्पेकडून आक्रमक फिनिशिंगची अपेक्षा करेल. मोरोक्कोचा बचाव भेदण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. दुसरीकडे, मोरोक्को फ्रान्सचा हल्ला रोखण्यासाठी स्टार डिफेंडर आणि कर्णधार अश्रफ हाकिमीवर अवलंबून असेल. मात्र, या सामन्यात फ्रान्सचंच पारडं जड असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :

