रेफ्रींच्या कृपेनं मेस्सीचा अर्जेंटिना विजयी; पंचांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळं इजिप्तचा पराभव
फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनानं इजिप्तचा 3-2 असा पराभव केला. या सामन्यात पंचांनी घेतलेले अनेक निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूनं होते.

Published : July 8, 2026 at 10:31 AM IST
Argentina vs Egypt : फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनानं इजिप्तचा 3-2 असा पराभव केला. 78व्या मिनिटापर्यंत इजिप्त 2-0 नं आघाडीवर होता. मात्र अर्जेंटिनानं जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. तसंच या सामन्यात पंचांनी घेतलेले अनेक निर्णय अर्जेंटिनाच्या बाजूनं होते, ज्यामुळं मोठा वाद निर्माण झाला.
🇦🇷 Argentina have qualified for the Quarter-finals!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 7, 2026
व्हीएआरनं केला इजिप्तचा गोल रद्द : इजिप्तनं 58व्या मिनिटाला गोल केला. मुस्तफा झिकोनं गोलपोस्टच्या आत गोल केला. त्यानं जल्लोष केला, पण थोड्याच वेळात तो गोल अवैध ठरवण्यात आला. व्हीएआर तपासणीनंतर, पंचांनी ठरवलं की मिडफिल्डर मारावान अटियानं अर्जेंटिनाचा बचावपटू लिसांद्रो मार्टिनेझवर फाऊल केला होता. परिणामी, पंचांनी आपला निर्णय बदलला. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामन्याबद्दल बोलताना झिको म्हणाला, "हे बरोबर नाही, पंच, हे बरोबर नाही. हा अन्याय आहे, स्पष्ट अन्याय. ते संपूर्ण देशाच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहेत. ते सामन्याच्या सुरुवातीपासूनच आमच्या विरोधात होते. आम्हाला अर्जेंटिनाविरुद्ध 2-0 नं जिंकू दिलं नाही. ही स्पर्धा आधीच ठरवलेली आहे. आमच्यासाठी देव पुरेसा आहे, आणि तोच सर्व बाबींचा सर्वोत्तम न्यायाधीश आहे."
Argentina pull it back late to secure their spot in the last eight! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 7, 2026
इजिप्तचे प्रशिक्षकही भडकले : सामन्यानंतर, इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांनी एका पत्रकार परिषदेत पंचांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मी याला केवळ दुर्दैव म्हणणार नाही. आज आमची फसवणूक झाली. आमच्यासोबत अन्याय झाला." ते पुढं म्हणाले, "आम्हाला ना आदर मिळाला, ना निष्पक्ष खेळ. आम्हाला स्पष्ट पेनल्टी दिली गेली नाही. आमचा दुसरा गोल रद्द करण्यात आला. आमच्या खेळाडूची जर्सी ओढली जात असल्याचं सर्वांनी पाहिलं असूनही, VAR नं आमच्या दुसऱ्या पेनल्टीच्या अपिलाची चौकशीसुद्धा केली नाही." हसन यांनी या विश्वचषकाचे उर्वरित सामने पाहणार नसल्याचंही जाहीर केलं. ते म्हणाले, "मी या विश्वचषकाचे उर्वरित सामने पाहणार नाही. हा माझा निषेध नोंदवण्याचा मार्ग आहे."
सालाहला दिला नाही फाऊल : सामन्याच्या अतिरिक्त वेळेत एन्झो फर्नांडिसनं अर्जेंटिनाचा तिसरा आणि निर्णायक गोल केला. सुरुवातीला इजिप्त आक्रमण करत होता. अर्जेंटिनाच्या एका बचावपटूनं बॉक्समध्ये मोहम्मद सालाहवर फाऊल केला. बचावपटूच्या पायाचा फटका बसल्यानं सालाह खाली पडला. त्यानंतर अर्जेंटिनानं प्रतिहल्ला करुन गोल केला. खेळाडूंनी अपील करुनही, पंचांनी त्या टॅकलकडे दुर्लक्ष केलं आणि त्या घटनेची पडताळणी करण्यासाठी VAR चा वापर केला गेला नाही. सामन्यानंतर, सोशल मीडियावर पंचगिरी आणि VAR बाबत एक वाद सुरु झाला. अनेक चाहत्यांनी इजिप्तविरुद्धचे निर्णय वादग्रस्त असल्याचं म्हटलं, तर अर्जेंटिनाच्या समर्थकांनी सांगितलं की, संघानं विजय मिळवण्यासाठी शेवटच्या मिनिटांमध्ये उत्कृष्ट खेळ केला आणि सामन्याचा निकाल केवळ खेळाच्या आधारावरच लागला.
Egypt thought they had doubled their lead against Argentina until VAR wiped the goal away because of a foul that happened 100+ yards from where the goal was scored. pic.twitter.com/qVAsaWAS3o
— Caleb (@CalebDesignsX) July 7, 2026
अर्जेंटिनाचा उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडशी सामना : या वादानंतरही, अर्जेंटिनानं 3-2 असा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. गतविजेत्यांचा सामना आता स्वित्झर्लंडशी होईल, जो 72 वर्षांत प्रथमच अंतिम आठ संघांमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, इजिप्तसाठी, या पराभवामुळं केवळ त्यांचं स्पर्धेतून बाहेर पडणं झालं नाही, तर पंचगिरी आणि VAR बाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळं हा सामना 2026 विश्वचषकातील सर्वाधिक चर्चित सामन्यांपैकी एक बनला.
हेही वाचा :

