ETV Bharat / sports

पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचणाऱ्या ईश्वरीचं भव्य स्वागत, घोड्यावरुन काढली मिरवणूक; पाहा व्हिडिओ

अद्भुत धैर्य आणि जिद्दीचं प्रदर्शन करत नागपूरची कन्या 17 वर्षीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचला आहे.

Ishwari Pandey Receive Grand Welcome
पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचणाऱ्या ईश्वरीचं भव्य स्वागत, घोड्यावरुन काढली मिरवणूक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 9, 2026 at 3:23 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर Ishwari Pandey Receive Grand Welcome : पूर्णतः दृष्टीहीन ईश्वरी पांडे ही अथांग समुद्रावर जय मिळवत आज स्वगृही नागपूरला परतली. ईश्वरी पांडेनं श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी ही 38 किलोमीटरची आव्हानात्मक पाल्क सामुद्रधुनी पार केली. 11 तास 15 मिनिटांचा ईश्वरीचा संघर्ष, प्रचंड लाटा, जेलीफिश आणि समुद्राचा रौद्ररुप, पण तिच्या जिद्दीसमोर सगळं हरलं. जागतिक विश्वविक्रमाची नोंद केल्यानंतर ईश्वरीचं आज नागपुरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मेडिकल चौक ते क्रीडा चौकापर्यंत तिची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. फुलांचा वर्षाव करत तिचं स्वागत झालं. ईश्वरीनं फक्त अंतरच पार केलं नाही, तर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाचा किनारा गाठला आहे.

पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचणाऱ्या ईश्वरीचं भव्य स्वागत, घोड्यावरुन काढली मिरवणूक (ETV Bharat Reporter)


11 तास 15 मिनिटं जलतरण : अद्भुत धैर्य आणि जिद्दीचं प्रदर्शन करत नागपूरची कन्या 17 वर्षीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचला आहे. पूर्णतः दृष्टीहीन असताना ही कामगिरी करणारी ईश्वरी जगातील पहिली जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीनं श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी इथपर्यंत जलतरण करत इतिहास रचला आहे. ईश्वरी पांडेनं श्रीलंकेतील तलाईमन्नार जवळील उर्मलाई पॉईंट येथून 6 एप्रिल रोजी पहाटे 4च्या सुमारास जलतरणास सुरुवात केली. तीनं सलग 11 तास 15 मिनिटं जलतरण केलं अन् भारतातील धनुष्कोडी येथील अरिचलमुनई इथं दुपारी 03 वाजून 15 वाजता दाखल झाली. दरम्यान तिनं समुद्रातील प्रबळ लाटा, बदलत्या भरतीओहोटीचं स्वरुप व जेलीफिशचा सामना करत अतुलनीय कामगिरी करुन दाखवली आहे. जन्मापासूनच दृष्टीहीन असतानाही ईश्वरीनं खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धांमध्ये सातत्यानं आपली क्षमता सिद्ध केली आहे. ईश्वरीची ही कामगिरी जिद्द व चिकाटीचं प्रेरणादायी उदाहरण आहे.

Ishwari Pandey
पाल्क सामुद्रधुनी पार करुन इतिहास रचणाऱ्या ईश्वरीचं भव्य स्वागत (ETV Bharat Reporter)


अनेक आव्हानं, पण जिद्द कायम : अथांग सागर, पावसामुळं खराब वातावरण, वारे आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटा डॉल्फिन, शार्क, जेलिफिशसारख्या महाकाय आणि धोकादायक समुद्री जीवांचा धैर्यानं सामना करत नागपूरची दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेनं अतिशय कठीण, आव्हानात्मक असणारी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) ही 38 किमी अंतराची पाल्कची सामुद्रधुनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ईश्वरी ही ऐतिहासिक मोहीम फत्ते करणारी जगातील प्रथम दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे.

निसर्गानं तिची खूप परीक्षा घेतली - कोच : ईश्वरीचे प्रशिक्षक संजय बाटवे यांनी त्यांच्या शिष्येनं केलेल्या विश्वविक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "ईश्वरीचा पराक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या मोहिमेदरम्यान तिला अनेक अडचणी व समस्यांना तोंड द्यावं लागलं. निसर्गानंही तिची खूप परीक्षा घेतली. पाऊस, वारा आणि भयंकर लाटांचा तिला प्रचंड त्रास झाला. त्यामुळं इव्हेंट सुरु व्हायला तब्बल चार तास उशिर झाला. अखेर श्रीलंका सरकारकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ईश्वरीनं तलाईमन्नार जेट्टी येथील समुद्रात उडी घेतली. 11 तास 15 मिनिटं मॅरेथॉन स्विमिंग करत दुपारी 3.15 वाजता तिनं भारताचे टोक असलेले धनुष्कोडी गाठलं."


अनेकांचे मदतीचे हात आणि ईश्वरीची कमाल : या अभियानात ईश्वरीसोबत नागपूरचे अनुभवी जलतरणपटू इशांत पांडे, रवींद्र तरारे, भावी राजगिरे, संदीप वैद्य, शंकर आष्टणकर, विलास फाले व डॉ. नीरव पंड्या यांनी 'पेस स्विमर' म्हणून भूमिका पार पाडली. तसंच वैद्यकीय टीममध्ये डॉ. अभय राजगिरे, निरीक्षक म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक विजयकुमार, तमिळनाडू जिल्हा जलतरण संघटनेचे जयकुमार आणि आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे उपस्थित होते. नागपूरातील आशिर्वादनगर, हुडकेश्वर इथं राहणाऱ्या ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर असून, आई अरुणा पांडे गृहिणी आहेत.

हेही वाचा :

  1. जिद्दीनं डोळस असलेली ईश्वरी 38 किमीची सामुद्रधुनी करणार पार; जागतिक विक्रमाकरिता कसून तयारी सुरू
  2. ऐतिहासिक...! पिता-पुत्रांनी एकत्रित पूर्ण केली खडतर आयर्नमॅन स्पर्धा; विक्रमी वेळेत केली विजयी कामगिरी
  3. जिद्दीला सलाम! दोन्ही हात-पाय नसलेल्या पायलनं वर्ल्ड आर्चरीत जिंकलं 'गोल्ड मेडल'