ETV Bharat / sports

नवख्या देशाच्या क्रिकेटपटूनं रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला; 60 सामन्यातच केला महापराक्रम

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार करणबीर सिंगनं 28 जून रोजी हंगेरीविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या 57 चेंडूंमध्ये 164 धावा करुन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

New Sixer King
नवख्या देशाच्या क्रिकेटपटूनं रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : July 3, 2026 at 3:27 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

New Sixer King : ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार करणबीर सिंगनं 28 जून रोजी हंगेरीविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या 57 चेंडूंमध्ये 164 धावा करुन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आपल्या या खेळीत करणबीर सिंगनं 18 चौकार आणि 12 षटकार मारले. यासह, करणबीर सिंगनं आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहितच्या नावावर एकूण 205 षटकार होते. आता, करणबीर सिंगनं या यादीत रोहितला मागे टाकत एकूण 207 षटकारांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

करणबीर सिंगनं केवळ 60 सामन्यांमध्ये केला पराक्रम : रोहित शर्मानं एकूण 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात 151 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्यानं 32.05 च्या सरासरीनं 4231 धावा केल्या आणि 200 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो पहिला खेळाडू ठरला. ऑस्ट्रियाचा कर्णधार करणबीर सिंगनं केवळ 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्माला मागे टाकलं. त्यानं 59 डावांमध्ये फलंदाजी करत 48.71 च्या सरासरीनं 2533 धावा केल्या आणि 207 षटकार मारले. करणबीर सिंगनं आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतकं आणि 20 अर्धशतकंही झळकावली आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू :

  • करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) - 207 षटकार
  • रोहित शर्मा (भारत) - 205 षटकार
  • मोहम्मद वसीम (यूएई) - 196 षटकार
  • सूर्यकुमार यादव (भारत) - 179 षटकार
  • जोस बटलर (इंग्लंड) - 175 षटकार

ऑस्ट्रियानं उभारली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या : हंगेरीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात, ऑस्ट्रियानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 322 धावा केल्या. कर्णधार करणबीर सिंगनं 164 धावा केल्या, तर अब्दुल्ला कोटवानंही अवघ्या 26 चेंडूंमध्ये 93 धावा केल्या. यासह, ऑस्ट्रियानं आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. या यादीत झिम्बाब्वे संघाचा समावेश आहे, ज्यांनी 2024 साली गाम्बियाविरुद्ध 344 धावा करुन हा पराक्रम केला होता.

हेही वाचा :

  1. स्वित्झर्लंडचा अल्जेरियावर सहज विजय; 'राऊंड ऑफ 16' साठी 13 संघ ठरले, तीन जागांसाठी 6 संघ शर्यतीत
  2. Wimbledon 2026: जोकोविचनं ग्रीसच्या खेळाडूला 98 मिनिटांत हरवलं; सिनरचाही पुढच्या फेरीत प्रवेश
  3. रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल, पोर्तुगालचा शेवटच्या क्षणी विजय; क्रोएशियन चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या