ETV Bharat / sports

ODI मालिकेत विश्वविजेत्या टीम इंडियाचा सुपडासाफ; तिसऱ्या वनडेत कांगारुंचा 185 धावांनी विजय

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियानं शेवटच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 185 धावांनी दारुण पराभव केला.

INDW Lost to AUSW
टीम इंडिया (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 1, 2026 at 6:47 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

होबार्ट INDW Lost to AUSW : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज होबार्ट इथं खेळला गेला. भारतीय महिला संघ मालिकेत 2-0 ने पिछाडीवर होता. चाहत्यांना आशा होती की टीम इंडिया अंतिम सामना जिंकून सन्मान वाचवेल. मात्र, ऑस्ट्रेलियानं शेवटच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा 185 धावांनी दारुण पराभव करुन त्यांच्या जखमांवर मीठ चोळले. भारतीय महिला संघाचा वनडे मालिकेत 3-0 नं व्हाईटवॉश झाला.

ऑस्ट्रेलियानं जिंकला तिसरा वनडे सामना : होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघानं 409 धावांचा डोंगर उभारला. कांगारुंकडून शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या एलिसा हिलीनं 158 धावांची धमाकेदार खेळी केली. तर जॉर्जिया वॉलनं 62 धावा केल्या, तर बेथ मुनीनं 106 धावा केल्या. टीम इंडियासाठी 410 धावांचं लक्ष्य सोपं नव्हतं आणि ते पूर्णपणे अपयशी ठरले.

भारतीय फलंदाज सपशेल अपयशी : ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 410 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारताची सलामीवीर स्मृती मंधाना शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. जेमिमा रॉड्रिग्जनं 42 धावा केल्या आणि स्नेह राणानंही 44 धावा केल्या, पण नियमित अंतरानं विकेट पडत राहिल्या. परिणामी, टीम इंडिया 45.1 षटकांत 224 धावांवर ऑलआउट झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियानं 185 धावांनी व्यापक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंगनं चार, तर जॉर्जिया वेअरहॅमने दोन विकेट घेतल्या. कांगारुंनी मालिका 3-0 अशी जिंकली.

टीम इंडिया कसोटी सामना जिंकून बदला घेण्याचा प्रयत्न करेल : भारतानं या दौऱ्यात टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियन संघानं वनडे मालिकेत भारतीय महिला संघाचा पराभव केला. दोघांनीही प्रत्येकी एक मालिका जिंकली आहे. आता, 6 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमध्ये एक कसोटी सामना होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. टीम इंडियानं टी-20 मालिका जिंकली, तर कांगारूंनी वनडे मालिका जिंकली. आता भारतीय महिला संघ कसोटी सामना जिंकून हा दौरा संस्मरणीय बनवू इच्छितो आणि वनडे सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :

  1. टी-20 विश्वचषकावर अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम; ICC नं उचललं मोठं पाऊल
  2. IND vs WI निर्णायक सामना पावसामुळं रद्द होणार? कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकिट?
  3. न्यूझीलंडला श्रीलंकेकडून सेमीफायनलचं तिकिट 'गिफ्ट'; पाकिस्तान विजय मिळवूनही बाहेर