निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; T20 मालिकेत बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला.

Published : February 19, 2026 at 5:21 PM IST
कॅनबेरा AUSW Beat INDW : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळवण्यात आला. यजमान संघानं हा सामना 19 धावांनी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं 20 षटकांत 5 बाद 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाचा डाव 20 षटकांत 9 बाद 144 धावांवर मर्यादित राहिला. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 21 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
Australia win the 2nd T20I by 19 runs.#TeamIndia will aim to bounce back in the series decider on Saturday.
— BCCI Women (@BCCIWomen) February 19, 2026
Scorecard ▶️ https://t.co/8prXc1p5fJ#AUSvIND pic.twitter.com/2dSdGdcQbB
कांगारुंची प्रथम फलंदाजी : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघानं उत्कृष्ट कामगिरी करत निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या. त्यांची सलामीची जोडी प्रभावी होती, जॉर्जिया वॉलनं 88 धावा आणि बेथ मुनीनं 46 धावा केल्या. या सामन्यात भारतीय महिला गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर अरुंधती रेड्डीनं तिच्या चार षटकांत 30 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. तर रेणुका ठाकूरनंही एक बळी घेतला.
टीम इंडियाची फलंदाजी अपयशी : धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सलामी जोडी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करत शानदार सुरुवात केली. शफाली 29 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर भारतानं जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मंधाना यांचे बळी झटपट गमावले. 71 धावांवर तीन विकेट गमावल्यानंतर, हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली, ज्यामुळं एकवेळ भारताला आरामदायी विजय मिळेल असं वाटत होतं. मात्र हरमनप्रीत कौर 36 धावांवर बाद झाल्यानंतर, ठराविक अंतरानं विकेट पडल्या. ज्यामुळं भारताला 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून अॅशले गार्डनरनं तीन विकेट घेतल्या, तर अॅनाबेल सदरलँड, किम गार्थ आणि सोफी मोलिनेक्सनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
हेही वाचा :

