ETV Bharat / sports

फलंदाजीचा नवा सुलतान! जो रुटनं 41व्या कसोटी शतकासह केली पॉन्टिंगची बरोबरी; सचिनचा विक्रमही आता जवळ

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंडकडून जो रुटनं शानदार शतक झळकावलं. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Joe Root Hits 41st Test Hundred
जो रुट (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : January 5, 2026 at 9:55 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सिडनी Joe Root Hits 41st Test Hundred : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रुटनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रुटनं शतक झळकावलं. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुटनं 242 चेंडूत 160 धावा केल्या, ज्यामध्ये 15 चौकारांचा समावेश होता. रुटनं 146 चेंडूत आपलं शतक पूर्ण केले. हे रुटचं 41 वं कसोटी शतक होतं.

सर्वाधिक शतकाच्या यादीत तिसऱ्या स्थानावर : जो रुट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. रुटनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 41 शतकं केली होती. फक्त जॅक कॅलिस आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या दोघांपेक्षा जास्त कसोटी शतकं झळकावली आहेत. कॅलिसनं या फॉरमॅटमध्ये 45 शतकं झळकावली आहेत आणि सचिननं 51 शतकं झळकावली आहेत. रुटनं तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज असल्याचं दाखवून दिलं आहे. सक्रिय फलंदाजांमध्ये, स्टीव्ह स्मिथ (36) आणि केन विल्यमसन (33) रुटपेक्षा खूप मागे आहेत.

एका टोकाला स्थिर फलंदाजी : पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपल्यानंतर जो रुट 72 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशी, सुधारित गोलंदाजी आणि असमान खेळपट्टी असूनही त्यानं कोणताही धोका न पत्करता आपला डाव सुरु ठेवला. दुसऱ्या टोकाला हॅरी ब्रूक (84), बेन स्टोक्स (0) आणि जेमी स्मिथ (46) यांच्या विकेट पडल्या, परंतु रुटनं आपला संयम राखला आणि एक संस्मरणीय डाव खेळण्यात यश मिळवलं.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं :

  • 51 - सचिन तेंडुलकर (भारत)
  • 45 - जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • 41 - रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)
  • 41* - जो रुट (इंग्लंड)
  • 38 - कुमार संगकारा (श्रीलंका)

श्रीलंकेच्या जयवर्धनेलाही टाकलं मागे : इतकंच नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये ही त्याची 17वी 150+ खेळी आहे. या यादीत त्यानं महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150+ धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं कसोटीत 20 वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. ब्रायन लारा आणि कुमार संगकारा यांनी 19 वेळा ही कामगिरी केली. डॉन ब्रॅडमननं 18 वेळा कसोटीत 150+ धावा केल्या. त्यानंतर जो रुटचा क्रमांक लागतो, त्यानं 17 वेळा ही कामगिरी केली आहे. जयवर्धनेनं 16 वेळा ही कामगिरी केली आहे. आता रुटच्या पुढं सचिन, लारा, संगकारा आणि डॉन ब्रॅडमन आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150+ डाव खेळणारे फलंदाज :

  • 20 - सचिन तेंडुलकर
  • 19 - ब्रायन लारा
  • 19 - कुमार संगकारा
  • 18 - डॉन ब्रॅडमन
  • 17 - जो रूट
  • 16 - महेला जयवर्धने
  • 15 - रिकी पॉन्टिंग

जो रुटला सचिनचा विश्वविक्रम मोडण्याची संधी : सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही आहे. सचिननं 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. जो रुटनं आतापर्यंत 163 कसोटी सामन्यांमध्ये 13,928 धावा केल्या आहेत. आता, रुट आणि सचिनमधील अंतर 2000 धावांपेक्षा कमी आहे. जर रुटचा फॉर्म काही काळ चालू राहिला तर तो सचिनचा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडू शकतो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानं त्याच्या कारकिर्दीत एकूण 51 कसोटी शतके झळकावली. दुसरीकडे, इंग्लंडचा जो रुट सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानं आतापर्यंत एकूण 41 कसोटी शतकं झळकावली आहेत. आता, जर रुटला तेंडुलकरचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला येत्या काळात आणखी 11 शतकं झळकावावी लागतील.

हेही वाचा :

  1. व्वा रे BCCI चा न्याय! VHT मध्ये 5 सामन्यात 514 धावा करणाऱ्या खेळाडूला दिलं नाही संघात स्थान
  2. वादाच्या पार्श्वभूमीवर टी-20 विश्वषचकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा; 'हा' खेळाडू बनला कर्णधार
  3. रुट-ब्रूकनं ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षेवर फेरलं 'पाणी'; खराब हवामानानं पहिल्या दिवसाच्या खेळात व्यत्यय