ETV Bharat / sports

शर्माजीच्या पोराकडून षटकारांचा 'अभिषेक'; इंग्रजांविरुद्ध 4 सिक्सर मारत केला विश्वविक्रम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, भारतीय फलंदाज अभिषेक शर्मानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं नवा विश्वविक्रम केला.

Abhishek Sharma
अभिषेक शर्मा (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : July 2, 2026 at 12:07 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चेस्टर-ली-स्ट्रीट Abhishek Sharma : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, भारतीय फलंदाज अभिषेक शर्मानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं एक असा विक्रम रचला, जो जगातील अव्वल पॉवर हिटर्सनाही साधता आला नव्हता. भारताच्या खराब सुरुवातीदरम्यान, अभिषेकनं केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाचा डाव सावरला नाही, तर पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 षटकार मारणारा फलंदाजही ठरला.

कठीण काळात डाव सावरला : चेस्टर-ली-स्ट्रीट इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु सुरुवातीच्या षटकांमध्ये संजू सॅमसन आणि इशान किशन बाद झाल्यानं संघावर दबाव आला. अशा कठीण परिस्थितीत, अभिषेक शर्मानं सूत्रं हाती घेतली आणि इंग्लिश गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानं फिरकी गोलंदाज लियाम डॉसनच्या गोलंदाजीवर एक शानदार षटकार मारला, त्यानंतर साकिब महमूदच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारुन आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 षटकार पूर्ण केले. हा टप्पा गाठण्यासाठी अभिषेकनं केवळ 785 चेंडूंचा सामना केला, ज्यामुळं पूर्ण सदस्य राष्ट्राच्या फलंदाजानं सर्वात जलद 100 षटकार मारण्याचा विक्रम केला. या विक्रमासह, त्यानं वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज एविन लुईसचा विक्रम मोडला, ज्यानं 789 चेंडूंमध्ये 100 टी-20 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 षटकार मारणारे फलंदाज :

  • 785 चेंडू - अभिषेक शर्मा
  • 789 चेंडू - एविन लुईस
  • 871 चेंडू - फिन ॲलन
  • 931 चेंडू - टिम डेव्हिड

अभिषेकनं झळकावलं वादळी अर्धशतक : प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची डावाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि इशान किशन दोन षटकांच्या आत बाद झाले. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर, अभिषेकनं झटपट धावा केल्या आणि इंग्लिश गोलंदाजांची लय बिघडवली. त्यानं अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि 200 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सामन्याचं चित्रच पालटलं. मात्र, सॅम करननं त्याची ही स्फोटक खेळी संपुष्टात आणली. अभिषेकनं 24 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांसह 59 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळं भारतानं 10 षटकांत 3 गडी गमावून 99 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. शेवटच्या 5 मिनिटांत तीन गोल! 0-2 नं पिछाडीनंतरही बेल्जियमनं जिंकला सामना
  2. हॅरी केननं मिळवून दिला इंग्लंडला विजय! फिफा विश्वचषकातील मोठा अपसेट थोडक्यात हुकला
  3. 24 वर्षांनी यजामन अमेरिकेनं जिंकला सामना; 'राऊंड ऑफ 16' स्थान पक्कं