यंदा मकर संक्रांत आणि एकादशीचा दुर्मीळ योग; काय आहे शुभ मुहूर्त आणि मकर संक्रांतीचं वाहन?
नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे 'मकर संक्रांत' (Makar Sankranti 2026) यादिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळं या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.

Published : January 10, 2026 at 5:37 PM IST
हैदराबाद : महाराष्ट्रात 'मकर संक्रांत' (Makar Sankranti 2026) हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2026 मध्ये मकर संक्रात 14 जानेवारी, बुधवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळं 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. यंदा मकर संक्रांत आणि एकादशी तिथीचा देखील शुभ संयोग होत आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग : यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आहे. त्यामुळं यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपाही लाभणार आहे. म्हणूनच, यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीलाच साजरी केली जाईल.
का आहे मकर संक्रांत महत्त्वाची? : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो.
काळ्या रंगाचं महत्त्व : मकर संक्रांतच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत ही थंडीमध्ये असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे. म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल, तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून ‘क्षमा करुया आणि विसरून जाऊया' हा संदेश देण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीची वैशिष्ट्ये?
- सूर्याचे राशी परिवर्तन - यादिवशी, सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जातो. श्रद्धेनुसार, हा काळ सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि शुभ परिणाम दर्शवितो.
- परंपरा आणि विधी - यादिवशी देशभरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात.
- पवित्र स्नान - गंगा, यमुना आणि गोदावरी सारख्या नद्यांमध्ये स्नान करणं पवित्र कार्य मानलं जातं.
- सूर्यपूजा - उगवत्या सूर्याची पूजा करणे आणि अर्घ्य देणे (पाणी) ही एक प्राचीन परंपरा आहे, जी आरोग्य, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी केली जाते आणि 'ॐ सूर्याय नमः' सारख्या मंत्रांचा जप केला जातो.
- दान - अन्न, कपडे, तीळ आणि गूळ दान करणे शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीचे वाहन कोणते? : पंचांगानुसार, यंदाच्या मकर संक्रांतीचे नाव 'नंदा' असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी दिसून येत आहे. तर संक्रांतीचे वाहन घोडा (अश्व) असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचं प्रतीक आहे, तर सिंह पराक्रमाचं प्रतीक आहे. यामुळं जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज आहे.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)

