आकाशात दुहेरी थरार! मंगळवारी ग्रहणातच चंद्राचा उदय, मुंबईत 3 मिनिटे, पुण्यात 7 मिनिटे दिसणार !
सध्या प्रसार माध्यमातून चंद्रग्रहणाविषयी भीती दाखविली जाते, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

Published : March 3, 2026 at 9:23 AM IST
|Updated : March 3, 2026 at 10:32 AM IST
ठाणे- आकाशात दुहेरी थरार अनुभवयास मिळणार आहे. येत्या मंगळवारी 3 मार्चला ग्रहणातच चंद्राचा उदय होताना आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. मंगळवारी सायंकाळी 6.48 वाजता या एकाच वेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण दिसणार आहे, असे खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक आविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे. सध्या काही प्रसार माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती दाखविली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती करून द्यायला पाहिजे, असंही ते म्हणालेत.
चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही : जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते, तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो, तेव्हा तेथून ते चंद्रग्रहण दिसते. मंगळवार 03 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता चंद्र ग्रहणास प्रारंभ होणार आहे, परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. तो पूर्व क्षितिजाखाली असेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. मंगळवारी सायंकाळी 6.48 वाजता या एकाच वेळी ग्रहण सुटणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे चंद्रग्रहण दिसणार आहे. मुंबई येथे चंद्रोदय सायंकाळी 6.45 वाजता होणार आहे. ग्रहण सायंकाळी 6.48 वाजता सुटणार आहे. म्हणजे मुंबईत फक्त तीन मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे. पुणे 6.41, नाशिक 6.40, कोल्हापूर 6.40, नागपूर 6.18, सोलापूर 6.33, रत्नागिरी 6.44, छत्रपती संभाजी नगर 6.34 वाजता चंद्रोदय होणार आहे. सर्वत्र चंद्रोदयापासून 6.48 वाजेपर्यंत चंद्रग्रहण दिसणार आहे.
ग्रहण शुभ असून, होळीचा बेरंग नाही : ग्रहण वेध काळात धुलिवंदन करता येते. होळीचा रंगांचा सण साजरा करता येतो. अनेकांना शंका असते की, " आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे?" मात्र जे लोक चंद्रग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे, कारण आलेल्या संधीचा त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी उपयोग करून घ्यावा," असेही सोमण म्हणाले.
हेही वाचाः
इस्रायल इराण युद्ध : दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत आडकला रायगडमधील उत्कर्ष मपारा

