'संजय राऊतांवर स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला, प्राजक्त तनपुरेंच्या तिकीटावरुन राष्ट्रवादी नाराज?
विधान परिषद निवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

Published : June 1, 2026 at 5:03 PM IST
अहिल्यानगर - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सचिन जगताप हे इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजय राऊत यांच्यावर केली टीका - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना - उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "संजय राऊत यांच्यावर स्वतःच्या पक्षालाच श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली," असा जहरी टोला विखे पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, मी स्वतः आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. ते कुठलीही वेगळी भूमिका घेणार नाहीत.
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. इतर कोणतेही आरक्षण काढून मराठा समाजाला देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कोणत्याही समाजाने गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
संधीचं नक्कीच सोनं करेन - प्राजक्त तनपुरे : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी भाजपा नेतृत्वाचे आभार मानत प्रतिक्रिया दिली. भाजपाने मला मोठी संधी दिली आहे. या संधीचं नक्कीच सोनं करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट करत राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान चर्चा झाली होती. त्यानंतर कोणताही संपर्क किंवा चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - सुजय विखेंचा डबल स्ट्राईक; प्राजक्त तनपुरे भाजपामध्ये, सुप्रिया सुळे, जयंत पाटील म्हणाले...

