ETV Bharat / politics

एकच नारा म्हणत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करत नेमका कोणाला इशारा? नारायण राणेंचं आज सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन

नारायण राणेच्या शक्‍तिप्रदर्शनापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बॅनर लागले असून, यात एकच नारा यातून नारायण राणे हे नावाचे संबोधन होत असतानाच एकच नारा असा इशारा दिलाय.

Narayan Rane in Sindhudurg
नारायण राणेंचं आज सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 9:43 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

सिंधुदुर्ग: माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत असून, रविवारी मुंबईहून गोवामार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. गोवा ते कणकवली असे गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्‍तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. नारायण राणेच्या शक्‍तिप्रदर्शनापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बॅनर लागले असून, यात एकच नारा यातून नारायण राणे हे नावाचे संबोधन होत असतानाच एकच नारा असा इशारा, असं म्हणत अप्रत्यक्ष पद्धतीनं त्यांनी स्वपक्षीयांनाच इशारा दिला नाही ना, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

खासदार नारायण राणे हे 4 जानेवारीला सिंधुदुर्गात : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांनतर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे हे 4 जानेवारीला सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्‍यांचे बांदा ते कणकवलीपर्यंत शक्‍तिप्रदर्शनाद्वारे भव्य स्वागत होणार आहे. त्‍याचबरोबर कणकवलीतील सभेत राणे काय भूमिका घेणार, काय बोलणार? याकडे संपूर्ण जिल्‍हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. महत्त्वाची बाब म्‍हणजे वेगवेगळ्या पक्षात असलेले राणेंचे हितचिंतक राणेंच्या स्वागतासाठी किंबहुना सिंधुदुर्ग हा बाकी कुणाचाच नाही तर फक्‍त नारायण राणे यांचाच आहे हे दाखवून देण्यासाठी एकवटले आहेत.

बांदा येथे भव्य स्वागत झाल्‍यानंतर कणकवलीपर्यंत स्वागत होणार : गेले दोन दिवस राणे समर्थकांच्या मालवण, कुडाळ येथे बैठका झाल्यात. यात सिंधुदुर्गात दाखल होणारे खासदार नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचेही या उद्याच्या रॅलीमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. बांदा येथे भव्य स्वागत झाल्‍यानंतर कणकवलीपर्यंत ठिकठिकाणीही त्‍यांचे भव्य स्वागत होणार आहे. यानंतर कणकवलीतील उपजिल्‍हा रुग्‍णालयासमोरील पटांगणात भव्य सभा होणार आहे. सिंधुदुर्गात नुकत्‍याच तीन पालिका आणि एक नगरपंचायतीची निवडणूक झाली. यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपालिका पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्‍वाखाली भाजपा पक्षाने जिंकली तर मालवण नगरपरिषद आमदार निलेश राणे यांनी सहज जिंकली. तर अटीतटीच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत त्‍यांनी शहर विकास आघाडीचे नेतृत्‍व करून निलेश राणेंनीही नगरपंचायत शहर विकास आघाडीच्या ताब्‍यात दिली. त्‍यामुळे पालिका निवडणुकांत राणे फॅक्‍टरच चालणार हे अधोरेखित झाले. किंबहुना पालिका निवडणुकांत खासदार नारायण राणे नसले तरीही सिंधुदुर्गात राणेंचाच करिष्मा चालणार हे राणे बंधूंसह त्‍यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले.

राणेंची प्रचंड इच्छा असताना देखील सिंधुदुर्गात महायुती झाली नाही : खासदार नारायण राणे यांना तत्‍कालीन शिवसेनेत डावलले जात असल्‍याने त्‍यांनी शिवसेना सोडली होती. त्‍यानंतर काँग्रेसमध्येही त्‍यांनी बंड केले होते. तर भाजपा प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांनी स्वकर्तृत्‍वावर केंद्रात मंत्रिपदही मिळविले होते. एवढ्या प्रचंड ताकदीच्या नेत्‍याला यंदाच्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांत मात्र बाजूला ठेवण्यात आले. राणेंची प्रचंड इच्छा असताना देखील सिंधुदुर्गात महायुती झाली नाही. किंबहुना काही नेत्‍यांनी महायुती होण्यास खोडा घातला. लगतच्या रत्‍नागिरी जिल्ह्यात महायुती झाली. राज्‍यात अनेक जिल्ह्यात महायुती झाली. पण सिंधुदुर्गात तसे झाले नाही. त्‍यानंतर आता आगामी जिल्‍हा परिषद निवडणुकांमध्येही महायुती न होता स्वबळावर लढण्यासाठी तयार सुरू झालीय. त्‍यामुळे राणे समर्थकांमध्ये प्रचंड रोष आहे. एवढी वर्षे एकत्र काम केलेल्‍या राणे समर्थकांना आता परस्पर विरोधात संघर्ष करावा लागणार हे पटलेले नाही. त्‍यामुळेच जिल्ह्यातील सर्व पक्षात असलेले राणे समर्थक आता पुन्हा एकदा खासदार नारायण राणेंच्या नेतृत्‍वाखाली एकवटले असून, उद्या भव्य शक्‍तिप्रदर्शनाद्वारे त्‍याची प्रचिती आणून दिली जाणार आहे.

हेही वाचाः