बिनविरोधसाठी पोलिसानंच उमेदवाराला नेलं एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर; ठाकरेंची शिवसेना अन् मनसेचा आरोप, व्हिडिओ दाखवला
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडण्यासाठी पोलीस आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.

Published : January 4, 2026 at 8:36 PM IST
ठाणे : राज्यात तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहा साथीदारांना बिनविरोध निवडून आणण्यात सरकारी यंत्रणांसह पोलिसांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे (उबाठा) नेते माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. दरम्यान, निवडणुका जिंकता येत नसलेल्या नेत्यांना आमच्यावर आरोप करण्याचा काहीही अधिकार नसल्याचं सांगत शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी वरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
बंगल्यावर बोलावून धमकावलं : अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'शुभदिप' या बंगल्यावर नेत असल्याचा व्हिडिओ यावेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केला. दरम्यान, "प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंगल्यावर बोलावून आमिष दाखवणं तसंच धमकावणं या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी," अशी आग्रही मागणी शिवसेना - उबाठा आणि मनसेनं केली.
मोबाईलची तपासणी व्हायला हवी : "ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीनं अर्ज बाद करत, पैशांचे आमिष दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहा साथीदारांना बिनविरोध निवडून आणण्यात आलं," असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेनं केला. या संदर्भातील माहिती देताना राजन विचारे म्हणाले, "निवडणुकीत राज्यभरात 336 अर्ज अधिकाऱ्यांनी बाद केले असून, तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बंगल्यावर बोलावून आमिष देत एकनाथ शिंदे यांचे साथीदार बिनविरोध निवडण्याचे अर्धेअधिक काम निवडणूक अधिकाऱ्यांनीच केले. त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मोबाईलची तपासणी व्हायला हवी."
असा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला : मनी आणि मसलचा वापर करून निवडणूक बिनविरोध करणे हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला असून, सत्ताधाऱ्यांनी हा नवा फंडा सुरू केलाय. हे बिनविरोध उमेदवार बाद करण्याची आग्रही मागणी राजन विचारे यांनी केली. ठाणे महापालिका यांनी लुटून खाल्ली हे सत्ताधारी भाजपाच्या आमदारानंच विधिमंडळात मांडल्याची आठवण करून देत आता ड्रग्जच्या माध्यमातूनही माया गोळा केली. या ड्रग्जचा केंद्रबिंदू साताऱ्यात आणि ठाण्यात असल्याचा आरोप विचारे यांनी केला.
शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी आरोप फेटाळले : "राजन विचारे हे वैफल्यग्रस्त असल्याचं दिसत आहे. सातत्यानं ते निवडणुकांमध्ये पराभूत होत असल्यानं ते अशाप्रकारचे आरोप करत आहेत. ते कधी घराबाहेर पडले नाहीत. कधी कार्यकर्ते् जमवले नाहीत. आर्यभट्टानं शून्यााचा शोध लावला, त्या शून्याचा शोध पुढं नेण्याचं काम महाविकास आघाडी ठाण्यात करत आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळंच राजन विचारे हे आमदार, खासदार झाले. यांना ठाण्यात उमेदवार सुद्धा भेटत नव्हते. आता यांना लोक घरी बसवणार हे नक्की. यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पत्रकार परिषदेमधील विचारे यांची देहबोली ही पराभव झाल्यासारखीच आहे," असं म्हणत शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
बंगल्यावरचे व्हिडिओ दाखवले : अर्ज माघारी दिवशी शिवसेना - उबाठा पक्षाच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यानं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर नेत असतानाचे व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवले. अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्यात झालेल्या आर्थिक उलाढालीतील पैसा साताऱ्याच्या त्या ड्रग प्रकरणातून आल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
निवडणूक कार्यालयावर मनसे स्टाईल धडक : दोन दिवसात हे निवडणूक अधिकारी बदलून नवीन अधिकारी नेमावेत, अन्यथा निवडणूक कार्यालयावर मनसे स्टाईल धडक देणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
गद्दारांना क्षमा नाही : "पालिका निवडणुकीत शिवसेना - उबाठा, मनसे पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही. पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत. निवडणुका संपताच ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा पाहुणचार आम्ही घेणारच," असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी दिलाय.
हेही वाचा -

