तटकरेंसोबत प्रफुल्ल पटेलांनीही घेतली शरद पवार यांची भेट; रोहित पवार यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबतच राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.


Published : May 16, 2026 at 1:46 PM IST
मुंबई - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्याचा विषय अजित पवार असताना होता. आता आमच्याकडून तो विषय बाजूला ठेवण्यात आला आहे.” सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे शरद पवारांशी जुने संबंध असल्याचे सांगत त्यांनी अलीकडेच दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं नमूद केलं. “त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे माहिती नाही. पक्ष एकत्र करायचा की पुढे काय करायचं, हा निर्णय शरद पवार यांचाच असेल,” असं रोहित पवार म्हणाले. “माझा स्वभाव लढणारा आहे. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. पक्ष एक होणार असेल तरी मी संघर्षाची भूमिका कायम ठेवेन,” अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्रात दररोज 24 बलात्कार; महिला सुरक्षेवरून सरकारवर टीका - पुण्यातील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात दररोज जवळपास 24 बलात्काराच्या घटना घडत आहेत, म्हणजेच प्रत्येक तासाला एक बलात्कार होत असल्याचा दावा त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 2025 मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत 13 हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय विनयभंग आणि महिलांवरील अत्याचाराची 50 हजारांपेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. राज्यात तब्बल दीड लाख महिला आणि तरुणी बेपत्ता असून त्यापैकी सुमारे 30 हजार जणींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असा दावा त्यांनी केला.
राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. “गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलीस दलाचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि व्हीआयपी सुरक्षेसाठी केला जात आहे,” असं ते म्हणाले.
बदलापूर, चाकण, बीड, गोंदिया, बारामती आणि मावळ येथील घटनांचा उल्लेख करत त्यांनी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये 90 दिवस उलटल्यानंतरही आरोपपत्र दाखल झाले नसल्याचा आरोप केला. पीडितांना न्याय मिळवून देण्यात दिरंगाई होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा...

