पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय, सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेला पार्थ यांनी दांडी मारल्यानं चर्चांना उधाण
16 मार्चला महाराष्ट्रातील सात रिक्त जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.

Published : February 26, 2026 at 10:43 PM IST
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या कार्यक्रमाला पार्थ पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
राज्यसभेसाठी पार्थ पवार यांची निवड - गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील सात रिक्त जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे पार्थ पवार यांना राज्याच्या राजकारणाऐवजी थेट दिल्लीतील संसदीय राजकारणात संधी देण्याचं निश्चित झालं आहे.
अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण - सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या कार्यक्रमात पार्थ पवार दिसून न आल्यानं विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. संघटनेत त्यांना मोठी जबाबदारी, विशेषत: राष्ट्रीय महासचिवपद दिले जाईल, अशी चर्चा आधीपासून होती. मात्र महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिल्यानं प्रश्न उपस्थित झाले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रफुल पटेल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास
• राजकारणात प्रवेश (2019): 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून पार्थ पवार यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले.
• पहिली निवडणूक आणि पराभव : मावळ मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली; मात्र शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
• संघटनात्मक कामात सक्रिय : त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक लढवली नाही; परंतु पक्षाच्या संघटनात्मक आणि धोरणात्मक कामात ते सक्रिय राहिले.
• पडद्यामागील भूमिका : प्रचार नियोजन, रणनीती आखणी आणि बैठकींमध्ये त्यांचा सहभाग कायम राहिला.
राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार संसदीय राजकारणात नवी सुरुवात करणार आहेत.
हेही वाचा...

