ETV Bharat / politics

गोकुळमध्ये बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार; सतेज पाटलांचा हल्ला, म्हणाले 'गोकुळ दूध संघ गुजरातला द्यायचा...'

गोकुळ निवडणुकीवरुन कोल्हापुरातील राजकारण तापलं आहे. महायुती विरुद्ध सतेज पाटील अशी लढत होत आहे.

MLA Satej Patil on gokul
माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 30, 2026 at 5:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी महायुतीकडे नेत्यांची फौज असताना दुसरीकडे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडीकडून मंगळवारी 1851 ठराव दाखल करून ताकद दाखवली, तर अजून दोन महिने निवडणुकीला अवकाश आहे. या काळात गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार असल्याचेही आमदार सतेज पाटील म्हणाले. शक्तीप्रदर्शन करत महायुतीसमोर आमदार पाटील यांनी आव्हान उभ केलं आहे.

जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारं प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. जिल्ह्यातील प्राथमिक दूध संघाचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, जनस्वराज्य शक्ती पक्ष यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल केले. महायुतीच्या ठरावाची संख्या 5 हजारावर झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गोकुळमधील मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची आघाडी संपुष्टात आली. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या वतीने जिल्ह्यातून 1851 ठराव दाखल करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीत पाटील, गोपाळ पाटील, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल पाटील, सदाशिव चरपाले, शशिकांत पाटील, अभिजीत तायशेटे, अंजली रेडेकर, उपस्थित होते.

बिनविरोधाचा प्रस्ताव आलेला नाही, आल्यास चर्चा करू - जिल्ह्यातून आलेल्या गोकुळ दूध संघाच्या ठराव धारकांना मार्गदर्शन करताना काँग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले, "एकीकडे महायुतीची प्रचंड सत्ता आणि नेते एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आम्ही गेल्या पाच वर्षात केलेला कारभार, म्हशीच्या दुधाला 14 रुपये आणि गायीच्या दुधाला दिलेली 10 रुपयांची दरवाढ यासह गोकुळच्या ठेवींमध्ये वाढ व्हावी म्हणून जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यामुळे दूध उत्पादकांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो." "पुढच्या काळात पशुखाद्यात शंभर रुपयांची कपात केली जाईल," अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली, तर गोकुळ निवडणुकीत लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल. निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आल्यास आपण चर्चा करू, असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.

उमेदवारी कोणाला द्यायची, बैठकीत ठरलं होतं - "राज्याच्या विधान परिषदेमध्ये आमच्याकडे बहुमत नाही. मात्र, बैठकीत अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज उपसभापती पदासाठी भरण्यावर एकमत झालं होतं. आज अचानकपणे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले सचिन अहिर यांचा उपसभापती पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याची माहिती अनिल परब यांनी मला दिली. मलाही याचा धक्का बसला," अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.

गोकुळ दूध संघ गुजरातला द्यायचा नसेल तर... - "गोकुळ काही लोकांमुळे गुजरातला जायची शक्यता आहे. कोल्हापूरच्या मातीत स्थापन झालेला हा संघ जरी गुजरातला गेला तरी सरकारला जाब विचारण्याची हिंमत जिल्ह्यातील कोणत्याही महायुतीच्या नेत्यांकडे नाही. एकीकडे राज्याचा दूध संघ असलेला 'महानंदा' बंद पडला तर आता कर्नाटकातून नंदिनी आणि गुजरातकडून अमुल असं दुहेरी आक्रमण गोकुळवर होत आहे. हे थांबवायचं असेल तर समविचारी आघाडीला बळ द्या," असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केलं.

हेही वाचा -

  1. 'त्या' व्हायरल व्हिडिओमागं सतेज पाटील; आमदार राजेश क्षीरसागरांचा थेट आरोप, कोल्हापुरात राजकीय युद्ध भडकलं
  2. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी द्या, आमदार सतेज पाटील यांनी सुचवला पर्याय
  3. 'गोकुळ'च्या रणांगणात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील पुन्हा आमने-सामने; कोल्हापूरचं राजकीय वातावरण तापलं!