राज्यात नव्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा, मंत्री गिरीश महाजन थेटच बोलले
मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले.

Published : July 11, 2026 at 5:22 PM IST
जळगाव - राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी उपरोधिक शैलीत राऊत यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊतांवर हल्लाबोल - संजय राऊत यांना मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचे अधिकार कोणी दिले? असा सवाल उपस्थित करत महाजन म्हणाले, "भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी पक्षाचे सर्वाधिकार संजय राऊत यांनाच दिले आहेत, असेच वाटते. देशाचा कारभारही तेच पाहत आहेत असे दिसते. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवत आहेत, तर मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेत आहेत. कोण मुख्यमंत्री होणार किंवा होणार नाही, हे ठरवण्याचे अधिकार राऊत यांना कोणी दिले?"
संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या - मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाबाबत विचारले असता, "बावनकुळे मुख्यमंत्री झाले तर त्यात वाईट काय आहे?" असे सांगत त्यांनी संजय राऊत यांना शुभेच्छाही दिल्या. "मलाही आता संजय राऊत यांना भेटावे लागेल," अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
तोपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेबाबत महाजन म्हणाले, "लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. पुढच्या निवडणुकीत काय निकाल लागतो ते पाहू. त्यांनी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी हा त्यांचा निर्णय आहे. तोपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात."
उद्धव ठाकरेंवर निशाणा - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याबाबत बोलताना महाजन म्हणाले, "उद्धव ठाकरे नागपूरला जाऊ द्या, मुंबईला जाऊ द्या किंवा रामटेकला जाऊ द्या, त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्यांनी प्रभू श्रीरामांना विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले आहेत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही."
...तर एकनाथ खडसे यांचं स्वागत - भाजपामध्ये एकनाथ खडसे यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चेवर बोलताना महाजन म्हणाले, "एकनाथ खडसे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते कुठेही जाऊ देत. त्यांना कोण बोलावत आहे, ते कोणाला भेटत आहेत याची माहिती मला माध्यमांतूनच मिळते. त्यांच्याशी माझे काही देणे-घेणे नाही."
ते पुढे म्हणाले, "ते दिल्लीलाही जातात, आता मातोश्रीवरही जात आहेत. सध्या ते पवार साहेबांकडे आहेत. ते सर्वपक्षीय नेते झाले आहेत. त्यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळाली तर मला आनंदच होईल. त्यामुळे पक्ष वाढेल."
आम्ही शेपटी हलवणारे आहोत - जबाबदारी देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट करत महाजन म्हणाले, "हे सर्व वरिष्ठांच्या हातात आहे. माझ्या हातात काहीच नाही. खडसे नेहमी सांगतात की त्यांची दिल्लीपर्यंत 'हॉटलाइन' आहे. त्यामुळे त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते." यावेळी त्यांनी विनोदी शैलीत, "मी फार छोटा माणूस आहे, आम्ही शेपटी हलवणारे आहोत," अशी टिप्पणी केली. तसेच, "खडसे परत आले तर त्यांचे स्वागतच करू," असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -

