ETV Bharat / politics

अंबरनाथमधील १२ नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करणार - सचिन सावंत

अंबरनाथमधील १२ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपात प्रवेश करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलय.

सचिन सावंत
सचिन सावंत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 6:46 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अंबरनाथमधील काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी थेट भाजपात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली असून, या सर्व नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार केवळ अनैतिकच नाही, तर असंवैधानिक असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अंबरनाथमधील १२ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून नंतर भाजपात प्रवेश करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असं म्हटलं आहे. या सर्वांना लवकरच कायदेशीर नोटिसा पाठवण्यात येणार असून, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील १२ नगरसेवकांनी कोणतीही चर्चा न करता घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असं म्हटलं आहे. काँग्रेसनं तत्काळ त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ केलं, पण भाजपानं मात्र त्यांना थेट पक्षात सामावून घेतलं. यावरून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.


सत्तेसाठी भाजपाला कोणाशीही युती चालते. अकोटमध्ये ओवैसींच्या एमआयएमशीही त्यांनी हातमिळवणी केली आहे. हे भाजपाचे नैतिक अधःपतन आहे, असं सपकाळ म्हणाले. भाजपाच्या कथनी आणि करणीत मोठा फरक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ”भाजपाला केवळ सत्तेची हाव असून, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचारही पुसायचे आहेत. इतकंच काय महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेल्या नेत्यांची नावंही भाजपाला इतिहासातून हटवायची आहेत. ही मानसिकता ओळखून जनतेनं त्यांना धडा शिकवावा,” असं आवाहन सपकाळ यांनी केलं.


राज्यात मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका होत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी या बिनविरोध निवडणुका लोकप्रियतेमुळे नाही, तर धमक्या, दबाव आणि पैशांच्या आमिषामुळे होत आहेत, असा आरोप केला. यात पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोगही अप्रत्यक्ष मदत करत असल्याचं दिसतंय. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं.
एकंदरीत, अंबरनाथमधील या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारण तापलं असून, काँग्रेसनं आता कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारत भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.

हेही वाचा...

  1. अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या 'त्या' 12 नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
  2. अंबरनाथ, अकोट व मीरा-भाईंदरमध्ये अनपेक्षित युतीमुळं भाजपा अडचणीत; काँग्रेसच्या 12 स्थानिक नेत्यांवर कारवाई
  3. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; सुरक्षारक्षक जखमी