ETV Bharat / politics

'युतीचा धर्म पाळला, आता शब्द पाळण्याची अपेक्षा'; मंत्री भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीला इशारा

रायगड : कोकण विधानपरिषद निवडणुकीवरुन मंत्री भरत गोगावले यांनी सूचक विधान करत राष्ट्रवादीला इशारा दिला.

Minister Bharat Gogawale
माध्यमांशी बोलताना मंत्री भरत गोगावले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 1, 2026 at 7:04 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना नेते विकास गोगावले यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोकणातील जागेबाबत युतीचा धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्यामुळे शिवसेनेने माघार घेतल्याचे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे, वरिष्ठांचे आदेश नसते तर कोकणातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते, असा दावा विकास गोगावले यांनी केला आहे.

...म्हणून अर्ज दाखल करायला गेलो नाही - भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाबाबतही भाष्य करताना, यासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे सांगितले. तसेच कोकण विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येणार असल्याने आपण अर्ज भरण्यासाठी गेलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युतीचा धर्म पाळण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असून उमेदवाराला आपल्या शुभेच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना मंत्री भरत गोगावले आणि विकास गोगावले (ETV Bharat Reporter)

कोकणात शिवसेनेची ताकद सर्वाधिक - दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विकास गोगावले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. कोकणातील ही जागा शिवसेनेचीच होती आणि वरिष्ठांच्या आदेशामुळेच आपण थांबलो, अन्यथा जिल्हा आणि कोकणातील राजकीय समीकरणे वेगळी दिसली असती, असे त्यांनी म्हटले. कोकणात शिवसेनेची ताकद सर्वाधिक असल्यामुळेच हा मतदारसंघ लढविण्याची तयारी सुरू होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या आदेशाचा मान राखत आपण माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षहितासाठी भूमिका घेतली - याचवेळी विकास गोगावले यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींवरही सूचक भाष्य केले. शिवसेना सध्या सावध पवित्रा घेत असल्याचे मान्य करत त्यांनी पक्ष नेतृत्वाचा निर्णय स्वीकारल्याचे सांगितले. मागील काही घटनांकडे दुर्लक्ष करून पक्षहितासाठी भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. मात्र आता ही शेवटची वेळ असल्याचे सांगत पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा - राजकारणात कोणीही कायमस्वरूपी नसतो, प्रत्येकाचा वेळकाळ ठरलेला असतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. आज दिलेला शब्द पाळला गेला नाही, तर आम्हालाही पुढील राजकीय भूमिका विचारात घ्यावी लागेल, असे वक्तव्य करत त्यांनी महायुतीतील भविष्यातील समीकरणांबाबत संकेत दिले आहेत.

हेही वाचा -

  1. विधान परिषदेच्या निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी दाखल
  2. 'संजय राऊतांवर स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला, प्राजक्त तनपुरेंच्या तिकीटावरुन राष्ट्रवादी नाराज?
  3. राजेंद्र राऊत यांचा भाजपाकडून विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल, खा. ज्योती वाघमारे यांनी बारसकर यांच्या उमेदवारीवर दिली प्रतिक्रिया