राष्ट्रवादी काँग्रेसचा रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात?
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्यानंतर पक्षातील नेत्यांशी संबंधित वादग्रस्त घटनांची मालिका समोर आली आहे. यासंदर्भात प्राजक्ता पोळ यांचा स्पेशल रिपोर्ट.

Published : March 28, 2026 at 3:59 PM IST
मुंबई - अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला. यापूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीशी जवळचे संबंध असल्याचं सिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणात चौकशी करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. झिरवळ यांचा राजीनामा घेतल्यास राष्ट्रवादीत राजीनामा द्यावा लागणारे ते चौथे नेते असतील.
या सर्व राजीनामा प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. अजित पवार हयात असताना धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांना काहीकाळ अभय मिळालं. पण प्रकरण अधिक चिघळल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांचे राजीनामे घेण्याबाबत निर्देश दिले. रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरात प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रवादीचा कंट्रोल फडणवीसांकडे? - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अगदी काही दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्याकडे जहाज चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी त्याचे इंजिन आणि नियंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.
त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून दावा करण्यात आला होता. पण हा दावा फडणवीस यांनी फेटाळून लावला होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असती, तर अजितदादांनी आम्हाला त्याबाबत माहिती दिली असती. अजितदादा आमच्या सरकारमध्ये आहेत. सरकारमध्ये असताना आमच्याशी चर्चा न करता ते विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विलीनीकरणाची तारीख ठरली असती, तरी त्यांनी आम्हाला सांगितले असते” असंही फडणवीस यांनी सांगत विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.
रुपाली चाकणकर यांच्या खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडीओनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचाही एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत वक्तव्य केलं.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ छेडछाड करून तयार करण्यात आल्याचा दावा केला असून, तीन-चार जुन्या क्लिप्स एकत्र करून तो बनवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली असून, त्यांना तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच, हे प्रकरण गंभीर असून सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून तथ्यांची पडताळणी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे झिरवळ प्रकरणातही मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
फडणवीसांचा पुढाकार अनिवार्य? - अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री वादात सापडल्यानंतर ते त्या मंत्र्याची कानउघडणी करत असत. त्याचबरोबर प्रत्येकाच्या कामावर पवार यांचे लक्ष असायचे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत होती. तेव्हा अजित पवार यांनी त्यांची ‘बोलताना ताबा ठेवा अन्यथा राजीनामा द्या’ अशा स्पष्ट शब्दात कानउघडणी केल्याचं वृत्त होतं.
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे याबाबत बोलताना म्हणतात, “अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमुखी नेतृत्व राहिलेलं नाही. सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्ष असल्या तरी त्या तुलनेने नवख्या असल्याने पक्षावरील पकड सैल झाल्याचं दिसतं. दरम्यान, महायुती सरकारमध्ये भाजपा हा सत्तेचा प्रमुख चेहरा असल्याने कोणत्याही एका नेत्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठोस निर्णय घेणं अनिवार्य ठरतं. अन्यथा सरकारवर आरोपांची सरबत्ती सुरूच राहण्याची शक्यता आहे.” ही परिस्थिती काळानुसार बदलते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा...

