ETV Bharat / politics

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची घडी विस्कटली? संघटना आणि नेतृत्वापुढे आव्हान

पार्थ आणि जय पवार यांनी पक्षाच्या संघटनेत हस्तक्षेप करायला सुरुवात केली. जय पवार हे सातत्याने बारामतीमध्ये जनता दरबार घेऊन काम करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीच्या बैठकीत नेतेमंडळी
राष्ट्रवादीच्या बैठकीत नेतेमंडळी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2026 at 5:15 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 ला विमान अपघातात निधन झालं. या घटनेला आता चार महिने पूर्ण झाले. या चार महिन्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. पक्षाचं नेतृत्व, संघटना, दोन राष्ट्रवादींचं विलीनीकरण, अंतर्गत राजकारण, नेत्यांची नाराजी अशा अनेक घडामोडी समोर येऊ लागल्या. मागच्या चार महिन्यात नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या पश्चात संघटना सैल पडली का? हे प्रश्न उपस्थित होऊ लागले.

विलीनीकरणाची चर्चा आणि पूर्णविराम - अजित पवारांच्या निधनानंतर लगेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने उपस्थित केला. यासंदर्भात अजित पवारांसोबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. पण याला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षातील नेत्यांनी विरोध केला. याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील नेत्यांचा दावा फेटाळून लावला. यामध्ये राज्यसभा खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रमुख भूमिका होती. यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर अगदी काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं. काही दिवसांतच सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल पक्षाचा ताबा घेत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवेळी विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जाहीर करण्यात आलं.

प्रफुल पटेल आणि तटकरे साईडलाईन - अजित पवारांचं निधन आणि सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड त्यामधल्या काळातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र 10 मार्चला निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं. यातून सुनिल तटकरे यांना पहिला धक्का देण्यात आला. तटकरे आणि पटेल हे दोन नेते पक्ष ताब्यात घेऊ पाहत आहेत अशी चर्चा त्यावेळी सुरू होती. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी इतर नेत्यांशी चर्चा न करता हे पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती समोर आली.



राष्ट्रवादी काँग्रेसनं 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सादर केली होती. या यादीत सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आलं. तसंच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावासमोर पक्षातील पदांचा उल्लेख नसल्यानं पक्षांतर्गत घडामोडींविषयी विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.


त्यानंतर पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचं जाहीर केलं. दोन्ही नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. पण अजित पवारांच्या पश्चात आता विलीनीकरण होणार नाही असं स्पष्टपणे खासदार सुप्रिया सुळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. या राजकीय हालचालींमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

पार्थ पवारांचा वाढता हस्तक्षेप - अजित पवार हयात असताना राजकारणात फारसे सक्रिय नसलेले पार्थ आणि जय पवार यांनी पक्षाच्या संघटनेत हस्तक्षेप करायला सुरुवात केली. जय पवार हे सातत्याने बारामतीमध्ये जनता दरबार घेऊन काम करताना दिसत आहेत. पण पार्थ पवार यांचा मात्र थेट संघटनेबाबतच्या निर्णयातच हस्तक्षेप दिसून येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून पार्थ पवार स्वतःची टीम तयार करू पाहत आहेत. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढताना दिसतेय. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेऊन पार्थ पवारांबाबत तक्रार केल्याचीही चर्चा समोर आली होती.



काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनिल तटकरे यांनी ‘आम्ही टिकेचे धनी’ होत असल्याची खंत जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्याच भाषणाच्यावेळी पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडले होते. त्याचबरोबर मुंबईत असतानाही प्रफुल पटेलांनी बैठकीला दांडी मारली होती. यावरून या वादाची कल्पना करता येऊ शकते. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर छगन भुजबळ यांच्यासोबतही पार्थ पवारांचे वाद समोर आले.



एका ठराविक ठेकेदाराला वाहतूक विभागाचं टेंडर मिळावं, यासाठी पार्थ पवार यांनी संबंधित ठेकेदाराला मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे. मात्र, नियम आणि प्रक्रियेचा हवाला देत भुजबळ यांनी टेंडर देण्यास नकार दिला. टेंडर देता येणार नसल्याची कारणेही त्यांनी स्पष्ट केल्याचं सांगितलं जातं. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा समोर आली. ‘तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही मला कधी अशा प्रकारे सांगितलं नव्हतं,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. त्यावर संतप्त झालेल्या पार्थ पवार यांनी, ‘मला तुमच्याकडील विभाग काढून घ्यावा लागेल,’ असा इशारा दिल्याची माहिती एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या टेंडरवरून कुठलेही वाद झालेले नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी दिली असली तरी पक्षात याबाबत प्रचंड नाराजी आहे.




पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात? - अजित पवारांचं अपघाती निधन, त्यानंतर सुनेत्रा पवारांनी हाती घेतलेली पक्षाची धुरा, विलीनीकरणाच्या चर्चा, जय आणि पार्थ यांचं अचानक राजकारणात सक्रिय होणं, नेत्यांचे अंतर्गत वाद यामुळे पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं चित्र आहे. अजित पवार हयात असताना प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क असायचा. संघटनेत काय सुरू आहे, यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची कामं करताना संघटनात्मक बांधणीकडे अजित पवारांचं कटाक्षाने लक्ष असायचं. पण ही पकड आता सैल झालेली दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्यात सध्याच्या परिस्थितीमुळे संभ्रम दिसून येतो.



ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे याबाबत बोलताना म्हणतात, “शरद पवार आणि अजित पवार एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संघटनेत कोणाला किती महत्त्व द्यायचं यावरून त्या दोघांमध्येही मतभेद व्हायचे. पण जेव्हा अजित पवारांनी वेगळं होऊन स्वतः पक्ष चालवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र पक्षाचे निर्णय अजित पवार पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून घ्यायचे. पण आता पार्थ पवार पक्षावर वर्चस्व मिळवू पाहत आहेत. भविष्यात कोणाच्या नेतृत्वात हा पक्ष चालणार आहे; सुनेत्रा पवार, पार्थ पवार की जय पवार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नेते नाराज आहेत. त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. पुढच्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलण्याचं आव्हान पक्ष नेतृत्वासमोर असणार आहे.”

हेही वाचा...

  1. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडी सज्ज, 15 जागांवर शिक्कामोर्तब; उर्वरित 2 जागांचा तिढा कायम