नागपुरातील 'या' अनुभवी माजी आमदाराचा उलटा राजकीय प्रवास, आमदारकीनंतर नगरसेवक पदाचे वेध, राज्यात याआधीही झालेत हे प्रयोग
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये (Prakash Gajbhiye) यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Published : January 8, 2026 at 4:27 PM IST
|Updated : January 8, 2026 at 4:57 PM IST
नागपूर : आपल्या लोकशाही व्यवस्थेत राजकीय प्रवास हा सामान्यतः नगरसेवक ते महापौर, आमदार आणि मंत्री असा अपेक्षित मानला जातो. मात्र, काही ठिकाणी अपवाद देखील घडतात. अगदी विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही त्यात आलेच. कारण एकेकाळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर लगेच आकड्यांचं गणित इकडे-तिकडे झालं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री राहिलेले ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये विधानपरिषदेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अनुभवी नेते प्रकाश गजभिये हे थेट नगरसेवकपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. "जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पदाची लालसा नाही, पद छोटे असो वा मोठे त्याचा फरक पडत नाही, तर लोकांशी कनेक्ट महत्वाचा असतो," असं प्रकाश गजभिये म्हणाले.
नागपूरच्या राजकारणात 'उलटा प्रवास' चर्चेत : राजकीय पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार आणि मंत्री हा राजकारणातील ठरलेला चढता क्रम आहे. पण नागपूरच्या राजकारणात सध्या या सगळ्याच संकेतांना छेद देणारा एक 'उलटा प्रवास' चर्चेत आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (विधान परिषद सदस्य) प्रकाश गजभिये पुन्हा एकदा थेट नागपूर महानगरपालिकेच्या रणांगणात उतरले आहेत. विधान परिषदेत सरकारला प्रश्नांनी घेरणारा नेता आता प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांच्या दारात स्वतःसाठी मत मागताना दिसत आहे. राजकारणात असा उलटा प्रवास तसा नवीन नाही. मुंबईत शिवसेना (शिंदे) माजी आमदार यामिनी जाधव असोत वा भाजपाचे अतुल शाह आमदारकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्यांची यादी मोठी असेल. मात्र, नागपूरमध्ये हा प्रवास विशेष लक्ष वेधून घेतो, कारण तो एका रंगतदार' राजकीय व्यक्तिमत्त्वाचा आहे.
तीन टर्म नगरसेवक नंतर आमदार : याआधी तीन टर्म गजभिये नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक होते. रिपाईं (आठवले गट) मध्ये असताना मनपात गटनेते पदही त्यांनी भूषवले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे एकेकाळी कट्टर समर्थक होते. मात्र, आठवले भाजपासोबत गेले आणि गजभिये यांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला. प्रकाश गजभिये मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कायम राहिले. हा निर्णय त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरला.
कुतूहल आणि व्यंग : विधानपरिषदेचे आमदार राहिलेले अनुभवी नेते महानगरपालिका निवडणुकीत शड्डू ठोकून उभे असल्यानं नागपूरच्या राजकीय वर्तुळात विषय चर्चेचा आणि कुतूहलाचा झाला असला तरीही काही प्रमाणात व्यंग निर्माण झाल्यानं चर्चेलाही उधाण आलं आहे.
राजकारणी बदलले नाही, व्यवस्था बदलली : आमदारकी ही नगरसेवकपदाची पहिली पायरी मानली जायची. आज मात्र समीकरणे बदलली आहेत. पक्षीय चिन्हांपेक्षा व्यक्ती, गटबाजी आणि स्थानिक समीकरणे अधिक प्रभावी ठरत आहेत, त्यामुळं राजकारणी बदलले नाही, पण व्यवस्था बदलली आहे, असं म्हणणं अधिक वास्तववादी ठरेल. राजकीय जाणकारांच्या मते, “आज पद नव्हे तर प्रासंगिकता महत्त्वाची आहे आणि ती टिकवण्यासाठी कोणतीही पायरी लहान किंवा मोठी राहत नाही." असे ते म्हणाले.
भारतीय लोकशाहीची सुंदरता : प्रकाश गजभिये यांचा हा निर्णय त्यांचा खासगी निर्णय आहे. मात्र, काहींना तर प्रकाश गजभिये यांच्या रुपानं राजकारणाला लागलेली उतरती कळा वाटत आहे. तर काहींच्या मते तळागाळातील लोकशाहीशी पुन्हा नाळ जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं वाटत आहे. विधान परिषदेसारख्या वरीष्ठ सभागृहाचा अनुभव असलेला हा अनुभवी नेता थेट वॉर्ड पातळीवरील लढाई लढतोय, ही बाब निश्चित राजकीय अभ्यासकांसाठी विचार करण्याजोगी आहे. राजकारणात पद मोठं की संपर्क मोठा, प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
राजकीय अस्तित्वासाठी धडपड : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाची गणितं बिघडली आहेत. अनुभवी नेत्यांनी सत्तेत वाटा मिळवण्यासाठी पक्षांतर केलं. मात्र, काही पक्षनिष्ठा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडं नेत्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीची तडजोड करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटा-फुटीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांची राजकीय वाटचाल देखील अनिश्चिततेच्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. राष्ट्रवादीतील (शरद पवार) अनेक नेत्यांसमोर राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. मात्र, महानगरपालिका निवडणूक ही त्यासाठी एक संधी मानली जात आहे.
पदापेक्षा जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय : विधानपरिषदेतील भाषणांपेक्षाही प्रभागातील नाले, रस्ते आणि पाणीपुरवठा मुद्दे आज जास्त निर्णायक ठरत आहेत. त्यामुळं मोठे पद सोडून खरा जनसंपर्क निवडण्याचा निर्णय असल्याचं गजभिये यांचे समर्थक सांगतात.
राजकीय प्रवासाच्या दिशेवर भाष्य करणारी निवडणूक : शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे आमदार राहिलेला नेता नगरसेवक म्हणून किती प्रभावी ठरणार? त्यांचा अनुभव वॉर्डच्या विकासासाठी उपयोगी पडणार की फक्त राजकीय अस्तित्वाचा संघर्ष आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक ही केवळ वॉर्ड प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित न राहता, राजकीय प्रवासाच्या दिशेवर भाष्य करणारी निवडणूक ठरत असल्याचं चित्र आहे. आज नगरसेवकावरून आमदार बनण्याचं स्वप्न पाहणारे अनेक आहेत, पण आमदारावरून थेट नगरसेवक बनण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यातूनच सध्याच्या राजकारणाची खरी स्थिती उघडी पडते.
पक्षाचा आदेश अंतिम : भाजपाचे मुंबईतील आमदार अतुल शाह यांनी देखील 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग 220 मधून महानगरपालिका निवडणूक जिंकली. शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा त्यांनी पराभव केला होता. आमदार राहिलेल्या नेत्याला नगरसेवकपदाची निवडणूक लढावी का वाटली याबद्दल अतुल शाह याना विचारलं असता ते म्हणाले, "पक्षाच्या आवश्यकतेला मी प्रधान्य दिलं. माझ्या विधानसभा क्षेत्रातील भेंडीबाजार, नाल बाजार या भागात झालेल्या सर्वेत माझं नाव सर्वात पुढं आलं, भाजपाच्या दृष्टीनं ही सीट अशक्य होती. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं मी नगरसेवक पदाची निवडणूक लढलो आणि जिंकतो सुद्धा. ईश्वर चिट्ठीने निकाल लागला होता. भाजपामध्ये पक्ष नेतृत्वाचा निर्णय सर्वतोपरी मानला जातो आणि मी त्या निर्णयाचं पालन केलं. स्वतःची इच्छा मागे ठेवावी लागते."
मुंबईत नगरसेवकाला आमदाराइतके महत्त्व : मुंबई महानगरपालिका नगरसेवक पदाला फार महत्व प्राप्त आहे. इथल्या नगरसेवकाकडं जास्त प्रमाणात कामं आहेत, असं अतुल शाह म्हणाले. पक्ष नेतृत्वानं मला आग्रह केला तो मी मान्य केला आणि विजय मिळवून दाखवला होता. या माध्यमातून तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचता आलं असं शाह म्हणाले.
शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव पण लढल्या, मात्र : शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव या देखील महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. मुंबई, भायखळ्याच्या त्या माजी आमदार आहेत. दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवलेली होती, मात्र त्या पराभूत झाल्या.
आमदार ते जिल्हा परिषद अध्यक्ष! : विदर्भाच्या राजकीय इतिहासात अशी अनेक उदाहरणे नोंदलेली आहेत, जी आजही चर्चेत राहिली आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष किसनराव गवळी हे अध्यक्ष होण्याआधी आमदार होते. त्याचप्रमाणे उमरेडचे माजी आमदार आ. ला. वाघमारे हे आमदारकीनंतर पुन्हा जिल्हा परिषदेत परतले होते. या निवडणुकीत त्यांना सत्यशोधक समाजाचे प्रभावी व्यक्तिमत्त्व रमेशचंद्र कोटमकर यांनी कडवी झुंज दिली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत अवघ्या 65 ते 70 मतांच्या फरकाने वाघमारे विजयी झाले, असे जाणकार सांगतात. ही उदाहरणे आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील महत्त्वाचे संदर्भ म्हणून इतिहासात नोंदली गेली आहेत.
हेही वाचा -
- देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
- तर्रीपोहा विथ देवाभाऊ;नागपूरच्या विकासावर रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विशेष संवाद सोहळा; शहरात 50 ठिकाणी थेट प्रक्षेपण
- 'भगवा'आमच्या रक्तात, सुजय विखे पाटील यांचा निवडणूक आयोगावर प्रहार

