शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा, अनिल पाटील काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक गाठीभेटी सुरु आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत.

Published : July 17, 2026 at 6:59 PM IST
जळगाव : राज्यात काही दिवसांपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली. ठाकरे गटाचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरेंच्या या 6 खासदारांना आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरले. यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेत जोरात इनकमिंग सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी (शप) गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे जंयत पाटील हे मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. या अनेक चर्चांवरुन मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात अलीकडील अनेक नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चा सुरु आहेत. या चर्चांना फारसं महत्त्व देण्याचं कारण नसल्याचं अनिल पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये पत्रकारांसह बोलत होते. अनिल पाटील यांनी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटींवर सुरू असलेल्या राजकीय तर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
अनिल पाटील काय म्हणाले? : जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही पूर्णपणे त्यांच्या मतदारसंघातील नगरविकासाशी संबंधित कामासाठी असल्याचे अनिल पाटील म्हणाले. जंयत पाटील यांनी अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या नगरविकासाशी निगडित प्रश्नासाठी ही भेट घेतली असावी. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नसल्याचंही अनिल पाटील म्हणाले.
शप गट एनडीएत सहभाती येणार असल्याच्या चर्चांबाबत काय म्हणाले? : अनिल पाटील यांनी शरद पवार गट एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
"पवार साहेबांच्या नेतृत्वाकडून ते एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. एखाद्या विधेयकाला विरोधी पक्षाने पाठिंबा दिला म्हणून तो पक्ष सत्ताधारी आघाडीत सहभागी झाला, असा अर्थ होत नाही. अनेकदा विधानसभा आणि विधानपरिषदेत सर्वपक्षीय सहमतीनं विधेयकं मंजूर केली जातात. त्यामुळे अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही," असं पाटील यांनी सांगितंलं.
"राजकीय अर्थ शोधण्याचे कारण नाही" : सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेटही नियमित प्रशासकीय कामकाजाचा भाग असल्याचे अनिल पाटील म्हणाले. "मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे आमदार आणि खासदारांचं नियमित काम असतं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघातील किंवा विकासकामांच्या संदर्भात ही भेट घेतली असावी. याबाबत तटकरे साहेबांनी स्वतःही खुलासा केला आहे. त्यामुळे या भेटीमागे वेगळा राजकीय अर्थ शोधण्याचं कारण नाही," असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
पार्थ पवार-मुख्यमंत्री भेटीवर प्रतिक्रिया : अनिल पाटील यांनी पार्थ पवार यांच्या मुख्यमंत्री भेटीबाबतही प्रतिक्रिया दिली. "पार्थ पवार यांनी काही विकासकामं किंवा विधेयकांशी संबंधित विषयांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही," असे पाटील यांनी सांगितलं.
प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर पाटील काय म्हणाले? : अनिल पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर बोलताना सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केलं. "माझ्या नावाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. तटकरे साहेब राज्यभर फिरून पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करत आहेत. त्यांचा अजून अडीच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून प्रदेशाध्यक्ष बदलाचा कोणताही प्रश्न सध्या उपस्थित नाही," असं पाटील यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया काय? : अनिल पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सुरू झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचं खंडन केलं "दिल्लीला जाणं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होणारच असा निष्कर्ष काढता येत नाही. पक्षाच्या बैठका, समन्वय बैठक किंवा महत्त्वाच्या प्रशासकीय चर्चांसाठी वरिष्ठ नेते दिल्लीला जात असतात. फेरबदलाचा निर्णय झाल्यास तो अधिकृतपणे जाहीर होईल," असे पाटील यांनी म्हटलं.
"त्यांच्या मनात काय आहे.." : जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "ते दोघेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे सांगणं माझ्यासाठी शक्य नाही. मात्र माझ्या मते त्यांनीही आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठीच भेट घेतली असावी.", असं पाटील यांनी माध्यमांसह बोलताना सांगितलं.
दरम्यान राज्यातील विविध राजकीय भेटींवरून सुरू असलेल्या चर्चांना अनिल पाटील यांनी फारसं महत्त्व नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच प्रत्येक भेटीमागे राजकीय समीकरणं शोधण्याऐवजी विकासकामांच्या दृष्टीने त्याकडे पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त पाटील यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :

