बारामती पोटनिवडणूक; बिनविरोधावर मतभेद, महायुती आणि काँग्रेसमध्ये नेमका संघर्ष कशासाठी?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरत असल्याचं चित्र आहे.

Published : April 6, 2026 at 1:54 PM IST
मुंबई - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेत, त्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना काँग्रेसने बारामतीमधून आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून सुरुवातीपासूनच आवाहन केलं गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मी सर्व पक्षांना विनंती करतो. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतरही सर्व पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची संस्कृती जपली होती. आताही ती जपावी अशी आमची विनंती आहे” असं फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली असल्याचं नमूद करत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं स्पष्ट केलं.
जर महाविकास आघाडीबाबत बोलायचं असेल तर त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पाठिंब्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी काँग्रेसकडून मात्र या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला नाही.
काँग्रेसकडून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न? - आज बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे आकाश मोरे या दोन्ही उमेदवारांकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 9 एप्रिल ही अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम तारीख आहे. काँग्रेसकडून हा अर्ज मागे घेतला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आकाश मोरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार असल्याचं सांगितलं, मात्र त्यासाठी एक अट असल्याचं स्पष्ट केलं. बारामतीत अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याच मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवत असल्याचं मोरे यांनी नमूद केलं. अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित करत, त्या घटनेनंतर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारनं या प्रकरणी गुन्हा नोंदवला, तर आपण तत्काळ उमेदवारी मागे घेऊ, असंही मोरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसकडून अजित पवार यांच्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी ही दबावाची खेळी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता याबाबत सांगतात, “काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करा मग उमेदवारी अर्ज मागे घेऊ हे कारण देत दबावाचं राजकारण करत असल्याचं वाटतंय. त्यात जर आधीच्या निवडणुका भाजपाने बिनविरोध केल्या नाहीत म्हणून आम्ही ही निवडणूक करणार असं त्यांनी कारण दिल असतं तर हे अधिक योग्य वाटलं असतं. पण एफआयआरबाबत सांगून काँग्रेस दबावाचं राजकारण करत असल्याचं दिसतं. दिल्लीच्या पातळीवर याबाबत विनंती केली तर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा काँग्रेसचे राज्यातील नेते तोंडावर पडण्याची शक्यता आहे.”
महाविकास आघाडी म्हणून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. पण मित्रपक्षांना विश्वासात न घेता असं विधान करणं चूक असून जर वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आलं तर काँग्रेस ही निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस स्वतःचं महत्त्व प्रस्थापित करू पाहत असल्याचीही चर्चा आहे.
कोणत्या निवडणुका भाजपाने बिनविरोध केल्या नाहीत? - पोटनिवडणुकांबाबत महाराष्ट्रातील चित्र आता बदलताना दिसत आहे. पूर्वी एखाद्या विद्यमान आमदाराचं आकस्मिक निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्याला बहुतांशवेळा राजकीय पक्षांकडून मोकळा मार्ग दिला जात असे. आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या निधनानंतर अनुक्रमे सुमन पाटील आणि विश्वजीत कदम यांची निवडणूक बिनविरोध होणं हे त्याचं उदाहरण.
मात्र, अलीकडच्या काळात काही ठिकाणी तितकंस असं सौजन्य पाळलं गेलं नाही. पंढरपूरमध्ये भारत भालके आणि देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पंढरपूरमध्ये तर भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना सहानुभूतीची लाटही विजय मिळवून देऊ शकली नाही. यावरून स्पष्ट होतं की, प्रत्येक वेळी ‘बिनविरोध’चा मार्ग खुला राहतोच असं नाही आणि सहानुभूतीची लाटही नेहमीच निर्णायक ठरत नाही.
महाविकास आघाडीत मतमतांतरे? - सुनेत्रा पवार यांची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे दिसून येत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उध्दव ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत सुनेत्रा पवार यांनी फोन केला होता. पण अद्याप ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही. पण सामनाच्या अग्रलेखातून आज काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांची इच्छा असून इतर उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनीही यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसंच, ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास अजितदादा स्वतःच ही निवडणूक लढवत आहेत, अशी भावना ठेवून बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावं, असं आवाहन त्यांनी केलं. तुमचं प्रत्येक मत हेच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
यावर स्पष्टीकरण देत काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केली. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा असल्याच्या चर्चा आणि टीकाटिप्पणी सुरू आहेत. मात्र, नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर आणि मंगळवेढ्यात भारत भालके यांच्या निधनानंतरही निवडणुका झाल्याची उदाहरणं देत त्यांनी भाजपानं सोयीप्रमाणे राजकारण केल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले, दुर्दैवानं अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती आणि स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र त्याचं पुढे काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण अखेर कर्नाटकात त्यांना यश मिळालं, असंही त्यांनी नमूद केलं.
आजही काँग्रेस पक्ष आणि उमेदवाराचं स्पष्ट मत आहे की, महाराष्ट्रात विशेषतः बारामतीत एफआयआर दाखल करा, त्यानंतर पुढचा विचार करता येईल आणि त्यातूनच संबंधितांची खरी भूमिका स्पष्ट होईल, असंही लोंढे यांनी सांगितलं.

