माहिममध्ये मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, दोन्ही कार्यकर्ते भिडले
पुण्यात महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावल्याच्या निषेधार्थ माहीम भागात भारतीय जनता युवा मोर्चा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

Published : September 1, 2026 at 7:53 PM IST
मुंबई : मुंबईतील माहीम भागात आज भारतीय जनता युवा मोर्चा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
पुण्यात महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावल्याच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी युवा मोर्चाचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच, मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिथं मोठ्या संख्येनं जमा झाले. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कृष्णराज महाडिक हे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह माहीम आणि माटुंग्यामार्गे राज ठाकरे यांच्या घराकडे येणार होते. मात्र, मनसे आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी माहीम आणि माटुंगा या दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. याशिवाय दादरमध्येही पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यादरम्यान कृष्णराज महाडिक यांनी पोलिसांची नजर चुकवून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र माहीम येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडूनही भाजपचा प्रतिकार करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचं आंदोलन
अमित ठाकरेंच्या या कृत्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा त्यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले. मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
महापौर काय म्हणाल्या?
"राज्य शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला होता. अमित ठाकरे यांनी योग्य ती माहिती घेऊन जे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. जे घडलं ते अत्यंत चुकीचं घडलं'', अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
उपमहापौर काय म्हणाले
"अमित ठाकरे यांनी प्रोटोकॉल काय असतो याची माहिती घेतली पाहिजे होती. पंतप्रधानांचा फोटो हा प्रोटोकॉलनुसारच लावला जातो," असं मत शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी व्यक्त केलं.
यशवंत किल्लेदार काय म्हणाले?
"प्रोटोकॉलनुसार डाव्या बाजूला राष्ट्रपतींचा मोठा फोटो आणि इतर राजकीय नेत्यांचे फोटो असायला हवे होते. त्या ठिकाणी प्रोटोकॉलचे पालन करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे अमित ठाकरे यांनी जे केलं ते योग्यच केलं. याशिवाय, मुंबईत राज ठाकरे यांच्या घरासमोर कोणी येण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते खपवून घेणार नाही," असा इशारा मुंबई महानगरपालिकेचे मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
हेही वाचा -

