ETV Bharat / politics

आदित्य ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष? चर्चांना स्वतः आदित्य ठाकरेंकडून पूर्णविराम

ठाकरे शिवसेनेत लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आदित्य ठाकरे यांना ‘कार्याध्यक्ष’ करण्याचा ठराव मांडला जाऊ शकतो.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (File image, ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 15, 2026 at 5:16 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - ठाकरे शिवसेनेत लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आगामी जून महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आदित्य ठाकरे यांना ‘कार्याध्यक्ष’ करण्याचा ठराव मांडला जाऊ शकतो. 2003 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आता दिसत असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ‘कार्याध्यक्ष’ होणार असल्याच्या माध्यमांतील बातम्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितले, “सकाळपासून काही वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या या चर्चा पूर्णपणे निराधार आहेत. पक्षामध्ये अशा कोणत्याही नियुक्तीबाबत चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, माध्यमांनी त्यांच्या या भूमिकेची नोंद घ्यावी,” अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

शक्यतेकडे सकारात्मकदृष्ट्या पाहिले पाहिजे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना या शक्यतेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे देखील एकेकाळी कार्याध्यक्ष पदावर पोहोचले होते, याची आठवण करून देत राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत असेल, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. भविष्यातील राजकारण हे तरुणांच्या हातात असणार असल्याचं सांगत नेतृत्वाची सूत्रं नव्या पिढीकडे जाणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं, तसंच पक्षांतर्गत मतभेदांना फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांमुळे ठाकरे शिवसेनेत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत सोलापूर, धाराशीव, संभाजीनगर आणि जालना या भागाचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. याचवेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रत्यक्ष मैदानात सक्रिय नसल्याची तक्रार पक्षातील काही खासदार आणि नेत्यांकडून होत आहे.


शिवसेना (एकनाथ शिंदे) वेगवान विस्तार रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आता सावध होत असून, आदित्य ठाकरे यांच्या संघटनात्मक अधिकारांत वाढ करून त्यांना राज्यभर सक्रिय करण्याची रणनीती आखली जात आहे. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नवी संघटना उभी करण्याची तयारी सुरू असून पक्ष संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.



शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांना जेव्हा आदित्य ठाकरे यांना कार्यध्यक्ष करण्याच्या चर्चेबाबत विचारलं असता त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. ते म्हणाले, “त्यांच्या पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याबाबत बोलेन. तसाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.”


आदित्य ठाकरेंना कार्यध्यक्ष करण्याची गरज का? - 2010 साली आदित्य ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राजकारणात प्रवेश केला. युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरणाशी निगडित अनेक प्रश्नांवर काम केलं. 2019 साली आदित्य यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले. ठाकरे घराण्यातील आमदारकीची निवडणूक लढवणारे ते पहिली व्यक्ती होते. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण आणि पर्यटन या खात्याचा कार्यभार सांभाळला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे संघटनात्मक कामात अधिक सक्रिय झाले.



वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान या चर्चांबाबत बोलताना सांगतात, “उद्धव ठाकरेंच्या तब्येतीच्या मर्यादा, पक्षफुटीनंतर संघटनात्मक पुनर्बांधणी यासाठी आदित्य ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी येणं हे अपेक्षित होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हा संघर्ष उघडपणे पहायला मिळाला. आता जरी आदित्य यांच्याकडून ही चर्चा नाकारली गेली असली ही जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर येणार हे निश्चित आहे. त्यामुळे पक्षात जे कोणी ज्येष्ठ नेते आहेत त्यांना आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार यापुढे काम करावे लागेल याचे संकेत या चर्चेतून देण्यात आले आहेत.” प्रत्यक्षात या निर्णयानंतर अनेक घडामोडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षात बघायला मिळतील.



2003 साली उद्धव ठाकरे कार्यध्यक्ष झाले तेव्हा - 30 जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वरला शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं होतं. त्या अधिवेशनातील औपचारिक कार्यक्रमांपेक्षा एका प्रश्नाचीच सर्वत्र कुजबुज होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण ठरणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? अधिवेशनस्थळी दबक्या आवाजात विविध तर्क-वितर्क मांडले जात होते. काहीतरी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.



अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत, राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कार्याध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्या एका क्षणातच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, या निर्णयानंतर राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यध्यक्ष पद दिल्यानंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आणि बदल पाहायला निळाले. काही काळानंतर अनेक कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारण्याऐवजी शिवसेना पक्ष सोडून जाणं पसंत केलं. त्यावेळी प्रत्येक नेत्याने शिवसेना सोडताना उद्धव ठाकरेंवर प्रहार केला होता. या नेत्यांमध्ये राज ठाकरेंचाही समावेश होता.

हेही वाचा..

  1. 'मंत्रिपद धोक्यात आलं म्हणून मराठी आठवली?’, मनसेचा हल्लाबोल : तर धमकीनंतरही प्रताप सरनाईक आक्रमक म्हणाले . . .
  2. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता; खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली शंका