'पक्षानं सर्वकाही दिलं, तुमच्या काय रोज आरत्या करायच्या होत्या का?'; आदित्य ठाकरेंचा सचिन अहिर यांना सवाल
सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

Published : June 30, 2026 at 7:07 PM IST
मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी शिवसेनेत अनौपचारिक प्रवेश करत उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर तसेच भाजपावर जोरदार हल्लाबोल करत, "कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. पक्षाने सर्व काही दिल्यानंतरही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे पक्ष सोडून जात आहेत," अशी टीका केली.
'अजून तुम्हाला काय हवे होते?' - वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. येथील जनता नेहमीच पाठीशी राहिली आहे, असा विश्वास व्यक्त करत आदित्य ठाकरे म्हणाले, "कोणी येण्या-जाण्याने काही फरक पडत नाही, तिथे आमचं काम बोलतं. पण एकच दुर्दैव आहे की, ज्यांना पक्षाने सगळं काही दिलं, ते सोडून गेले. आदित्य ठाकरे काही बोलतच नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. पण, परवाच आम्ही पुण्यातून एकत्र आलो, तेव्हा आमची सखोल चर्चा झाली होती. लोकशाही कशी टिकणार आणि संविधानावर राजकारण चालणार की नाही यावर चर्चा झाली आणि लगेच मंगळवारी सकाळी ही बातमी आली."
"तुम्ही स्वतः आमदार आहात. प्रभाग समिती आहे. तुमच्या भावाला बीएमसीची समिती दिली. तुम्ही बेस्ट युनियनचे अध्यक्ष आहात. एवढं सगळं असताना अजून तुम्हाला काय हवं होतं? अजून किती मागणार तुम्ही? तुमच्या काय रोज आरत्या करायच्या का?" असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.
हे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' - या संपूर्ण राजकीय घडामोडींमागे कोणतेही 'ऑपरेशन टायगर' नसून, हे थेट 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. "आम्ही खोलवर अभ्यास केल्यावर हे समजायला लागलं आहे की, हे ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. ज्यांना राजकारण समजते, त्यांना हे स्पष्ट दिसत आहे की, हा सगळा देवेंद्र फडणवीसांचाच डाव आणि त्याचाच हा परिणाम आहे," असे ते म्हणाले.
भाजपा कार्यकर्त्यांची कोंडी आणि मंदिरांचा मुद्दा - भाजपावर हल्ला चढवताना आदित्य ठाकरे म्हणाले, "जे आज अयोध्येत आणि उज्जैनमध्ये जमीन घोटाळे करून हिंदू मंदिरं लुटत आहेत, जे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलू इच्छितात त्यासाठी दोन तृतीयांश मेजॉरिटी पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत. अशांसोबत तुम्ही कसे बसू शकता? हा प्रश्न सोडून जाणाऱ्यांना विचारला पाहिजे."
कार्यकर्त्यांना पुढे आणायचे नसेल - पुढे बोलताना त्यांनी भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि संघाला जाहीर सवाल केला, "गेल्या 20-25 वर्षांपासून जे कार्यकर्ते घर- दार सोडून भाजपाचा प्रचार करत आहेत, त्यांना बाजूला सारून बाहेरून आलेल्या लोकांना तुमच्या डोक्यावर बसवले जात आहे. मग त्या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता का नाही बसवला? भाजपामध्ये एकतर टॅलेंट नसेल किंवा त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचे नसेल. एवढी सत्ता असतानाही भाजपा कार्यकर्त्यांना का पदे मिळत नाहीत? त्यांना सत्तेपासून का दूर ठेवले जातं? याचा विचार आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच केला पाहिजे."
"ज्या पक्षाने सर्वकाही दिले, त्यांची साथ सोडताना तुम्ही आरशामध्ये स्वतःचा चेहरा तरी कसा काय पाहू शकता?" असा बोचरा सवाल त्यांनी बंडखोरांना विचारला. "यावर जी काही रीतसर कारवाई करायची असेल, ती आम्ही करूच," असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा -

