वॉर अँड फीड : सोशल मीडिया हे अमेरिका-इराण-इस्रायल युद्धातील एक नवीन रणांगण
फीड्स हे आता Propaganda च्या सर्वात अथक साधनांपैकी एक बनलं आहे. यासंदर्भात सादिया अझीम यांचा विश्लेषणात्मक लेख.

Published : May 3, 2026 at 6:13 PM IST
8 एप्रिल 2026 रोजी पूर्व जगाचा मोठा भाग सोशल मीडियावर आलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या एका मेसेजमुळं जागा झाला. हा मेसेज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून आला होता. 'Truth Social' या प्लॅटफॉर्मवर हा मेसेज पोस्ट करण्यात आला होता. या प्लॅटफॉर्मचा वापर ते आपल्या अत्यंत तातडीच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विधानांसाठी सतत करत असतात. दरम्यान, या पोस्ट करण्यात आलेल्या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, "आज रात्री संपूर्ण एक संस्कृती लयाला जाईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही."
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणसाठी त्यांनीच निश्चित केलेल्या रात्री 8 वाजण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांनी हा मेसेज पोस्ट केला होता. त्याच दिवशी पुढं, ती अंतिम मुदत संपण्यास दोन तासांपेक्षाही कमी अवधी उरला असताना, त्यांनी आपला पवित्रा बदलला आणि दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली. परंतु तोपर्यंत, ते विधान मात्र सर्वत्र पसरलं होतं. युद्धाच्या काळातील भाषेचं जे मूळ उद्दिष्ट असतं, ते त्यानं साध्य केलं होतं. केवळ सत्तेचं वर्णन करणं नव्हे, तर त्या सत्तेचं जाहीर प्रदर्शन करणं.
दुसऱ्या बाजूकडूनही एक समांतर मेसेज आला. त्या धमकीच्या आधीच 'एक्स'वर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी असा दावा केला की, इराणच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याकरिता 1 कोटी 40 लाखांहून अधिक इराणी नागरिकांनी नोंदणी केली आहे. हा दावा स्वतःच युद्धकालीन वक्तृत्वशैलीची साक्ष देत होता. हा केवळ शत्रूला उद्देशून केलेला मेसेज नव्हता, तर तो समर्थकांना, इतिहासाला आणि सोशल मीडियावरील 'फीड'लाही उद्देशून होता.
सोशल मीडिया स्ट्रीमला 'फीड' म्हणण्यामागे एक योग्य कारण आहे. ते लोकांच्या मनाला खाद्य पुरवतं. फीड्स हे आता Propaganda च्या सर्वात अथक साधनांपैकी एक बनलं आहे. समर्थकांची भरती करणं, विरोधकांना चिथावणं आणि युद्धाच्या परस्परविरोधी आवृत्त्या प्रत्यक्ष त्याच वेळी (real time) निर्माण करणं, ही त्याची कार्ये आहेत. परंतु युद्धाचा हा माहितीपूर्ण पैलू क्वचितच स्क्रीनपुरता मर्यादित राहतो. भारतात आणि इतरत्र, हे पटकन दूरचित्रवाणीवरील तापलेल्या चर्चा, सार्वजनिक चर्चा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये पसरतं, जिथं तमाशा, संताप आणि पुनरावृत्तीमुळं Propaganda लाच सर्वमान्य स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळं, तेल, भू-राजकारण आणि या युद्धाशी संबंधित व्यापक अनिश्चिततेविषयीच्या भीती लवकरच स्थानिक राजकारण आणि दैनंदिन चिंतेत गेली आहे.
आधुनिक युद्धाचा हाच निर्णायक धडा आहे. क्षेपणास्त्रे पायाभूत सुविधा नष्ट करू शकतात, पण Propaganda अर्थाला नवीन आकार देतो. तो केवळ खोट्या गोष्टी पसरवूनच नव्हे, तर भीती निर्माण करून, भावना तीव्र करून, लक्ष विचलित करून, संवादांना नवीन दिशा देऊन आणि तथ्ये स्थिर होण्यापूर्वीच लोकांच्या मनात ठसा उमटवून काम करतो. इतिहासकार दस्तऐवज तयार करण्याच्या खूप आधीच, जनता घटनांची स्वतःची आवृत्ती तयार करते. म्हणूनच Propaganda ला ‘खऱ्या’ लढाईभोवतीचे केवळ एक नाटक म्हणून नाकारता येत नाही. ते स्वतःच एक शस्त्र आहे. लोकांच्या भावना, त्यांची भीती आणि त्यांनी आधीच सत्य म्हणून स्वीकारलेल्या गोष्टींमध्ये केलेला एक संघटित हस्तक्षेप.
सध्याच्या अमेरिका-इराण युद्धामुळं ही गोष्ट नजरेतून सुटणं अशक्य झाले आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर युद्धभूमीवरील यश आणि देशांतर्गत पाठिंबा फुगवून सांगण्यासाठी एआयचा (AI) 'गैरमाहितीचं शस्त्र' म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. तर वायर्डनं दाखवून दिलं की, एक्स हे संकेतस्थळ बनावट आणि एआय-निर्मित युद्धविषयक सामग्रीनं (Content) कसं भरून गेलं होतं, तर दुसरीकडे ग्रोक (Grok) सारखी एआय साधनं फुटेजची पडताळणी करताना झगडत होती आणि काही वेळा तर स्वतःच दिशाभूल करणारी सामग्री तयार करत होती. फॅक्ट चेकर्सनी हा प्रकार अत्यंत स्पष्टपणं उघड केला आहे. पकडलेले सैनिक दाखवत असल्याचा खोटा दावा करणाऱ्या एआय-निर्मित फोटो, प्रभावशाली व्यक्तींकडून वाढवून सांगितल्या जाणाऱ्या नेत्यांच्या मृत्यूच्या अफवा, ऑनलाइन अटकळबाजी आणि मीम्स, फेरफार केलेली दृश्यं व सर्वोच्च नेत्यांकडून होणारे थेट टोमणे यांचे एक अविरत डिजिटल युद्ध, ज्यात बनावटगिरी आणि स्वतःचा अजेंडा ठरवणे, हे तथ्यांपेक्षा वारंवार पुढं निघून जातं.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित Propaganda आणि सततच्या माहितीच्या ओघाच्या या युगात वास्तवाला स्वतःच आपण 'वास्तव' आहोत, हे सतत सिद्ध करावं लागत आहे. यामुळंच Propaganda लष्करी दृष्ट्या उपयुक्त ठरतो. तो विजय मोठे करून दाखवू शकतो, अपयश लपवू शकतो, अटळता निर्माण करू शकतो आणि रणांगणावरील मोजता येण्याजोग्या तथ्यांच्या पलीकडे जाऊन सामर्थ्य प्रदर्शित करू शकतो. तो प्रतिकार निरर्थक आहे, असं भासवून शत्रूचं मनोधैर्य खच्ची करू शकतो, तर दुसरीकडे असुरक्षिततेला एक प्रदर्शन आणि दुखापतीला बलिदानाचं स्वरूप देऊन स्वतःच्या गोटाचं बळकटीकरण करू शकतो आणि अशा प्रकारेच कृत्रिमरित्या तयार केलेली धारणा इतिहासात घट्ट होते.
अजून पुराभिलेखीय इतिहास नाही, पण एक सार्वजनिक आवृत्ती जी सर्वसामान्य ज्ञान, जेवणाच्या टेबलावरील चर्चा, पक्षपाती लोककथा आणि अखेरीस राजकीय स्मृती बनते. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सभ्यतेच्या विनाशाचा उल्लेख केला, तेव्हा ते केवळ एक धमकी देण्यापेक्षा अधिक काहीतरी करत होते. ते त्या संघर्षाचे स्वरूप, नैतिकता आणि भावनिक पैलू एकाच व्यापक वाक्यात मांडण्याचा प्रयत्न करत होते. ती पोस्ट म्हणजे एका रणनीतीचं केलेलं प्रदर्शन होतं. त्या विधानामुळं बाजारपेठा, तेल, संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स आणि लोकांच्या आर्थिक भावनांमध्ये अस्थिरता वाढली.
जर सतत प्रसारित होणाऱ्या माहितीच्या स्वरूपातील Propaganda आता युद्धयंत्रणेचा भाग बनला असेल, तर माहिती संरक्षण देखील राज्याच्या सज्जतेचा भाग बनलं पाहिजे. सेन्सॉरशिप म्हणून नव्हे, तर विश्वासार्हतेची एक सार्वजनिक पायाभूत संरचना म्हणून. जी लोकशाही क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी पूर्व-सूचना प्रणाली तयार करते, परंतु सत्य आणि सार्वजनिक विश्वासाला हानी पोहोचवणाऱ्या सुनियोजित अपप्रचाराला कोणताही संस्थात्मक प्रतिसाद देत नाही, ती एका हातानं विषम युद्ध लढत आहे. याचा अर्थ बातम्यांकडे दुर्लक्ष करणं असा नाही. याचा अर्थ आहे, धोक्याच्या सूचनेकडून पुराव्याकडे वळायला शिकणं. क्षेपणास्त्रे आघातानं घाव घालतात; Propaganda ठसा उमटवून घाव घालतो. तो शत्रूला दुर्बळ किंवा राक्षसी ठरवतो, स्वतःच्या हिंसेला न्याय्य किंवा अटळ म्हणून सादर करतो, आणि प्रकरण मिटण्याआधीच द्विधा मनस्थितीत असलेल्या प्रेक्षकाच्या मनात एक तयार आठवण सोडून जातो. जुन्या युद्धांमध्ये, राज्ये प्रदेशासाठी लढत आणि नंतर कथानक लिहित. या युद्धात, प्रदेश अजून जळत असतानाच ते कथानकासाठी (narrative) लढत आहेत.
लेखिका पश्चिम बंगाल सरकारच्या डिजिटल सार्वजनिक सेवा वितरण कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचं आगामी पुस्तक Forwarded as Received: How Misinformation Turns Viral, Violent, and True, हे सार्वजनिक क्षेत्रातील माहितीविषयक विकारांचा वेध घेतं.
(टीप - या लेखात व्यक्त केलेली मते आणि दिलेली तथ्ये लेखकाची वैयक्तिक आहेत. येथे मांडलेली तथ्ये आणि मते यांच्याशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही.)
हेही वाचा :

