ETV Bharat / international

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई कोण होते? ते अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘विलन’ का ठरले?

इराणी मीडिया 'प्रेस टीव्ही' नं स्पष्ट केलं आहे की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हे अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ठार झाले आहेत.

Ayatollah Ali Khamenei
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 8:24 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर संयुक्त लष्करी हल्ला केल्यानंतर काही तासांतच, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूचा दावा केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था आयआरएनए आणि मुख्य वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीनं अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली. खामेनेई यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यही मारले गेले आहेत.

खरं तर, अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध अत्यंत आक्रमक संयुक्त लष्करी अभियान सुरू केल्याचं दिसत आहे. यात प्रामुख्यानं इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करण्यात आलं आहे. या कारवाईचा थेट उद्देश इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवणं हा असल्याचा आता स्पष्ट झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यांची पुष्टी करत इराणी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सरकारविरोधात उभं राहण्याचे आवाहन केलं आहे. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती आणखी ढवळून निघाली असून नव्या संकटाची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई कोण होते? आणि ते पाश्चात्त्य देशांच्या निशाण्यावर का आले होते? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

इराणमध्ये सुप्रीम लीडर हे सर्वोच्च पद : इराणच्या इस्लामिक गणराज्यात 'सुप्रीम लीडर' हे सर्वोच्च पद मानलं जातं. देशाच्या परराष्ट्र धोरणापासून संरक्षण, न्यायव्यवस्था आणि माध्यमांपर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांवर अंतिम अधिकार सुप्रीम लीडरकडे असतो. अनेक दशकांपासून खामेनेई यांनी इराणच्या धार्मिक व्यवस्थेचं नेतृत्व केलं आणि देशाच्या राजकीय निर्णयांवर ठोस प्रभाव दाखवला.

इराणचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावपूर्ण का आहेत? : अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांशी इराणचे संबंध तणावपूर्ण राहण्यामागं अणु कार्यक्रम, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकास आणि मध्यपूर्वेतील विविध सशस्त्र गटांना दिला जाणारा पाठिंबा हे प्रमुख मुद्दे होते. यामुळे खामेनेई पाश्चात्त्य राष्ट्रांच्या टीकेचे केंद्रबिंदू बनले होते.

आयतुल्लाह अली हुसेनी खामेनेई यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी इराणच्या मशहद इथं झाला. त्यांनी मशहद तसेच कोम इथं इस्लामिक धर्मशास्त्राचं शिक्षण घेतलं. कोममध्ये त्यांच्यावर 1979 मधील इराणच्या इस्लामिक क्रांतीचे शिल्पकार क्रांतिकारी धर्मगुरू रुहोल्लाह खोमेनी यांचा प्रभाव पडला. खामेनेई यांनी शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या राजवटीविरुद्धच्या क्रांतिकारी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. राजेशाही संपुष्टात येण्यापूर्वी त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली होती.

1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते : इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये स्थापन झालेल्या इस्लामिक रिपब्लिकमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. 1981 मध्ये इराण-इराक युद्धादरम्यान ते इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्याच वर्षी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते बचावले, मात्र त्यांच्या उजव्या हाताला आंशिक लकवा झाला. ते 1989 पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदावर होते. यानंतर खामेनेई 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत होते. रुहोल्लाह खोमेनी यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद स्विकारलं होतं.

अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘विलन’ का ठरले? : खामेनेई यांनी आपल्या कारकीर्दीत पाश्चात्त्य देशांशी नेहमीच तणावपूर्ण संबंध ठेवले. ते अमेरिकेला इराणचा क्रमांक एकचा शत्रू मानत, तर त्यानंतर इस्रायलला दुसरा प्रमुख शत्रू मानत. त्यांच्या सत्तेचा मुख्य आधार इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि बसीज हे अर्धसैनिक दल होते, ज्यांची निष्ठा थेट खामेनेई यांच्याशी जोडलेली होती.

या शत्रुत्तवाचं प्रमुख कारण म्हणजे इराणचा अणुकार्यक्रम. खामेनेई यांचा दावा होता की, इराणचा अणुकार्यक्रम केवळ नागरी आणि शांततामय उद्देशांसाठी आहे आणि अण्वस्त्रनिर्मितीचा त्यांचा हेतू नाही. मात्र, अमेरिका आणि इस्रायल सतत आरोप करत आले आहेत की, इराण गुप्तपणे अणुबॉम्ब विकसित करत आहे.

1989 मध्ये रूहोल्लाह खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते (सुप्रीम लीडर) म्हणून निवड झाली. त्यानंतर 'विलायत-ए-फकीह' (इस्लामिक न्यायविदाच्या संरक्षकत्वाचा सिद्धांत) या तत्त्वानुसार इराणच्या राजकीय व्यवस्थेत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आले आणि देशातील त्यांचा राजकीय प्रभाव अधिक बळकट झाला.