ट्रम्प यांचा वादग्रस्त निर्णय घेण्याचा सपाटा सुरूच; अमेरिका ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून पडली बाहेर
अमेरिकेनं भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.


By ANI
Published : January 8, 2026 at 1:05 PM IST
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) एका महत्त्वपूर्ण निर्णयावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये अमेरिकेच्या हिताच्या विरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, अधिवेशने आणि करारांमधून माघार घेण्याचे अर्थात बाहेर पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या या निर्णयासंदर्भातील निवेदनात ही माहिती देण्यात आली. यात ३५ गैर-संयुक्त राष्ट्र संघटना आणि ३१ संयुक्त राष्ट्र संस्थांमधून माघार घेण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
गैर-संयुक्त राष्ट्र संघटनांमध्ये भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) आणि इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज यांसारख्या प्रमुख पर्यावरण संस्थांचा समावेश आहे. इतर गैर-संयुक्त राष्ट्र संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच, आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्था, अटलांटिक सहकार्य भागीदारी आणि जागतिक दहशतवादविरोधी मंच यांचा समावेश आहे.
AMERICA FIRST 🇺🇸
— The White House (@WhiteHouse) January 7, 2026
Today, President Donald J. Trump signed a Presidential Memorandum directing the withdrawal of the United States from 66 international organizations that no longer serve American interests including:
🔴35-non UN organizations
🔴31 UN entities pic.twitter.com/72pTyV811N
ज्या प्रमुख संयुक्त राष्ट्र संघटनांमधून अमेरिकेनं माघार घेतली आहे, त्यांमध्ये आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग, आंतरराष्ट्रीय कायदा आयोग, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, शांतता निर्माण आयोग, संयुक्त राष्ट्र ऊर्जा आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी तसंच संयुक्त राष्ट्र जल यांचा समावेश आहे. यासंदर्भातील आदेशात नमूद केलं आहे की, ट्रम्प यांनी सर्व कार्यकारी विभाग आणि एजन्सींना आदेशात नमूद केलेल्या संघटनांमधून अमेरिकेनं लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत आणि सांगितलं आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या बाबतीत, माघार म्हणजे कायद्यानं परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत त्या संस्थांमधील सहभाग किंवा निधी थांबवणे असा होतो. त्यात नमूद केलं आहे की, ट्रम्प यांचा हा निर्णय परराष्ट्र मंत्र्यांचा अहवाल विचारात घेतल्यानंतर आणि आपल्या मंत्रिमंडळाशी विचारविनिमय केल्यानंतर घेण्यात आला आहे. या विचारमंथनातून ते या निष्कर्षापर्यंत आले आहेत की, या संघटनांमधील सहभाग किंवा पाठिंबा अमेरिकेच्या हिताच्या विरोधात आहे.
व्हाईट हाऊसच्या एक्स हँडलवर म्हटल्याप्रमाणे, आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी एका अध्यक्षीय आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यात अमेरिकेच्या हिताचे रक्षण न करणाऱ्या ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
🔴३५ गैर-संयुक्त राष्ट्र संघटना
🔴३१ संयुक्त राष्ट्र संस्था
ट्रम्प प्रशासनाने जानेवारी २०२५ मध्ये कोविड-१९ महामारीच्या गैरव्यवस्थापनाचं कारण देत जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर जवळपास एका वर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अमेरिकेनं जुलै २०२५ मध्ये युनेस्कोमधूनही माघार घेतली होती, त्यावेळी म्हटलं होतं की ही संस्था अमेरिकेच्या "राष्ट्रीय हिताची" नाही.

