अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "शस्त्रसंधी संपली, आता कोणताही करार होणार नाही"
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपली आहे, आता आम्हाला कोणताही करार करायचा नाही, अशी घोषणा केली आहे.

Published : July 8, 2026 at 6:16 PM IST
दुबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु होता. मात्र, काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यामुळं दोन्ही देशांमधील संघर्ष काहीकाळ थांबला होता. पण, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपली आहे, आता आम्हाला कोणताही करार करायचा नाही, अशी घोषणा केली आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितलं की, इराणसोबतचा अंतरिम करार कालबाह्य झाला आहे, परंतु ते चर्चा सुरू ठेवण्यास परवानगी देतील. ते म्हणाले, "माझ्या मते, हे आता संपले आहे. तसंच माझ्या दृष्टीनं, हा केवळ वेळेचा अपव्यय आहे," असंही त्यांनी सांगितलं.
On the status of the ceasefire with Iran, US President Donald Trump says, "To me, I think it's over. I don't want to deal with them anymore. They're scum... They're led by sick people... I'll speak to our negotiators. They want to negotiate—they're good people... but they have to… pic.twitter.com/8oZYJJS7dV
— ANI (@ANI) July 8, 2026
क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा : तेहराननं होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेनं केला होता. यानंतर अमेरिकेनं बुधवारी सकाळी अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान, इराणनं बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकी तळांवर अनेक हल्ले करून प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर तेहराननं अमेरिकेला तत्काळ इशारा दिला की, "आवश्यक वाटेल, ती सर्व पावलं उचलली जातील." त्यामुळं दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचा अंतरिम करार रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि मध्य पूर्वेत मोठ्या संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी सकाळी अमेरिकेच्या नौदलाच्या 5 व्या ताफ्याचे मुख्यालय असलेल्या बहरीननं आणि अमेरिकेच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या कुवेतनं क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिला आहे.
खामेनेईंच्या दफनविधीनंतर अंतिम करारासंदर्भात होणार होती चर्चा : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अयातुल्ला अली खामेनेई यांचे अंत्यसंस्कार पुढं ढकलण्यात आले होते. आता त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमाला 4 जुलैपासून सुरुवात झाली असून 9 जुलैला अयातुल्ला अली खामेनेई यांचे मूळ गाव मशहद येथील पवित्र 'इमाम रझा दर्गा' इथं त्यांच्या पार्थिवाचं दफन केलं जाणार आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या दफनविधीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील अंतिम करारासंदर्भात चर्चा होणार होती. या चर्चेत होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा सुरू करणे व तेहरानचा वादग्रस्त अणुकार्यक्रम मागे घेणे यांसारख्या सर्वात कठीण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार होतं. मात्र, आता नवीन हल्ल्यांमुळं यावर शंका निर्माण झाली आहे. तर इराणचे संसद अध्यक्ष, मोहम्मद बगेर गालिबफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर म्हटलं आहे की, "धमक्या आणि खंडणीचं युग संपलं आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. आम्ही झुकणार नाही."
हेही वाचा :

