सौदीच्या रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला; प्रत्युत्तर लवकरच- ट्रम्प यांचा इशारा
सौदीच्या रियाध येथील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे.

Published : March 3, 2026 at 8:17 AM IST
नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ताज्या माहितीनुसार, रियाध येथील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला झाल्यामुळे तिथं आग लागल्याची घटना समोर आली आहे. सोबतच, सऊदी अरेबियानं चार प्रोजेक्टाइल हवेतच पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सोमवारी अधिक तीव्र झाला. तेहरान समर्थित मिलिशिया गटही या संघर्षात सहभागी झाल्यानं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ल्यांची व्याप्ती वाढली आहे.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाची पुष्टी : सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयानं रियाध येथील अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोनद्वारे हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या हल्ल्यात इमारतीत आग लागली असून किरकोळ भौतिक नुकसान झालं आहे, असं मंत्रालयाने 'एक्स'वरील निवेदनात म्हटलं आहे.
सौदी अरेबियातील यूएस मिशननं जेद्दा, रियाध आणि धहरान येथील नागरिकांसाठी 'शेल्टर-इन-प्लेस' सूचना जारी केली आहे. तसेच या प्रदेशातील लष्करी तळांवरील अनावश्यक प्रवास मर्यादित ठेवण्याचं सांगितलं आहे.
लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल- ट्रम्प : दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका मुलाखतीत अमेरिकेकडून लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला. 'यावर अमेरिका कशी प्रतिक्रिया देईल हे तुम्हाला लवकरच कळेल,' असं त्यांनी म्हटलं.
अमेरिकन दूतावासानं ड्रोन हल्ल्यामुळे मर्यादित आग आणि किरकोळ नुकसान झाल्याची पुष्टी केली आहे. हल्ल्यानंतर जेद्दा, रियाध आणि धहरान येथील अमेरिकन नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
In his first reaction to the attack on the U.S. Embassy in Riyadh, President Trump told me, " you'll find out soon," what his retaliation will be. https://t.co/gWajurtUVT
— Kellie Meyer (@KellieMeyerNews) March 3, 2026
इराणनं अरब देशांवर क्षेपणास्त्रं डागली : इराणनंही इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी अनेक अरब देशांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत, तर हिजबुल्लाहनं लेबनॉनमधून रॉकेट आणि ड्रोनच्या माध्यमांतून इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलनं बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये आणि दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. लेबनीज अधिकाऱ्यांनी किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दरम्यान, इस्रायलनंहा संघर्ष दीर्घकाळ चालू शकतो, असा इशारा दिला आहे.
अमेरिकेशी चर्चा करणार नाही- इराण : युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहराननं आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. वरिष्ठ नेते अली लारीजानी यांनी स्पष्ट केलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटीची तयारी दर्शवली असली तरी इराण अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही.
المتحدث الرسمي لوزارة الدفاع: تعرّضت السفارة الأمريكية في الرياض لهجوم بمسيّرتين بحسب التقديرات الأولية، ونتج عن ذلك حريق محدود وأضرار مادية بسيطة في المبنى. pic.twitter.com/YuCukrePkH
— وزارة الدفاع (@modgovksa) March 3, 2026
सौदीच्या रिफायनरीवर ड्रोन हल्ला : या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरही होत आहे. इराणी ड्रोनने सौदी अरेबियातील रास तनुरा रिफायनरीवर हल्ला केला. दररोज 5 लाख बॅरलपेक्षा अधिक तेल प्रक्रिया करणाऱ्या या प्रकल्पातील कामकाज काही काळासाठी थांबवावं लागले. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती आणि परिसरात सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आणि धमक्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्याच्या मार्गांबाबत चिंता अधिक वाढली आहे.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर युद्धाचा भडका आणखी वाढला. इराणी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, लष्करी मोहीम सुरू झाल्यापासून शेकडो लोक मारले गेले आहेत, इराणी रेड क्रेसेंटने १३१ शहरांमध्ये किमान ५५५ मृत्यूची नोंद केली आहे.

