ETV Bharat / international

व्हेनेझुएला अध्यक्षांच्या अटकेनंतर अमेरिका तेलसाठे घेणार ताब्यात; न्यूयॉर्कच्या महापौरांनी ट्रम्प यांना संपर्क करून केला विरोध

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. त्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघासह न्यूयॉर्कच्या महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

US Plans To Run Venezuela
डोनाल्ड ट्रम्प कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 10:58 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन- व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिकेकडूनच चालवण्यात येणार आहे. तसेच तेलसाठ्याचा वापर करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

अमेरिकच्या विशेष दलानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या घरामधून ताब्यात घेतलं. काही तासामध्येच त्यांना अमेरिकेत आणून शनिवारी न्यूयॉर्कच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. व्हेनेझुएला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली येईल, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं.

US Plans To Run Venezuela
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो अटकेत (Truth Social/ @realDonaldTrump))

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यात चालणार खटला- शनिवारी पहाटेच्या वेळी अचानक हल्ला करुन अमेरिकेच्या कमांडोंनी मादुरो आणि त्यांच्या पत्नीला घरातून ताब्यात घेतलं. तर हवाई हल्ला करून काराकास आणि आसपासच्या ठिकाणांवर बॉम्बवर्षाव करण्यात आला. मादुरो आणि त्यांच्या पत्नीवर अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांच्या आरोपाखाली खटला चालवला जाणार आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांच्यावर न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मादुरो हे अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सामील अमेरिकेनं सातत्यानं आरोप केले होते. हे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. अमेरिकेच्या सैन्यदलानं तेल-समृद्ध असलेल्या व्हेनेझुएलाची राजधानी काराकासवर हल्ला केल्यानंतर व्हेनेझुएलानं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला- व्हेनेझुएलामधील अस्थिर राजकीय स्थिती लक्षात घेता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तिथं सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. व्हेनेझुएलामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आणि आपल्या हालचाली मर्यादित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. काराकासमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा परराष्ट्रमंत्रालयानं सल्ला दिला आहे. मंत्रालयानं पुढे भारतीयांना +58-412-9584288 या फोन क्रमांकावर (व्हॉट्सॲप कॉलसाठी देखील) आणि cons.caracas@mea.gov.in या ईमेल आयडीद्वारे दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. काराकासमधील दूतावासाच्या माहितीनुसार, व्हेनेझुएलामध्ये सुमारे 50 अनिवासी भारतीय आणि 30 भारतीय वंशाचे लोक राहतात.

अँटोनियो गुटेरेस यांच्यासह झोहरान ममदानी यांनी व्यक्त केली चिंता- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. या घडामोडी एक धोकादायक पद्धत निर्माण करत आहेत, अशी त्यांनी भीती व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांचा आदर करण्यात आला नाही, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यानं ताब्यात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संवाद साधत सार्वभौम राष्ट्रावरील एकतर्फी हल्ला म्हणजे 'युद्धाची कृती' असे म्हटलं आहे. मात्र, ट्रम्प यांनी काय उत्तर दिलं, याचा तपशील त्यांनी दिला नाही. सत्ता परिवर्तनाचा उघड प्रयत्न हा न्यूयॉर्कमधील रहिवाशांवर विशेषत: आपले शहर मानणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर परिणाम होईल. त्यांचे आणि प्रत्येक न्यूयॉर्कवासीयांचे संरक्षणावर माझे लक्ष आहे, असे न्यूयॉर्कच्या महापौरांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना यांना मिळालाय नोबेल- उल्लेखनीय बाब म्हणजे नोबेल शांततेचा पुरस्कार मिळविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं आग्रही राहिले आहेत. गतवर्षी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार जाहीर झाला. लोकशाहीचे खंबीर समर्थक म्हणून त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्याच व्हेनेझुएलावर ट्रम्प यांच्या आदेशानं अमेरिकेच्या सैन्यदलानं हल्ला केला.

हेही वाचा-