PM नरेंद्र मोदींनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट; पश्चिम आशियातील संघर्ष संवादाद्वारे सोडवण्याचं केलं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांच्यासोबत फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

Published : August 31, 2026 at 6:02 PM IST
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (31 ऑगस्ट) किर्गिस्तानमधील बिश्केक इथं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष संवादाद्वारे सोडवण्याचे आवाहन केलं आणि नौवहन व व्यापाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबाबतचा आपला आग्रह पुन्हा एकदा अधोरेखित केला. दरम्यान, यावर्षी 28 फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषद आणि 'एससीओ प्लस' बैठकीच्या पार्श्वभूमीवर झाली.
पश्चिम आशियातील संघर्ष संवादाद्वारे सोडवण्याचं केलं आवाहन : पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांच्यासोबत फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. "दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. त्यांनी पश्चिम आशियाई क्षेत्रातील अलीकडील घडामोडींचा आढावा घेतला. सर्व प्रश्न संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच सोडवले जावेत, ही भारताची सातत्यपूर्ण भूमिका पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली," असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. या भागात शांतता व स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी तसंच नौवहन आणि व्यापाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारतानं सुरक्षित नौवहनासाठी, विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनीमध्ये वारंवार आग्रह धरला आहे.
PM @narendramodi had a fruitful meeting with President Masoud Pezeshkian @drpezeshkian of Iran on the sidelines of the SCO Summit in Bishkek.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) August 31, 2026
The two leaders discussed various aspects of bilateral ties. They reviewed recent developments in the West Asia region. Prime Minister… pic.twitter.com/qusMma7JIU
याआधीही झाली होती चर्चा : होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाजवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ती वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील भू-राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. भारतानं यापूर्वीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेझेश्कियान यांच्यात अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीबाबतही चर्चा केली आहे. याआधी इराणच्या सरकारी IRNA वृत्तसंस्थेनं सांगितलं होतं की, पेझेश्कियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसंच किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसह अनेक सहभागी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार होते.
अस्थिरता सर्वच देशांसाठी हानिकारक : दौऱ्याला निघण्यापूर्वी पेझेश्कियान म्हणाले की, "इराणला युद्ध नको आहे, परंतु कोणत्याही आक्रमणाला ते ताकदीनिशी आणि दृढनिश्चयाने प्रत्युत्तर देईल." याचबरोबर, पेझेश्कियान यांनी या क्षेत्रातील अस्थिरता सर्वच देशांसाठी हानिकारक असल्याचं नमूद केलं आणि आर्थिक व सुरक्षाविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परस्पर सहकार्याची व एकजुटीची गरज असल्याचं अधोरेखित केलं. "ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून त्यात या क्षेत्रातील बहुतांश नेते उपस्थित राहणार आहेत. काही आंतरराष्ट्रीय संस्था जगात एकसंध अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना, जागतिक पटलावर विविध आणि स्वतंत्र आवाज अस्तित्वात असल्याचं प्रतीक म्हणून या बैठकीकडे पाहिलं जातं," असंही त्यांनी अहवालात म्हटल्यानुसार सांगितलं.
हेही वाचा :

