पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, डझनभर नागरिकांचा मृत्यू
पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून मोठी कारवाई केली. पाकिस्तानच्या हवाई दलानं अफगाणिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केलं.

Published : February 22, 2026 at 8:27 AM IST
|Updated : February 22, 2026 at 8:51 AM IST
काबूल - दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेल्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून मोठी कारवाई केली. पाकिस्तानच्या हवाई दलानं अफगाणिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केलं असून, यामध्ये 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' आणि 'इस्लामिक स्टेट-खोरासान'च्या ठिकाणांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे या कारवाईची पुष्टी केली आहे.
पाकिस्तान सरकारनं या कारवाईला 'जवाबी कारवाई' म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील अनेक ठिकाणी मोठे आत्मघाती हल्ले झाले होते.
माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी 'एक्स'वर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे, पाकिस्ताननं इस्लामिक स्टेट गटाच्या एका संलग्न संस्थेलाही लक्ष्य केलं आहे. हल्ले कुठे केले गेले हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही किंवा त्याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.
अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी 'एक्स'वर पोस्ट केलं, पाकिस्ताननं पक्तिका प्रांतांमध्ये आमच्या नागरिकांवर बॉम्बहल्ले केले. यामध्ये महिला आणि मुलांसह डझनभर लोक ठार झाले असून, अनेक जखमी झाले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी इस्लामाबादमधील शिया मशिदीत झालेल्या आत्मघातकी स्फोटाच्या आणि शनिवारी झालेल्या एका आत्मघातकी बॉम्बस्फोटासह वायव्य पाकिस्तानमध्ये झालेल्या इतर अलीकडील आत्मघातकी बॉम्बस्फोटांच्या प्रत्युत्तरात हे हल्ले करण्यात आल्याचं पाकिस्तानच्या मंत्रालयानं म्हटलं आहे.
2008 च्या मॅरियट हॉटेल बॉम्बस्फोटानंतर इस्लामाबादमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाला होता. यात 160 हून अधिक जण जखमी झाले होते. पाकिस्ताननं रविवारी म्हटले आहे की, वारंवार आवाहनानंतरही, काबूलच्या तालिबान अधिकाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे.
इस्लामाबादने आंतरराष्ट्रीय समुदायाला असेही आवाहन केले आहे की, त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या दोहा करारानुसार काबुलला इतर देशांविरुद्धच्या शत्रुत्वाच्या कृतींना पाठिंबा न देण्याच्या वचनबद्धतेचे पालन करण्यास उद्युक्त करावे. 2021 मध्ये तालिबान अधिकाऱ्यांनी काबुलवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या कटुतेचा वाद सुरू आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दणका! टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत वाढवला

