ETV Bharat / international

भारत-इराणमध्ये व्यापाराबाबत चर्चा नाही; नरेंद्र मोदी आणि मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीनंतर मार्को रुबिओंचा निर्बंधांचा इशारा

पश्चिम आशियातील या संघर्षादरम्यान तेहरानला अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्यास मदत करणाऱ्या देशांवरही निर्बंध लादले जाऊ शकतात, असा इशाराही मार्को रुबिओ यांनी दिला.

Marco Rubio
मार्को रुबियो (File Photo - ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 3, 2026 at 2:48 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

वॉशिंग्टन : भारत आणि इराण यांच्यात सध्या कोणत्याही व्यापार कराराची चर्चा सुरू आहे, असं आपल्याला वाटत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. तसंच पश्चिम आशियातील या संघर्षादरम्यान तेहरानला अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्यास मदत करणाऱ्या देशांवरही निर्बंध लादले जाऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, किर्गिझस्तानमधील बिश्केक इथं झालेल्या 26 व्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतल्यानंतर मार्को रुबियो यांनी ही टिप्पणी केली.

भारत-इराणमध्ये व्यापाराबाबत चर्चा नाही : या शिखर परिषदेत नरेंद्र मोदी आणि मसूद पेझेश्कियान यांनी परस्पर संबंध, व्यापार आणि पश्चिम आशियातील सद्यस्थितीवर चर्चा केली होती. याबाबत मंगळवारी 'द ब्रायन किल्मीड शो' मध्ये ब्रायन किल्मीड यांच्याशी बोलताना मार्को रुबियो म्हणाले, "भारत आणि इराण यांच्यात कोणताही व्यापार कराराची चर्चा सुरू आहे, असं मला वाटत नाही." पुढं त्यांनी सांगितलं की, देश स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवतात आणि अनेक देश इराण सरकारशी संपर्क ठेवतात. ते म्हणाले, "अर्थातच, सर्व देश स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवतात आणि जगभरातील अनेक देश इराण सरकारशी संवाद साधतात."

इराणला निर्बंधांपासून वाचण्यासाठी मदत करू नये : दरम्यान, इतर देशांनी इराणला निर्बंधांपासून वाचण्यासाठी मदत करू नये, या अमेरिकेच्या भूमिकेवर मार्को रुबियो यांनी जोर दिला. ते म्हणाले की, "राष्ट्राध्यक्षांनीही हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणत्याही देशानं इराणला अशी यंत्रणा उभारण्यास मदत करू नये, ज्याद्वारे ते महसूल मिळवू शकतील आणि त्या पैशांचा वापर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी व अणुशस्त्र बनवण्याच्या प्रयत्नांसाठी करतील." यावेळी मार्को रुबियो यांनी इशारा दिला की, अशा कृतींना प्रोत्साहन देणाऱ्या देशांना स्वतः अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरं जावं लागू शकतं.

मोदी आणि पेझेश्कियान यांची भेट : 31 ऑगस्ट रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच या प्रदेशात मुक्त संचार आणि नागरिक व नागरी पायाभूत सुविधांच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं होतं. तसंच नवी दिल्लीला आगामी काळात तेहरानसोबतच्या व्यापाराची व्याप्ती वाढवायची आहे आणि त्यात विविधता आणायची आहे, असं नरेंद्र मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्षांना सांगितलं होतं. "बिश्केक इथं राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. विविध क्षेत्रांमधील भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला," असं नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. दिल्ली एम्समध्ये 15 वर्षीय तन्वीचा मृत्यू, कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  2. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओंची घोषणा; माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारला पदभार
  3. नरेंद्र मोदी NGT च्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार; पर्यावरण आणि हवामानविषयक आव्हानांवर होणार चर्चा