ETV Bharat / international

नेपाळ पूर अपडेट : मृतांचा आकडा 1,003 वर पोहोचला, जवळपास 4,000 लोक बेपत्ता

पुरामुळं आतापर्यंत 1,003 मृत्यूंची पुष्टी झाली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nepal floods Updates :  Death toll surges to 1,003; nearly 4,000 still missing
नेपाळ पूर अपडेट : मृतांचा आकडा 1,003 वर पोहोचला, जवळपास 4,000 लोक बेपत्ता (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 1, 2026 at 5:53 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

काठमांडू : नेपाळमध्ये विनाशकारी पुरामुळं प्रचंड विध्वंस झाला आहे. बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा सातत्यानं वाढताना दिसून येत आहे. पुरामुळं आतापर्यंत 1,003 मृत्यूंची पुष्टी झाली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर जवळपास 12,000 लोकांना वाचवण्यात आलं असून बेपत्ता लोकांचा शोध सुरूच आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. देशभरातील आठ जिल्ह्यांमधून सुरक्षा दलांनी आणखी मृतदेह बाहेर काढल्याने नेपाळमधील पुरामुळे मृतांचा आकडा 1,003 वर पोहोचला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं (एनडीआरआरएमए) सांगितलं की, जवळपास 4,000 लोक अजूनही बेपत्ता आहेत, तर सुमारे 12,000 लोकांना वाचवण्यात आलं आहे.

26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमस्खलन, बर्फवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळं हा विनाशकारी पूर आला. या पुरामुळं उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली. तसंच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झालं आणि जलविद्युत प्रकल्पांचंही नुकसान झालं. या पुरामुळं हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरूच आहे. दरम्यान, या आपत्तीनंतर, पूरग्रस्त नेपाळमध्ये किमान 275 भारतीय आणि भारतीय वंशाचे 128 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर, नेपाळमधील भारतीय दूतावासानं मंगळवारी परदेशी नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे आणि ते त्यांच्या मायदेशी परत पाठवणे यासंबंधीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर केली.

नेपाळ सरकारनं परदेशी नागरिकांचे मृतदेह हस्तांतरित करण्यासाठी नऊ टप्प्यांची प्रक्रिया निश्चित केली आहे. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता, छायाचित्रे व तपशील नोंदवणे, शवविच्छेदन, मृत्यूचं कारण तपासणे आणि अधिकृत ओळख पटवणे यांचा समावेश आहे, असं दूतावासानं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याचबरोबर, या प्रक्रियेमध्ये फिंगरप्रिंट्स, डीएनए आणि इतर फॉरेन्सिक नमुने गोळा करणे, मृत व्यक्तीचा पासपोर्ट किंवा ओळखपत्रे यांची पडताळणी करणे, दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी समन्वय साधण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, तसंच मृतदेह हस्तांतरणाचे किंवा सोडण्याचे पत्र (मेमो) व पावती जारी करणे यांचाही समावेश असल्याचं त्यात म्हटलं आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पुराचा इशारा : अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळं नेपाळ सरकारनं पुन्हा पुराचा इशारा जारी केला आहे. त्रिशुलीला रसुवाशी जोडणारा रस्ता अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळं वाहून गेला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाणी वेगाने त्रिशुलीच्या दिशेनं वाहत असून, त्यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. याशिवाय, पुरामुळं परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्रिशुली ते रसुवा दरम्यानचा रस्ता संपर्कही विस्कळीत झाला आहे.

हेही वाचा :

  1. भूखंडाचे आरक्षण बदलण्याची मुंबई फुटबॉल असोसिएशनची मागणी निरर्थक, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
  2. मुंबईकरांना महागाईचा धक्का! CNG 2 रुपयांनी महागला, PNG दरही वाढले; नवीन दर जाणून घ्या
  3. लुधियानामध्ये महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून गुन्हा दाखल