US-Israel Iran War : कुवेतनं चुकून अमेरिकेची तीन F-15E लढाऊ विमानं पाडली

Published : March 2, 2026 at 3:52 PM IST
|Updated : March 2, 2026 at 9:11 PM IST
तेहरान : अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांचा आजचा तिसरा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतरही इराणनं क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवलं आहेत. दरम्यान, इराणी रेड क्रेसेंट सोसायटीनं सोमवारी सांगितलं की, इराणला लक्ष्य करून अमेरिका-इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत किमान 555 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच युद्धात आतापर्यंत 131 शहरांवर हल्ला करण्यात आला आहे, असं सोसायटीनं म्हटलं आहे. याचबरोबर, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, बहरीन आणि कुवेत यासारख्या देशांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळं व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ले करत आहेत. रुग्णालये, टीव्ही स्टेशन आणि इतर इमारतींना लक्ष्य करत आहेत, असं सोमवारी इराणी सरकारी टीव्हीनं वृत्त दिलं आहे. तसंच इराण सध्या 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि सात दिवसांची सुट्टी पाळत आहे.
LIVE FEED
फ्रान्स अण्वस्त्रांचा साठा वाढवणार, इमॅन्युएल मॅक्रॉन यांची माहिती
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर सुरू असलेल्या आखाती युद्धादरम्यान फ्रान्सनं अण्वस्त्रांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलं आहे की, फ्रान्स अनेक दशकांनंतर आपला अण्वस्त्रांचा साठा वाढवेल.
इराकमधील अमेरिकन नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन
अमेरिकन नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन बगदादमधील अमेरिकन दूतावासानं केलं आहे. तसंच देशात कार्यरत असलेल्या इराण-समर्थित गटांकडून येणाऱ्या धोक्यांबद्दल इशारा दिला आहे.
नरेंद्र मोदींनी बहरीनचे राजे आणि सौदी अरेबियाच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर, त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधानांनी दोन्ही देशांवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि दोन्ही देशांमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत चर्चा केली.
इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला, इराणच्या सरकारी टीव्हीद्वारे वृत्त
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणनं सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचं सरकारी टेलिव्हिजननं म्हटलं आहे. "ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस 4 ची 11 वी लाट बेरशेवा येथील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह सुरू आहे," असं इराणच्या सरकारी टीव्हीनं स्थानिक वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता (1200 GMT) रेव्होल्यूशनरी गार्ड्सच्या निवेदनाचा हवाला देत सांगितलं.
गुजरातमधील पालनपूर येथील 20 हून अधिक तरुण अडकले दुबईत
मध्यपूर्वेतील इराक आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धाचा तणाव आता गुजरातमधील बनासकांठा इथं पोहोचला आहे. व्यवसाय आणि नोकरीसाठी दुबईमध्ये स्थायिक झालेल्या पालनपूरमधील 20 हून अधिक तरुणांचे पालक चिंतेत आहेत. कुटुंबं व्हिडिओ कॉलद्वारे तासन्तास त्यांच्या मुलांची चौकशी करत आहेत. परदेशात राहणाऱ्या एका तरुणाचे वडील जयेशभाई रावल म्हणाले की, "आतापर्यंत तिथं कोणतीही समस्या आली नाही. विमान उड्डाणे निलंबित आहेत, त्यामुळं ते प्रवास करू शकत नाहीत. सध्या शॉपिंग मॉल आणि हॉटेल्स उघडी आहेत, परंतु बाजारपेठा बंद आहेत, त्यामुळं सर्व मुलं घरी आहेत."
कुवेतनं चुकून तीन अमेरिकन लढाऊ विमानं पाडली
युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडनं (सेंटकॉम) म्हटलं आहे की, कुवेती एअर डिफेन्सनं रविवारी चुकून तीन US F-15E स्ट्राइक ईगल्स पाडली. "सर्व सहा एअर क्रू सुरक्षितपणे बाहेर पडले, त्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवेतनं ही घटना मान्य केली आहे आणि आम्ही कुवेती डिफेन्स फोर्सच्या प्रयत्नांबद्दल आणि या चालू ऑपरेशनमध्ये त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत," असं निवेदनात म्हटलं आहे. याचबरोबर पुढं सांगितलं की, "घटनेचे कारण तपासले जात आहे. अधिक माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल."
आम्ही भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत - भारतीय दूतावास, ओमान
ओमानमधील भारतीय दूतावासानं म्हटलं आहे की, "एमव्ही स्कायलाईट घटनेनंतर बेपत्ता क्रू सदस्यांच्या शोधात सहभागी असलेल्या ओमानी अधिकाऱ्यांशी मिशन सतत संपर्कात आहे. एमव्ही स्कायलाईटमधून सुटका केलेल्या क्रू सदस्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आम्ही ओमानी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत आणि या प्रकरणात सर्वतोपरी मदत करत राहू."
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाला लक्ष्य केल्याचा इराणी गार्ड्सचा दावा
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सन सोमवारी सांगितलं की, त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कार्यालय आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आलं आहे. "झायोनिस्ट राजवटीच्या गुन्हेगारी पंतप्रधानांचे कार्यालय आणि राजवटीच्या हवाई दलाच्या कमांडरचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले," असे गार्ड्सने फार्स वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, असं एएफपीनं वृत्त दिलं आहे.
सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळावर ड्रोन हल्ला
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सायप्रसमधील ब्रिटीश लष्करी तळावर संशयास्पद ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्याला ब्रिटीश सैन्याने प्रत्युत्तर दिलं असून यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला मध्यरात्री आरएएफ अक्रोटिरी तळावर झाला.
अणुऊर्जा केंद्रावर हल्ला, इराणचा दावा
अमेरिका-इस्रायली हवाई हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा केंद्राला लक्ष्य करण्यात आलं आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेत इराणच्या राजदूतानं केला आहे. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं (IAEA) म्हटले आहे की, इराणवर अलिकडेच झालेल्या अमेरिका आणि इस्रायली लष्करी हल्ल्यांमुळे रेडिओलॉजिकल परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. इराणमधील हल्ल्यांवरून असे दिसून येत नाही की इराणी अणुऊर्जा प्रकल्पांना कोणतेही नुकसान झाले आहे किंवा त्यांच्यावर थेट हल्ला झाला आहे.
ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरामकोनं रास तनुरा रिफायनरी केली बंद
सौदी अरामकोनं मध्य पूर्वेतील सर्वात मोठ्या तेल केंद्रांपैकी एक असलेल्या रास तनुरा रिफायनरीचं कामकाज बंद केलं आहे. सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, सौदी संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की अधिकाऱ्यांनी येणारे विमान पाडलं. सौदी लष्कराच्या प्रवक्त्यानं अधिकृत सौदी प्रेस एजन्सीवर ही घोषणा केली. साइटवरील ऑनलाइन व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर काळा धूर निघत असल्याचं दिसून आलं. यशस्वीरित्या रोखलेले ड्रोन देखील कचरा पसरवतात ज्यामुळं आग लागू शकते आणि जमिनीवर लोक जखमी होऊ शकतात. दम्मम जवळील रास तनुरा इथं दररोज अर्धा दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल उत्पादन करण्याची क्षमता आहे.

