ETV Bharat / international

US Israel Iran War: लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 72 जणांचा मृत्यू- मंत्रालय; इराणमध्ये मृतांचा आकडा 1045 वर

US Israel Iran War Live Updates
अमेरिका इस्रायल इराण युद्धाचे लाईव्ह अपडेट्स (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 7:32 AM IST

|

Updated : March 4, 2026 at 10:47 PM IST

Choose ETV Bharat

मुंबई US Israel Iran War Live : पश्चिम आशियातील तणावानं भीषण रूप धारण केलं असून संपूर्ण जगाचं लक्ष सध्या इराणकडं लागलं आहे. खरं तर, इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळली असून युद्ध अधिक तीव्र झाल्याचं चित्र आहे. एका बाजूला इस्रायल आणि अमेरिका इराणमधील ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले करत असल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसऱ्या बाजूला इराणनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने इस्रायलसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. दुबई, कुवैत, बहरीन, कतार आणि ओमान या देशांमध्ये क्षेपणास्त्रांच्या हालचालींमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर आदेश दिल्याची चर्चा असून त्यामुळे युद्धाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तेहरानमधील हजारो सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षांपासून हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या माध्यमातून सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हालचालींवर इस्रायलची बारकाईनं नजर होती, असा दावा केला जात आहे. या संघर्षाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून जागतिक बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत. एकूणच, इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पुढील घडामोडींवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

LIVE FEED

10:38 PM, 4 Mar 2026 (IST)

लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 72 जणांचा मृत्यू

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, देशावर इस्रायली हल्ल्यात मृतांची संख्या 72 वर पोहोचली आहे, तर किमान 437 जण जखमी झाले आहेत. तेहरानवर अमेरिका-इस्रायली हल्ल्यानंतर इराण समर्थित सशस्त्र गटानं उत्तर इस्रायलकडे रॉकेट डागल्यानंतर इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमापार लढाई पुन्हा सुरु झाली. इस्रायली सैन्यानं देशाच्या दक्षिण आणि बेरुतच्या दक्षिण भागात पुन्हा हवाई हल्ले सुरु करुन, सक्तीनं स्थलांतरित करण्याचे आदेश देऊन आणि लेबनॉनच्या प्रदेशात नवीन लष्करी चौक्या स्थापन करुन प्रत्युत्तर दिलं.

8:50 PM, 4 Mar 2026 (IST)

सौदी एअरलाइन्सची उड्डाणे ६ मार्चपर्यंत रद्द

सौदी एअरलाइन्सनं प्रमुख शहरांना जाणारी आणि येणारी उड्डाणे ६ मार्चपर्यंत रद्द केली आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे सौदी एअरलाइन्सने अम्मान, कुवेत, अबू धाबी, दुबई, दोहा, बहरीन, मॉस्को आणि पेशावरला जाणारी आणि येणारी उड्डाणे रद्द करण्याची मुदत ६ मार्च रोजी रात्री २३:५९ पर्यंत वाढवली आहे.

8:26 PM, 4 Mar 2026 (IST)

होर्मुझच्या जहाजातील 24 जणांच्या क्रूला ओमान नौदलानं वाचविले

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ माल्टीज ध्वज फडकवणाऱ्या एका मालवाहू जहाजावर दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याच्या वृत्ताला ओमानच्या नौदलानं प्रतिसाद दिला आहे. जहाजातील 24 जणांच्या क्रूला वाचवण्यात आले. त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात आली, असे नौदलानं म्हटलं आहे.

6:58 PM, 4 Mar 2026 (IST)

इराणशी झालेल्या संघर्षासाठी मध्यपूर्वेत अधिक सैन्य पाठविण्यात येणार- अमेरिकेचा महत्त्वाचा निर्णय

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "इराणशी झालेल्या संघर्षासाठी मध्यपूर्वेत अधिक सैन्य पाठविण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे, आम्ही यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला सर्व वेळ घेणार आहोत".

6:36 PM, 4 Mar 2026 (IST)

नांदेड जिल्ह्यातील पश्चिम आशियाई देशात राहणारे सर्व ५० नागरिक सुरक्षित

नांदेड - जिल्ह्यातील नागरिकांबाबत एक दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण ५० नागरिक दुबई, शारजाह, कतार, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये वास्तव्यास आहेत आणि ते सर्व सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राला प्राप्त झाली असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातील नागरिकांची माहिती संकलित करण्याचं काम हाती घेतलं होतं. त्यानुसार संबंधित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली आहे.

6:32 PM, 4 Mar 2026 (IST)

इराण-इस्राईल युद्धामुळे दुबईला जाणार छत्रपती संभाजीनगरमधील कांदा बंदरात अडकला

छत्रपती संभाजीनगर - इराण इस्राईल युद्धामुळे लासूर येथून पाठवण्यात आलेला ९०० क्विंटल कांदा बंदरात अडकल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून लासूर येथील बाजारसमिती प्रसिद्ध आहे. तेथून दुबईसाठी मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दोनवेळा कांद्याने भरलेले कंटेनर पाठवण्यात आले होते. तिसरा कंटेनर २८ फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला. मुंबई येथून समुद्र मार्गाने दुबईकडे सगळा माल जाणार होता. मात्र इराणने दुबईवर हल्ला केल्यानं पाठवण्यात आलेला कांदा मधेच थांबला. इतकंच नाही तर पुढच्या फेरीचं काम थांबवण्यात आलं असल्याची माहिती व्यापारी शुभम पवार यांनी दिली.

5:39 PM, 4 Mar 2026 (IST)

खमेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पुढे ढकलले!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी तेहरानमध्ये होणारा शासकीय अंत्यसंस्कार अभूतपूर्व गर्दी होण्याच्या अपेक्षेनं पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खमेनी यांचा मृत्यू झाला.

4:04 PM, 4 Mar 2026 (IST)

इराणी राजवटीतील अनेक नेत्यांचा मृत्यू झाल्यानं अमेरिकेसमोर मोठा पेच

"अमेरिका-इस्रायलनं इराणमध्ये मोहीम पूर्ण झाल्यानंतर इराणी राजवटीच्या आतून कोणीतरी सत्ता हाती घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो", असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढे ट्रम्प म्हणाले की," अमेरिका प्रशासनानं इराणमधील संभाव्य नवीन नेते म्हणून पाहिलेले अनेक इराणी अधिकारी अमेरिका-इस्रायलच्या मोहिमेत मारले गेले आहेत".

3:59 PM, 4 Mar 2026 (IST)

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांकडून वेळापत्रकात बदल

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी त्यांच्या वेळापत्रकात कॅलिब्रेटेड बदल केले आहेत. ४ मार्च (बुधवार) रोजी मर्यादित ५८ उड्डाणे चालवण्याची योजना आखली आहे. विदेशात अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी विशेष व्यवस्था केल्या जात आहेत, असे सरकारनं म्हटलं आहे.

3:56 PM, 4 Mar 2026 (IST)

मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी फ्रान्सचा महत्त्वाचा निर्णय

मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी फ्रान्सच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजाला बाल्टिक समुद्रातून भूमध्य समुद्रात हलवण्याचे आदेश दिले. मध्य पूर्वेत गेल्या काही तासांत राफेल लढाऊ विमाने, हवाई संरक्षण प्रणाली आणि हवाई रडार प्रणाली तैनात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

3:51 PM, 4 Mar 2026 (IST)

'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकरला अमेरिका संरक्षण देणार'-डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका-इराण युद्धादरम्यान तेलाच्या वाढत्या किमतींदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. "जर गरज पडली तर अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरला सुरक्षित ठेवेल", असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) सोमवारी अधिकृतपणे होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलं आहे.

3:44 PM, 4 Mar 2026 (IST)

इराण युद्धामुळे विविध प्रकारच्या वस्तुंचा तुटवडा आणि किमती वाढण्याची शक्यता

इराण युद्धामुळे होर्मुझच्या प्रमुख सामुद्रधुनीत तेल टँकरची वाहतूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. तसेच व्यापक जागतिक पुरवठा साखळीतही अडथळा येत आहे. त्यामुळे देशातील औषधनिर्माण, आशियातील अर्धवाहक आणि मध्य पूर्वेतून येणाऱ्या खतांसारख्या तेलापासून बनवलेल्या उत्पादनांवर परिणाम होत आहे. अनेक मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत. मध्य पूर्वेतून हवाई माल वाहून नेणारी विमाने ग्राउंड केली जातात. युद्ध जास्त काळ चालू राहिल्यास विविध प्रकारच्या वस्तूंवर तुटवडा आणि किमती वाढण्याची शक्यता जास्त असते.

3:39 PM, 4 Mar 2026 (IST)

अली खामेनी यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये हाय-स्पीड ४जी इंटरनेट सेवा बंदच

अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर झालेल्या निदर्शने आणि मोर्चावर बंधने आणण्यासाठी प्रशासनानं काश्मीरमध्ये महत्त्वाचे पावले उचलले आहेत. काश्मीरचे व्यावसायिक केंद्र असलेल्या लाल चौकाला टिन आणि काटेरी तारांनी वेढले आहे. अमीर कादल रस्त्याच्या पट्ट्यावरून पोलीस आणि निमलष्करी दलानं पादचाऱ्यांना जाण्यास मनाई केली आहे. १ मार्चपासून (रविवार) हाय-स्पीड ४जी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, पोस्टपेड मोबाइल डेटा सेवांसाठी (५जी/४जी/३जी) इंटरनेट स्पीड २जी (१२८केबीपीएस पेक्षा जास्त नाही) पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्री-ऑन-पोस्ट (जेके१०) डेटा, व्हॉइस आणि एसएमएससह प्रीपेड मोबाइल सेवा आज (४ मार्च) रात्री ८ वाजेपर्यंत संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

3:31 PM, 4 Mar 2026 (IST)

'अली खामेनी यांच्या जागी नियुक्त केलेल्या नेत्यालाही संपवू'- इस्त्रायलचा इशारा

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी म्हटलं की," अली खामेनी यांच्या जागी कोणताही नेता असो, त्याला संपविण्याचं उद्दिष्ट असणार आहे. त्याचे नाव काय आहे किंवा तो कुठे लपतो हे महत्त्वाचे नाही. आम्ही आमच्या अमेरिकन भागीदारांसह, राजवटीच्या क्षमता नष्ट करण्यासाठी आणि इराणी जनतेला ते उलथवून टाकण्यासाठी आणि त्यांची जागा घेण्यासाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी पूर्ण शक्तीनं कार्य करत राहू," असेही काट्झ यांनी सांगितलं.

3:15 PM, 4 Mar 2026 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनशी व्यापार तोडण्याची दिली धमकी; युरोपियन आयोगानं दिलं जोरदार प्रत्युत्तर

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेला त्यांच्या तळांचा वापर करण्यास परवानगी देण्यास नकार दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनशी व्यापार तोडण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर युरोपियन आयोगानं युरोपियन युनियनच्या हितांचे रक्षण करण्यास तयार आहे. ट्रम्पच्या धमक्यांना उत्तर देताना जारी केलेल्या निवेदनात आयोगाचे प्रवक्ते ओलोफ गिल म्हणाले, "आम्ही सर्व सदस्य राष्ट्रे आणि त्यांच्या सर्व नागरिकांसोबत एकजुटीनं उभे आहोत. आमच्या व्यापार धोरणाद्वारे युरोपियन युनियनच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास कारवाई करण्यास तयार आहोत."

1:27 PM, 4 Mar 2026 (IST)

खामेनेई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

इराणची राज्य वृत्तसंस्था आयआरएनएनं वृत्त दिलं आहे की, अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर तीन दिवसांचा शासकीय अंत्यसंस्कार केला जाईल. इस्लामिक डेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन कौन्सिलच्या निवेदनाचा हवाला देत, आयआरएनएने म्हटलं आहे की, "रात्री 10:00 वाजल्यापासून, लोक देशाच्या शहीद मार्गदर्शकाला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी तेहरानमधील इमाम खोमेनेई ग्रँड मशिदीला भेट देऊ शकतील." खामेनेई मृत्युच्या वेळी 86 वर्षांचे होते. त्यांना ईशान्य इराणमधील त्यांच्या मूळ गावी मशहद येथे दफन केले जाईल.

1:04 PM, 4 Mar 2026 (IST)

भारतीयांना मदत नियंत्रण कक्ष स्थापन

पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, पश्चिम आशियात अंदाजे १ कोटी भारतीय नागरिक राहतात आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही नवी दिल्लीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. इराण-अमेरिका संघर्ष वाढत असताना, इराणमधील भारतीय दूतावासाने इराणची राजधानी तेहरानमधून शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

1:02 PM, 4 Mar 2026 (IST)

इस्रायल आपले हवाई क्षेत्र विशिष्ट कालावधीसाठी उघडणार

इस्रायल 4 मार्च ते 5 मार्च दरम्यान रात्रीतून आपले हवाई क्षेत्र पुन्हा उघडणार आहे. इराणशी झालेल्या संघर्षादरम्यान बंद असलेल्या बेन गुरियन विमानतळावरून मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू होत आहेत.

11:29 AM, 4 Mar 2026 (IST)

फ्रान्स विमानवाहू युद्धनौका भूमध्य समुद्रात तैनात करणार

मिडल ईस्टमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आपले प्रमुख विमानवाहू युद्धनौका भूमध्य समुद्रात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

'मी चार्ल्स डी गॉल विमानवाहू नौका, तिची हवाई साधनं आणि फ्रिगेटसह एस्कॉर्ट ताफ्याला भूमध्य समुद्राच्या दिशेने रवाना होण्याचे आदेश दिले आहेत,' असं त्यांनी सांगितलं. चार्ल्स डी गॉल ही फ्रान्सची प्रमुख अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका असून तिला नॉर्थ अटलांटिकमधील तैनातीवरून पूर्व भूमध्य समुद्राच्या दिशेने वळवण्यात आले आहे.

11:26 AM, 4 Mar 2026 (IST)

कुवेत हवाई हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांचे फोटो अमेरिकेकडून प्रसिद्ध

कुवेतच्या शुएबा बंदरावर झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या चार सैनिकांचे फोटो अमेरिकन लष्कराने प्रसिद्ध केले आहेत.

11:26 AM, 4 Mar 2026 (IST)

इराण आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर वेगाने वाढवत आहे: अमेरिका

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे सभापती माइक जॉन्सन म्हणाले, "इराण आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर वेगाने वाढवत आहे, ज्यामुळे या प्रदेशातील मित्र राष्ट्रांसाठी धोका निर्माण झाला आहे."

10:55 AM, 4 Mar 2026 (IST)

अमेरिकेनं सांगितलं 'ऑपरेशन एपिक फ्युरी'चं उद्दिष्ट

व्हाईट हाऊसने इराणविरुद्धच्या ऑपरेशन एपिक फ्युरीची माहिती जाहीर केली आहे. अमेरिकेनं म्हटलं आहे की, त्यांचे उद्दिष्ट इराणची क्षेपणास्त्रे आणि नौदल पूर्णपणे नष्ट करणे, इराणशी संबंधित सशस्त्र गट जगाला अस्थिर करू शकत नाहीत याची खात्री करणे आणि इराण कधीही अण्वस्त्रे मिळवू नयेत याची खात्री करणे हे आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की ते हे युद्ध जिंकतील आणि इराणमधील सध्याची राजवट पराभूत होईल.

9:22 AM, 4 Mar 2026 (IST)

आम्ही युद्ध थांबवण्यास तयार आहोत: इराण

इराणचे माजी सर्वोच्च नेते खामेनी यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "आम्ही युद्ध थांबवण्यास तयार आहोत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा आदराने व्हायला हवी, इराणविरुद्ध काहीही हुकूमशाही करण्यासाठी नाही. आम्ही स्वतःचा बचाव करत आहोत. आम्ही आमचे हक्क मागत आहोत, दुसरे काही नाही."

9:20 AM, 4 Mar 2026 (IST)

जेद्दात अडकलेले भारतीय प्रवासी मायदेशी परतले

मध्य पूर्वेतील तणाव आणि हवाई क्षेत्रातील व्यापक अडथळ्यांदरम्यान, अडकलेले भारतीय प्रवासी जेद्दातून परतले आहेत.

8:35 AM, 4 Mar 2026 (IST)

दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ ड्रोन हल्ल्यात आग, कोणतीही जीवितहानी नाही

इराणवरील लष्करी हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संशयित ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या परिसराजवळ काल रात्री लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की कोणीही जखमी झाले नाही. दुबई अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ ड्रोनशी संबंधित घटनेमुळे लागलेली आग यशस्वीरित्या आटोक्यात आली आहे. आपत्कालीन पथकांनी त्वरित मदत केली. कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

7:26 AM, 4 Mar 2026 (IST)

'आम्ही 24 तास इराणमध्ये हल्ले करत राहू'

मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी कमांडरनं मंगळवारी सांगितलं की, अमेरिकन सैन्यानं आतापर्यंत इराणमधील जवळपास २००० टार्गेट्सवर हल्ला केला आहे. "आम्ही 2000 हून अधिक शस्त्रांसह जवळजवळ 2000 टार्गेट्सवर हल्ला केला आहे. आम्ही इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला गंभीरपणे कमकुवत केलं आहे आणि शेकडो इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं, लाँचर आणि ड्रोन नष्ट केले आहेत," अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडचे अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी एका व्हिडिओ संदेशात दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही 24/7 इराणमध्ये हल्ले करत राहू."

7:21 AM, 4 Mar 2026 (IST)

खामेनेई यांचे पुत्र मोज्तबा यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड

इस्रायली माध्यमांनुसार, अयातुल्ला खामेनेई यांचे पुत्र मोज्तबा होसेनी खामेनेई यांची इराणचे पुढचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणच्या तज्ज्ञ परिषदेने खमेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केल्याचे वृत्त आहे. तथापि, इराणने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

7:20 AM, 4 Mar 2026 (IST)

इराणमध्ये मृतांचा आकडा 787 वर

इराणच्या सरकारी माध्यमांनी, इराणी रेड क्रेसेंटने, अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या 787 वर पोहोचल्याचे वृत्त दिलं आहे. इस्रायली लष्करानं हिजबुल्लाहवर दुहेरी हल्ला सुरू केला आहे. इस्रायली भूदल लेबनॉनमध्ये घुसले आहेत. दरम्यान, आयडीएफने बेरूतमधील हिजबुल्लाह कमांड सेंटरवर अनेक हल्ले सुरू केले आहेत.

Last Updated : March 4, 2026 at 10:47 PM IST