ETV Bharat / international

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू: इराणी मीडिया

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त आहे. इराणच्या सरकारी मीडियानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Ayatollah Ali Khamenei
अयातुल्ला अली खामेनेई (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 7:36 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

तेहरान: इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी शनिवारी (28 फेब्रुवारी) केला. आता इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनंदेखील काही तासांनंतर स्पष्ट केलं आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. तस्निम आणि फार्स वृत्तसंस्थांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. 1989 पासून ते इराणी राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संलग्न असलेल्या वृत्तसंस्था फार्सच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च नेते खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातूदेखील हल्ल्यात ठार झाले आहेत.

ट्रम्प काय म्हणाले? : ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींमध्ये गणना होणारे खामेनेई आता हयात नाहीत.' सोबतच, 'अचूक आणि जोरदार बॉम्बहल्ले संपूर्ण आठवडाभर आणि त्यानंतरही सुरू राहतील, असा इशारा देखील दिला. या कारवाईमुळे इराणमधील जनतेला आपला देश 'परत मिळवण्याची सर्वात मोठी संधी' मिळाल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र, या घटनेमुळे इस्लामिक रिपब्लिकच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून प्रादेशिक अस्थिरतेचा धोका वाढला आहे.

अमेरिकेनं या कारवाईचं समर्थन करताना सांगितलं की इराणच्या अणु कार्यक्रमाला निष्प्रभ करण्यासाठी ही लष्करी मोहीम आवश्यक होती. या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव तीव्र झाला असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही तासांनंतर इराणनं जाहीर केली : दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता, पण इराणकडून या वृत्ताला तत्काळ अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नव्हता. पण डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या दाव्यांनंतर, इराणनं पुष्टी केली आहे की, त्यांचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.

इराणमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता : या हल्ल्यामुळे इराणमधील अमेरिकन हस्तक्षेपाच्या इतिहासात नवं आणि धक्कादायक पर्व सुरू झाल्याचं मानलं जात आहे. यामुळे प्रत्युत्तरात्मक हिंसाचार आणि व्यापक युद्धाचा धोका वाढू शकतो. 'अमेरिका फर्स्ट' या घोषणेसह सत्तेत आलेल्या ट्रम्प यांनी 'अखंड चालणाऱ्या युद्धांपासून दूर राहू' असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या कारवाईतून अमेरिकेची लष्करी ताकद ठळकपणे दाखवून देण्यात आल्याचं दिसतं.

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. 86 वर्षीय खामेनेई यांच्याकडे अनेक दशकांपासून सर्व महत्त्वाच्या धोरणांवर अंतिम निर्णयाचा अधिकार होता. त्यांनी इराणमधील धार्मिक नेतृत्वव्यवस्था आणि निमलष्करी क्रांतिकारी दलाचं (Islamic Revolutionary Guard Corps (IRGC)) नेतृत्व करून सत्तेच्या दोन प्रमुख केंद्रांवर प्रभावी नियंत्रण ठेवलं होतं.